Showing posts with label विनोदी लेख. Show all posts
Showing posts with label विनोदी लेख. Show all posts

Friday, 8 July 2016

II पलटवार II

II पलटवार II
========
आज कामावरुन येऊन फ्रेश होऊन ज़रा निवांत व्हाट्सअप चाळत बसलो तोच आमच्या सौ म्हणाल्या, आज तुमच्या चिरंजीवाने एक प्रताप केलाय.. मी चिरंजीवाकड़े डोळे वटारुन बघत म्हणालो आता काय केले उपद्याप..?? त्यावर सौ उत्तरल्या..तुम्ही आणलेल्या नविन छत्रीचा दांडा मोडला.. (एक छद्मी कटाक्ष टाकत पुन्हा) कसली भंगार छत्री आणलीय देव जाणे.. मी तिच्या त्या खोचक बोलण्यावर तितकेच खमके उत्तर देत म्हणालो..ब्रांडेड छत्री आहे ती..दुकानातुन खरेदी केलेली..बिल सुद्धा आहे.. हो ना मग तुटली कशी..?? सौ. ने पुन्हा त्याच खोचकतेने प्रतिप्रश्न केला..तिच्या प्रतिप्रश्नावर मी चिरंजीवाकड़े कटाक्ष टाकत उत्तरलो..माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर काय होणार..?? आगच लागणार ना..?? माझे ते उत्तर ऐकून सौ गप्प झाल्या..मात्र चिरंजीव मारक्या म्हशी सारखा बघत गप्प बसून राहिला..
थोड़ा वेळ गेला..वातावरण हलके झाले..तसा चिरंजीव उठला आणि मला हळूच म्हणाला पप्पा तुमचा कोणता चष्मां खराब झाला आहे..?? (कोपऱ्यात काढून ठेवालेल्या जुन्या चष्म्याकड़े बोट दाखवत) हा चष्मां की तुम्ही आता चढवला आहे तो चष्मां..? मी सहज म्हणालो तो..अरे हां आता घातला आहे तो नविन आणला नाही का मी..?? (कोपऱ्यातल्या चष्म्याकडे बोट दाखवत) तो चष्मां खराब झालाय..त्याने भुरकट दिसत होते.. माझ्या उत्तरावर चिरंजीव पटकन म्हणाला मग बरोबर छत्री तुटणारच ना..?? तुम्ही छत्री आणली तेव्हा हा नविन चष्मां कुठे होता..?? खी..खी..खी...
आता बोला..😀
****सुनील पवार.....

:P व्हाट्सअप/फेसबुक रायता :P

=D हसु नका बरे =D
============
आजची रेसिपी
============
:P व्हाट्सअप/फेसबुक रायता :P
======================
साहित्य:
1) वाह वाह
2) सुंदर
3) खुप सुंदर
4) मस्त
5) छान
6) जबदस्त
इत्यादी शब्द
किंवा एखाद दूसरी चारोळी
7) दोन चार गुलाब अथवा पुष्प गुच्छ

कृती :
आपल्या आवडीच्या एखाद्याची किंवा एखादीची
एक रचना किंवा पोस्ट घ्यावी..त्यावर वाह वाह, छान, सुंदर इत्यादी शब्दाची खमंग फोडणी द्यावी..दोन्ही अंगठे वर करून (Y) (Y) किंवा चिमटीत पकडून मस्त एकजीव करावी..सजावटीसाठी एखादी चारोळी पेरावी..अन बाजूला गुलाब 🌹 अथवा पुष्प गुच्छ 💐मांडावा..मस्त रायता तयार होईल शिवाय दिसायलाही सुंदर दिसेल..आता हा तयार झालेला रायता आपल्या आवडत्या व्यक्तीला अजीर्ण होईपर्यंत ती वाढत राहावा...म्हणजे बाकीच्यांना आपोआप मळमळू लागेल... =D :P
(चकोर दा ढाबा)

