II व्हाट्सअप ढोल / ताशे II
=================
(स्थळ : चांदोबा गुरुजींची शाळा)
चांदोबा मास्तर मुलांना शिकवत असतात. इतक्यात पाठच्या बेंचच्या इथून मोबाईलची टीक टीक सतत ऐकू येते..)
चांदोबा मास्तर : मागच्या बेंचवरून कसला आवाज येतोय हा..?? कुणी आणलाय शाळेत मोबाईल..?? चिटोऱ्या काय गडबड आहे..??
चकोर : आहो मास्तर माझ नाव चिटोऱ्या न्हाय..चकोर हाय..आपली आपण काही इज्जत हाय..
चांदोबा मास्तर : अरे वा..अस म्हणताय चकोर महाराज..मग मला सांगा हा आवाज कसला चालू आहे..?? शाळेत मोबाईल आणायचा नाही हे कळत नाही का तुला..??
चकोर : पण मास्तर तुमास्नी कस कळल म्या मोबाईल हाणला हाय तो..??
चांदोबा मास्तर : संपूर्ण शाळेत तुझ्या सारखा महापुरुष दिवटा मशाल घेऊन शोधलं तरी सापडणार नाही..
चकोर : मास्तर ते कुणी तरी म्हणलंय बघा. वाघा.सारखा वाघ असतुया..दुसरा कुणी बी वाघ बनू शकत न्हाय..
चांदोबा मास्तर : बर बर कळली तुझी अक्कल..आधी सांग शाळेत मोबाईल आणला कशाला..??
चकोर : त्याच काय हाय मास्तर मोबाईल रोजच खिशात असतो..पण आज त्याची मान दाबायला इसरलो..अन घोटाळा झाला..तुमास्नी तर माहिती हाय मला कवितांचा लई शौक आहे..म्हणून शान मोबाईलवर व्हाट्सअप सुरु केल..अन कवींच्या ग्रुपला जोडून घेतलं..त्याचच ते काय म्हणतात ते हा अपडेट येत असत्यात..
चांदोबा मास्तर : अरे वा चकोर बरा नाद लागलाय तुला..चला कवींच्या सानिध्यात राहून तुझ्यात मुंगी इतकी सुधारणा झाली तरी डोंगराइतके सुख पावल्याचे समाधान लाभेल ह्या पामराला..
चकोर : मास्तर भावना पोहचल्या आता शिकवणी घ्या ना..म्या मोबाईलची मान दाबली..आता ओरडणार न्हाय त्यो..
चांदोबा मास्तर : बर आण बघू इकडे तो मोबाईल..बघू तरी काय काय कविता आहेत..
चकोर : (बोंबोलल च्या मारी मास्तर बहुतेक मोबाईल जप्त करणार) पण मास्तर आता कशाला..नंतर देतो ना शाळा सुटल्यावर.
चांदोबा मास्तर : दे म्हणतो ना..
चकोर : एका अटीवर देईन..
चांदोबा मास्तर : बोल कसली अट..?
चकोर : मोबाईल जप्त करायचा न्हाय..
चांदोबा मास्तर : इतकंच ना..नाही करणार..तसही तुझा मोबाईल जप्त करून मला माझे दिवस खराब करून घ्यायचे नाहीत.. आण तो मोबाईल..
(चकोर मोबाईल मास्तरांच्या हातात देतो)
अरे वा चकोरा खरच कवितांचे ग्रुप आहेत ह्यात..
चकोर : मंग म्या बोललो नव्ह तुमास्नी ..ते काय खोट हुत...? .झाल ना समाधान आता द्या इकड..
चांदोबा मास्तर : अरे जरा धीर धर जरा वाचू दे ...वाह खूप सुंदर..अती सुंदर...अत्यंत सुंदर...आरे हे काय..??
चकोर : काय झाल मास्तर..??
चांदोबा मास्तर : अरे कसले वाद चालू आहेत...??
चकोर : मास्तर ते सोडा तुम्ही फकस्त कविता वाचा..त्या आहेत नव्ह छान छान..
चांदोबा मास्तर : कविता छान आहेत पण मला सांग हे वाद विवाद कशासाठी असतात..?
