Monday, 24 October 2016

|| होईल कधीतरी ||

|| होईल कधीतरी ||
============
पूर्वी,
खुंटी असायची घरात
सदरा का पेहराव
टांगलेला असायचा..
गुटगुटीत हसरा चेहरा
घरात तसेच अंगणात
रांगताना दिसायचा..!!
आता,
खुंटी बरोबर तो सदराही
दिसेनासा झालाय
बहुतेक तो सुखाचा असावा..
पिचलेल्या चकचकीत घरात
शोधता सापडत नाही
तो सदरा अन तो चेहराही
जीव घुसमटू लागलाय
हास्य कुठे लपलंय
कळेना तो सदरा
कुठे बरे ठेवला असावा..??

पूर्वी,
घराच्या भिंतीत
एक छोटीशी सान असायची
नाव जरी सान असले
तितकीच महान भासायची..
कधी मंद दिवा तेवायचा तिथे
वा कधी कुठेही न सापडणारी
विस्मृतीतील इवलीशी (गोष्ट) वस्तू
हमखास तिथेच दिसायची..!!

आता,
त्या सानीबरोबर हरवल्या
असंख्य
हव्याहव्याशा वाटणाऱ्या
आपुलकीच्या गोष्टी
तो जपलेला अनमोल मनाचा ठेवा
अन मंद तेवणारा तो दिवा..
हरवलेल्या हृदयाने मी
कुठवर शोधावा आता
तो हळव्या मनाचा कप्पा..?
पण आशा आहे अंधुकशी अजूनही
कुठेतरी सापडेल तिथली वाट
अन होईल कधीतरी
निर्भेळ माणुसकीची पहाट..!!
****सुनिल पवार..

No comments:

Post a Comment