Sunday, 13 March 2016

II व्हाट्सअप ढोल / ताशे II

II व्हाट्सअप  ढोल / ताशे II
=================
(स्थळ : चांदोबा गुरुजींची शाळा)
चांदोबा मास्तर मुलांना शिकवत असतात. इतक्यात पाठच्या बेंचच्या इथून मोबाईलची टीक टीक सतत ऐकू येते..)
चांदोबा मास्तर : मागच्या बेंचवरून कसला आवाज येतोय हा..?? कुणी आणलाय शाळेत मोबाईल..?? चिटोऱ्या काय गडबड आहे..??
चकोर : आहो मास्तर माझ नाव चिटोऱ्या न्हाय..चकोर हाय..आपली आपण काही इज्जत हाय..
चांदोबा मास्तर : अरे वा..अस म्हणताय चकोर महाराज..मग मला सांगा हा आवाज कसला चालू आहे..?? शाळेत मोबाईल आणायचा नाही हे कळत नाही का तुला..??
चकोर : पण मास्तर तुमास्नी कस कळल म्या मोबाईल हाणला हाय तो..??
चांदोबा मास्तर : संपूर्ण शाळेत तुझ्या सारखा महापुरुष दिवटा मशाल घेऊन शोधलं तरी सापडणार नाही..
चकोर : मास्तर ते कुणी तरी म्हणलंय बघा. वाघा.सारखा वाघ असतुया..दुसरा कुणी बी वाघ बनू शकत न्हाय..
चांदोबा मास्तर : बर बर कळली तुझी अक्कल..आधी सांग शाळेत मोबाईल आणला कशाला..??
चकोर : त्याच काय हाय मास्तर मोबाईल रोजच खिशात असतो..पण आज त्याची मान दाबायला इसरलो..अन घोटाळा झाला..तुमास्नी तर माहिती हाय मला कवितांचा लई शौक आहे..म्हणून शान मोबाईलवर व्हाट्सअप सुरु केल..अन कवींच्या ग्रुपला जोडून घेतलं..त्याचच ते काय म्हणतात ते हा अपडेट येत असत्यात..
चांदोबा मास्तर : अरे वा चकोर बरा नाद लागलाय तुला..चला कवींच्या सानिध्यात राहून तुझ्यात  मुंगी इतकी  सुधारणा झाली तरी डोंगराइतके सुख पावल्याचे समाधान लाभेल  ह्या पामराला..
चकोर : मास्तर भावना पोहचल्या आता शिकवणी घ्या ना..म्या मोबाईलची मान दाबली..आता ओरडणार न्हाय त्यो..
चांदोबा मास्तर : बर आण बघू इकडे तो मोबाईल..बघू तरी काय काय कविता आहेत..
चकोर : (बोंबोलल च्या मारी मास्तर बहुतेक मोबाईल जप्त करणार) पण मास्तर आता कशाला..नंतर देतो ना शाळा सुटल्यावर.
चांदोबा मास्तर : दे म्हणतो ना..
चकोर : एका अटीवर देईन..
चांदोबा मास्तर : बोल कसली अट..?
चकोर : मोबाईल जप्त करायचा न्हाय..
चांदोबा मास्तर : इतकंच ना..नाही करणार..तसही तुझा मोबाईल जप्त करून मला माझे दिवस खराब करून घ्यायचे नाहीत.. आण तो मोबाईल..
(चकोर मोबाईल मास्तरांच्या हातात देतो)
अरे वा चकोरा खरच कवितांचे ग्रुप आहेत ह्यात..
चकोर : मंग म्या बोललो नव्ह तुमास्नी ..ते काय खोट हुत...? .झाल ना समाधान आता द्या इकड..
चांदोबा मास्तर : अरे जरा धीर धर जरा वाचू दे ...वाह खूप सुंदर..अती सुंदर...अत्यंत सुंदर...आरे हे काय..??
चकोर : काय झाल मास्तर..??
चांदोबा मास्तर : अरे कसले वाद चालू आहेत...??
चकोर : मास्तर ते सोडा तुम्ही फकस्त कविता वाचा..त्या आहेत नव्ह छान छान..
चांदोबा मास्तर : कविता छान आहेत पण मला सांग हे वाद विवाद कशासाठी असतात..?