चकोर : त्याच काय हाय मास्तर त्येला समीक्षा म्हणत्यात..ते मोठे मोठे कवी असत्यात नव्ह..ते नवोदितांच्या कवितेच्या चुका सांगत्यात..तुम्ही न्हाय का आमच कान उपटता..कधी कधी शेरेबाजी करता..तसंच हे असत बघा..एक फरक असतोय बघा तुमच्यात अन त्यांच्यात..
चांदोबा मास्तर : कसला फरक चकोरा..??
चकोर : सांगतो ना..म्हंजी आस बघा..तुम्ही अस मझा काय चुकल का डायरेक्ट माझ नाव घेऊन सर्वांसमक्ष माझ वाभाड काढता..अन मला राग आला की मी..
चांदोबा मास्तर : (चकोरला मधेच अडवत) बर ते कळल पुढच सांग..
चकोर : तेच सांगतोय मास्तर..मध्ये मध्ये दिष्टरब करू नका..
चांदोबा मास्तर : दिष्टरब नाही रे डिस्टर्ब ,हाणायचे आहे का तुला..??
चकोर : हा तेच ते..मास्तर तुम्ही मुद्दा पकडा..शब्द कशापाय पकडता..तुम्ही कवी आहात काय..??
चांदोबा :बर बाबा चूक झाली..तू बोल..
चकोर : हा तर म्या हे सांगत हुतो..काय सांगत हुतो मास्तर..??
चांदोबा मास्तर : ते फरक स्पष्ट करणार होतास ना..
चकोर : आर हा..आल ध्यानात..तर मास्तर तुम्ही जस आमच्या चुकांचे सर्वासमक्ष वाभाड काढता..तसंच तिथ भी वाभाड काढाल जात्यात..
चांदोबा मास्तर : म्हणजे तिथे सुद्धा शिकवणी असते तर..मग फरक तो काय..??
चकोर : फरक हाय ना..तुम्ही डायरेक्ट बोलता..तिथ नाव घेतलं जात न्हाय..वाभाड मात्र डायरेक्ट काढल जात्यात..
चांदोबा मास्तर : पण कोणाच्या कवितेबद्दल काय सांगताहेत हे कोणाला कसे कळणार..??
चकोर : तोच तर घोळ हाय मास्तर..एका मोठ्या कवीन वाभाड काढल की दुसऱ्या मोठ्या कवीला राग येतो..त्यो भी मंग त्याचा मुद्दा खोडून काढत..नव्यान वाभाड काढत राहतो..मंग पहिल्याला राग येतो..इकड ढोल वाजला र वाजला की तिकड दुसरा वाजतो..दुशीकडून ढोल वाजले की त्यांचे समर्थक अन विरोधक ताशे घेऊन तयारच असत्यात..ते भी सामील होत्यात अन संदल रंगत जाते..
चांदोबा मास्तर : अरे बापरे असे सुद्धा घडते तुमच्या कवी ग्रुप मध्ये..?/ म्हणजे तिथे सुद्धा कलगी तुरा आहेच की..?
चकोर : व्हय मास्तर..समदीकड असंच होतंय बघा..पुढच नाटक तर लई रंगतदार होतंय..संदल संपली एक पुढ अवतरत लेफ्ट..लेफ्ट च रामायण..
चांदोबा मास्तर : रामाच रामायण ऐकल आहे चकोरा..हे लेफ्ट लेफ्ट रामायण काय आहे..??
चकोर : लेफ्ट लेफ्ट रामायण भलतंच रंगतदार असतंय बघा..ह्यात ग्रुपचा जो चालक असतोय न्हवं,,त्याची बिचाऱ्याची अवस्था पंख छाटलेल्या जटायू पक्षासारखी होतेय बघा..
चांदोबा मास्तर : जटायू पक्षासारखी ती कशी...??
चकोर : सांगतो मास्तर..तर लेफ्ट लेफ्ट रामायणाची सुरवात होते..रागावलेल्या मोठ्या कवीच्या बाहेर जाण्याने..म्हणजे त्यो ग्रुप सोडून जातो..अन त्याचे समर्थक..गेलेल्या कवीची भलामण करत राहत्यात..मन ग्रुप चालक त्याच्या नाकदूरया काढत पुन्यांदा त्येला घेऊन येतो..ह्यो कवी आला की त्यो कवी लेफ्टवतो..अन बिचारा चालक मधल्या मंधी पिसत जातो..अन नवोदित आपला मनोरंजन करून घेतो..लेफ्ट लेफ्टचा अंक असा रंगत जातो...