चकोर : त्याच काय हाय मास्तर त्येला समीक्षा म्हणत्यात..ते मोठे मोठे कवी असत्यात नव्ह..ते नवोदितांच्या कवितेच्या चुका सांगत्यात..तुम्ही न्हाय का आमच कान उपटता..कधी कधी शेरेबाजी करता..तसंच हे असत बघा..एक फरक असतोय बघा तुमच्यात अन त्यांच्यात..
चांदोबा मास्तर : कसला फरक चकोरा..??
चकोर : सांगतो ना..म्हंजी आस बघा..तुम्ही अस मझा काय चुकल का डायरेक्ट माझ नाव घेऊन सर्वांसमक्ष माझ वाभाड काढता..अन मला राग आला की मी..
चांदोबा मास्तर : (चकोरला मधेच अडवत) बर ते कळल पुढच सांग..
चकोर : तेच सांगतोय मास्तर..मध्ये मध्ये दिष्टरब करू नका..
चांदोबा मास्तर : दिष्टरब नाही रे डिस्टर्ब ,हाणायचे आहे का तुला..??
चकोर : हा तेच ते..मास्तर तुम्ही मुद्दा पकडा..शब्द कशापाय पकडता..तुम्ही कवी आहात काय..??
चांदोबा :बर बाबा चूक झाली..तू बोल..
चकोर : हा तर म्या हे सांगत हुतो..काय सांगत हुतो मास्तर..??
चांदोबा मास्तर : ते फरक स्पष्ट करणार होतास ना..
चकोर : आर हा..आल ध्यानात..तर मास्तर तुम्ही जस आमच्या चुकांचे सर्वासमक्ष वाभाड काढता..तसंच तिथ भी वाभाड काढाल जात्यात..
चांदोबा मास्तर : म्हणजे तिथे सुद्धा शिकवणी असते तर..मग फरक तो काय..??
चकोर : फरक हाय ना..तुम्ही डायरेक्ट बोलता..तिथ नाव घेतलं जात न्हाय..वाभाड मात्र डायरेक्ट काढल जात्यात..
चांदोबा मास्तर : पण कोणाच्या कवितेबद्दल काय सांगताहेत हे कोणाला कसे कळणार..??
चकोर : तोच तर घोळ हाय मास्तर..एका मोठ्या कवीन वाभाड काढल की दुसऱ्या मोठ्या कवीला राग येतो..त्यो भी मंग त्याचा मुद्दा खोडून काढत..नव्यान वाभाड काढत राहतो..मंग पहिल्याला राग येतो..इकड ढोल वाजला र वाजला की  तिकड दुसरा वाजतो..दुशीकडून ढोल वाजले की त्यांचे समर्थक अन विरोधक ताशे घेऊन तयारच असत्यात..ते भी सामील होत्यात अन संदल रंगत जाते..
चांदोबा मास्तर : अरे बापरे असे सुद्धा घडते तुमच्या कवी ग्रुप मध्ये..?/ म्हणजे तिथे सुद्धा कलगी तुरा आहेच की..?
चकोर : व्हय मास्तर..समदीकड असंच होतंय बघा..पुढच नाटक तर लई रंगतदार होतंय..संदल संपली एक पुढ अवतरत लेफ्ट..लेफ्ट च रामायण..
चांदोबा मास्तर : रामाच रामायण ऐकल आहे चकोरा..हे लेफ्ट लेफ्ट रामायण काय आहे..??
चकोर : लेफ्ट लेफ्ट रामायण भलतंच रंगतदार असतंय बघा..ह्यात ग्रुपचा जो चालक असतोय न्हवं,,त्याची बिचाऱ्याची अवस्था पंख छाटलेल्या जटायू पक्षासारखी होतेय बघा..
चांदोबा मास्तर : जटायू पक्षासारखी ती कशी...??
चकोर : सांगतो मास्तर..तर लेफ्ट लेफ्ट रामायणाची सुरवात होते..रागावलेल्या मोठ्या कवीच्या बाहेर जाण्याने..म्हणजे त्यो ग्रुप सोडून जातो..अन त्याचे समर्थक..गेलेल्या कवीची भलामण करत राहत्यात..मन ग्रुप चालक त्याच्या नाकदूरया काढत पुन्यांदा त्येला घेऊन येतो..ह्यो कवी आला की त्यो कवी लेफ्टवतो..अन बिचारा चालक मधल्या मंधी पिसत जातो..अन नवोदित आपला मनोरंजन करून घेतो..लेफ्ट लेफ्टचा अंक असा रंगत जातो...