चांदोबा मास्तर : असे आहे होय..म्हणजे सगळा गैरसमजाचा खेळ आहे हा..
चकोर : हो ना मास्तर..
अरे मग ह्यावर काही तोडगा काढायचा ना..??
चकोर : तोडगा काढणार कोण..आणि मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण..??
चांदोबा मास्तर : पण काहीतरी उपाय करायला हावाच ना..मोठ्यांच्या भांडणात नवोदित भरडले जातात हे बरे नव्हे..त्यांच सुद्धा मार्गदर्शन व्हायला हवे..
चकोर : माझ भी तेच म्हणण हाय मास्तर..सर्वांसमक्ष नुसत्या चुका काढून..किंवा एकमेकांवर शितोड उडवून कवितेचा विकास कसा हुणार..?? उलट मनात अढी वाढणार..उपाय योजना कोण सांगणार..??
चांदोबा मास्तर : अगदी बरोबर आहे तुझ चकोरा..पण मग तुझ्याकडे ह्याच काही सोल्युशन आहे का..??
चकोर : कसलं लोशन..??
चांदोबा मास्तर : लोशन नाही रे..सोल्युशन..म्हणजे उपाय आहे का तुझ्याकडे..??
चकोर : आहे ना मास्तर..
चांदोबा मास्तर : आहे..?? अरे वा मग सांग बघू काय उपाय आहे तो..??
चकोर :पहिली गोष्ट म्हणजे..कोणा नावोदिताची कविताची एखाद्याला न्हाय रुचली..तर त्याचे चार चौघात वाभाडे काढू नये..त्यामुळ होतंय काय तो सुधारायच्या आधीच बिघडून जातोय.दुसरी गोष्ट ती म्हणजे अशी..की त्या कवितेत काय चुकलंय हे त्या कवीला खाजगीत सांगाव..म्हणजे ऐकणाऱ्याची अन सांगणाऱ्याची पत अबाधित राहते..
तीसरी गोष्ट ती म्हणजे..नुसत्या चुका दाखवून काय भी उपेग न्हाय..ते पटवून द्यायला हवे..अन त्यावर सुलभ मार्गदर्शन करायला हवंय..तवा कुठ नवोदिताला हुरूप येईल बघा.त्यो भी मंग जोमान अभ्यासाला लागल..अन उद्या त्या मोठ्या कवीच भी नाव काढल...
चांदोबा मास्तर : वा वा चकोरा उत्तम निरीक्षण एक निरीक्षण मी तुझंही केलंय..ते म्हणजे.. .तू टवाळी करतोस तितकाच एखाद्या विषयावर गंभीर होऊन विचार सुद्धा करतोस हे पाहून समाधान वाटले..आणि एक धडा मला सुद्धा मिळाला बर का चकोरा..
चकोर : कोणता मास्तर..??
चांदोबा मास्तर : हेच की कोणाचे वाभाडे चार चौघात काढू नये..चुका ह्या नेहमी सौम्य शब्दात सांगितल्या जाव्यात..त्याही त्याला बाजूला घेऊन..जेणे करून आपल्याबद्दल कोणाच्या मनात द्वेष निर्माण होणार नाही..त्यामुळे गुरुजी आणि विद्यार्थी ह्याचे नाते हस्ते खेळते राहील..खरच चकोरा..तू दिसतोस तसा नाही आहेस..
चकोर : मास्तर मंग..मी विद्यार्थी कोणाचा आहे..??
चांदोबा मास्तर : कोणाचा आहेस..??
चकोर : आहो अस काय इचाराताय मास्तर ऑफकोर्स तुमचा हाय..
चांदोबा मास्तर : अरे वा ऑफकोर्स काय..फरक पडतोय हा चकोरा..
चकोर : मास्तर...
चांदोबा मास्तर : आता काय चकोरा..
चकोर : तो मोबाईल देताय न्हवं..
(हे ऐकून मास्तर जोर जोराने हसतात.व त्यांच्या हास्यात चकोर आणि सर्व विद्यार्थी सामील होतात..)
समाप्त .
******सुनिल पवार....