चांदोबा मास्तर : असे आहे होय..म्हणजे सगळा गैरसमजाचा खेळ आहे हा..
चकोर : हो ना मास्तर..
अरे मग ह्यावर काही तोडगा काढायचा ना..??
चकोर : तोडगा काढणार कोण..आणि मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण..??
चांदोबा मास्तर : पण काहीतरी उपाय करायला हावाच ना..मोठ्यांच्या भांडणात नवोदित भरडले जातात हे बरे नव्हे..त्यांच  सुद्धा मार्गदर्शन व्हायला हवे..
चकोर : माझ भी तेच म्हणण हाय मास्तर..सर्वांसमक्ष नुसत्या चुका काढून..किंवा एकमेकांवर शितोड उडवून कवितेचा विकास कसा हुणार..?? उलट मनात अढी वाढणार..उपाय योजना कोण सांगणार..??
चांदोबा मास्तर :  अगदी बरोबर आहे तुझ चकोरा..पण मग तुझ्याकडे ह्याच काही सोल्युशन आहे का..??
चकोर : कसलं लोशन..??
चांदोबा मास्तर : लोशन नाही रे..सोल्युशन..म्हणजे उपाय आहे का तुझ्याकडे..??
चकोर : आहे ना मास्तर..
चांदोबा मास्तर : आहे..?? अरे वा मग सांग बघू काय उपाय आहे तो..??
चकोर :पहिली गोष्ट म्हणजे..कोणा नावोदिताची कविताची एखाद्याला न्हाय रुचली..तर त्याचे चार चौघात वाभाडे काढू नये..त्यामुळ होतंय काय तो सुधारायच्या आधीच बिघडून जातोय.दुसरी गोष्ट ती म्हणजे अशी..की त्या कवितेत काय चुकलंय हे त्या कवीला खाजगीत सांगाव..म्हणजे ऐकणाऱ्याची अन सांगणाऱ्याची पत अबाधित राहते..
तीसरी गोष्ट ती म्हणजे..नुसत्या चुका दाखवून काय भी उपेग न्हाय..ते पटवून द्यायला हवे..अन त्यावर सुलभ मार्गदर्शन करायला हवंय..तवा कुठ नवोदिताला हुरूप येईल बघा.त्यो भी मंग जोमान अभ्यासाला लागल..अन उद्या त्या मोठ्या कवीच भी नाव काढल...
चांदोबा मास्तर : वा वा चकोरा उत्तम निरीक्षण एक निरीक्षण मी तुझंही केलंय..ते म्हणजे.. .तू टवाळी करतोस तितकाच एखाद्या विषयावर गंभीर होऊन विचार सुद्धा करतोस हे पाहून समाधान वाटले..आणि एक धडा मला सुद्धा मिळाला बर का चकोरा..
चकोर : कोणता मास्तर..??
चांदोबा मास्तर : हेच की कोणाचे वाभाडे चार चौघात काढू नये..चुका ह्या नेहमी सौम्य शब्दात सांगितल्या जाव्यात..त्याही त्याला बाजूला घेऊन..जेणे करून आपल्याबद्दल कोणाच्या मनात द्वेष निर्माण होणार नाही..त्यामुळे गुरुजी आणि विद्यार्थी ह्याचे नाते हस्ते खेळते राहील..खरच चकोरा..तू दिसतोस तसा नाही आहेस..
चकोर : मास्तर मंग..मी विद्यार्थी कोणाचा आहे..??
चांदोबा मास्तर : कोणाचा आहेस..??
चकोर : आहो अस काय इचाराताय मास्तर ऑफकोर्स तुमचा हाय..
चांदोबा मास्तर : अरे वा ऑफकोर्स काय..फरक पडतोय हा चकोरा..
चकोर : मास्तर...
चांदोबा मास्तर : आता काय चकोरा..
चकोर : तो मोबाईल देताय न्हवं..
(हे ऐकून मास्तर जोर जोराने हसतात.व  त्यांच्या हास्यात चकोर आणि सर्व विद्यार्थी सामील होतात..)
समाप्त .
******सुनिल पवार....

Tuesday, 1 March 2016

II संमेलन ते संमेलन II

II संमेलन ते संमेलन II
(भाग : १)
==============
स्थळ : चांदोबा गुरुजींची शाळा...
(शिरस्त्याप्रमाणे चकोर आजही शाळेत उशिरा येतो..)
चकोर : म्या आत येऊ गुरुजी..??
मास्तर : या आलात..?? झाडा पायधूळ वर्गात उपकार होतील आपले...(चकोर आत येणार इतक्यात मास्तर त्याला थांबवत) थांब कुठे चाललास..
चकोर : अहो अस काय मास्तर जागेवर जातो...
चांदोबा मास्तर : थांब तिथेच..आधी सांग तुला दररोज उशीर का होतो..आणि हल्ली..?? मी पाहतोय तुझ्या दांड्या सुद्धा वाढत चालल्या आहेत..?? काय चाललय काय नक्की..??
चकोर :आहो मास्तर..ती एक लई मोठी स्टोरी हाय..समद सांगतो..अदुगर मला आत एव द्या..मंग सांगतो..
चांदोबा मास्तर : बर ये आणि सांग बघू काय तुझी स्टोरी आहे...
चकोर : तर मास्तर त्याच अस हाय की..म्या तुमास्नी म्हटलं हुत ना..हल्ली मला कविता लई आवडते..तिच्या नादान हे समद घडतंय..
चांदोबा मास्तर : अरे कवितेचा आणि तुझ्या दांडी मारण्याचा संबंध काय..?? काही तरी थापा मारू नको..
चकोर : आईच्यान खर सांगतो मास्तर..चार दिस म्या काव्यदिंडी काय व्हायली..लोक मला कवी समजू लागले..अन साम्मेलानाला बोलावू लागले..म्या म्हटलं चला आपण भी भाव खावून घेवया..मग तथ गेल्यावर इथ वर्गात कस काय येणार मास्तर..?? आता तुम्हीच सांगा दांड्या होणार न्हाय तर काय..??
चांदोबा मास्तर : अरे पण दांड्या मारून संमेलनाला जायला कोणी सांगितलं..?? बर गेला ते ठीक पण डोक्यात काय प्रकाश पडला की नाही..?? की नुसताच कोरा..कागद राहिला..??
चकोर : आस कस म्हणता मास्तर..म्या तुमचा शिष्य हाय..शिकल्या बिगर राहायचा न्हाय...
चांदोबा मास्तर : इथे बोललास ते ठीक पण बाहेर कुठे बोलू नको..काय आहे लोक माझ्या तोंडात शेण घातलील रे..म्हणतील कसला अवली शिष्य घडवला मास्तरांनी..
चकोर : मास्तर टोमण मारायचं काम न्हाय..आम्हास्नी बी टकूर हाय.हा आता तुमच्या वाणी नाय..पण सरस हाय...
चांदोबा मास्तर : बर बर..जास्त अक्काल पाजळू नको..
चकोर : बर तर बर..राहील..माझ्या बा च काय जातंय..पुन्यांदा इचारू नका आपण काय बी सांगणार न्हाय..
चांदोबा मास्तर : अरे सोन्या मला अस म्हणायचं आहे की, तू तिथे जाउन शिकला काय..ते तरी तरी कळू दे..
चकोर : त्याच अस हाय मास्तर..चार पाच ठिकाणी गेलो..प्रत्येक ठिकाणी येगळा अनुभव...लई भारी...
चांदोबा मास्तर : अरे वा कळू दे तरी काय भारी होते ते..??
चकोर : त्याच काय हाय मास्तर.. पहिल्यांदा एका संमेलनाला गेलो तिथ समद लई बेस होत..लई झ्याक यवस्था हुती..आपली तरुण मंडळी भारी उत्साही...काय फेटे घालून होते मास्तर अस वाटत हुत बघतच राहावं..लई आदरान वागवल तिथ.. अध्यक्षांच भाषण भी लईभारी हुत.समदयात बेस्ट तिथला तरुण तडफदार म्होरक्या..
चांदोबा मास्तर : म्होरक्या..?? कोण म्होरक्या...?? अन काय केल त्याने..??
चकोर : म्होरक्या म्हणजे..ते काय म्हणतात ते..हा प्रमुख..ज्यान ह्या संमेलनाच नियोजन का काय म्हणतात ते केल हुत..लई भारी त्याची सप्न..परदेशवारीची नोकरी सोडून म्हणला ह्या मातीची सेवा करायची हाय...म्हणून शान त्यान ते online का काय म्हणत्यात ना..ते पब्ली..पब्ली..काय बर तो शब्द..??
मास्तर : पब्लिकेशन असेल...
चकोर : हा बरोबर प्रकाशन...त्याच नव दालन उघडलंय...तिथ तुम्हाला नवीन जुन्या कवितांच अन लेख, कथा, कांदबरी आस समद एका ठिकाणी वाचायला गावनार हाय...हाय का नाय लई भारी...??
मास्तर : वा वा चकोरा छान माहिती दिलीस..आजची तरुण पिढी साहित्याबद्दल फारच सजग दिसतेय..
चकोर : तर हो मास्तर..पण एक खटकल मास्तर..
चांदोबा मास्तर : आता काय खटकल....
चकोर : कार्यक्रम लई भारी हुता पण खटकल अस की जे अध्यक्ष येतात ते नेहमीच घाईत का हो असत्यात..??
चांदोबा मास्तर : अरे असेल काही काम त्यांना..
चकोर : बरं मानल मास्तर तुमचं एकांद्या येळी असल काम.पण मंग दुसऱ्या एका ठिकाणी गेलो तिथ बी तीच बोंब..
चांदोबा मास्तर : म्हणजे ते सुद्धा अर्ध्यावर सोडून गेले..??
चकोर : तर हो मास्तर..तेच तर सांगतोय तुमास्नी..
चांदोबा मास्तर : काय म्हणतोस काय चकोरा.. मला सुद्धा कळू दे काय आणि कस असते हे संमेलन..
चकोर : हा तर मास्तर अस बघा..पहिल्या येळी अध्यक्ष त्यांच भाषण करून गेले..कविता अशी हवी कविता तशी हवी..लांबलचक लेक्चर दिले..अन कलटी मारली..
चांदोबा मास्तर : मग..??
चकोर : मंग काय मास्तर बाकीचे बोंबलले..दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथ बी तेच..कोण मोठ गझलाकार आले हुते..ते म्हणले म्या समद्यांच्या कविता ऐकणार हाय..समाद्यांची पाठ थोपटणार हाय...
चांदोबा मास्तर : अरे वा मग पुढे काय झाल..??
चकोर : कसलं काय मास्तर..पाठ थोपटायच सोडा मास्तर..ऐकल्या की न्हाही ते सुद्धा सांगता यायच न्हाय..ते आपल्या गप्पात रंगले हुते..अन नवोदित कावितेत दंगले हुते..कुठूनसा फोन आल्याच निमित्त झाल..अन अध्यक्ष गुल झाल..
चांदोबा मास्तर : काय सांगतोस काय चकोरा..??ऐकावे ते नवलच..पण हि वृत्ती बरोबर नाही चकोरा..
चकोर : तेच म्हणतोय म्या बी..तुमास्नी येळ न्हाई मंग आदुगर सपष्ट करायचं हुत..उगाच नवोदितांना आशेवर झुलावायाच ते कशा पाय..??
चांदोबा मास्तर : बरोबर आहे चकोरा..नवोदित मोठ्यांचे विचार ऐकायला येत असतो..त्याच बरोबर व्यासपीठावर अपल्या विचारांच सादरीकरण मान्यवरांसमोर करून मिळालेल्या संधीच सोन करण्याच्या उद्देशाने तिथे येत असतो..ती संधीच जर अशा तऱ्हेने मातीमोल होत असेल तर..त्या अध्यक्षपदाला आणि त्यांच्या मोठेपणाला काय अर्थ उरतो..??
चकोर : अक्षी बेस बोललात मास्तर..हे अस होतंय सामादिकडे..हेला बी काही अपवाद हैत मास्तर..अस बी काही अध्यक्ष असत्यात जे समद्यासनी येळ देत्यात..समद्यांच्या कविता मन लावून ऐक्त्यात..त्यांना शाबासकी पण देत्यात.. अन कान भी उपटत्यात ते बी हसत हसत..
चांदोबा मास्तर : बरोबर आहे चकोरा..कान उपटणे सुद्धा गरजेचे असते..पण समोरच्याला न दुखावता..जसे मी तुझे उपटतो..तसेच..निव्वळ वरवरची शाबासकी देवून नवोदिताचा गैरसमज वाढण्याचा संभव असतो..आणि मग सुधारणा होण्या ऐवजी बिघाड होण्याची शक्यता जास्त असते..
चकोर : हो मास्तर..म्हणून तर मी तुमास्नी कधी उलटून बोलत न्हाय..पण कावा कावा इनोदान..
चांदोबा मास्तर : (चकोरास मधेच थांबवत) पुरे..कळल..पुढे काय झाला ते सांग..
चकोर : आणखी एक मास्तर चार पाच ठिकाणी गेलो..समदे कवी भारी पण एक गोष्ट खटकली मास्तर..
चांदोबा मास्तर : (कपाळास आट्या पाडत) आता आणखी काय खटकल..??
चकोर : तेच सांगतोय मास्तर मधे मधे दिष्टरब करू नका..
चांदोबा मास्तर : दिष्टरब नाय रे चिटोऱ्या डिस्टर्ब..
चकोर : तेच ते मास्तर..तुमास्नी कळल ना..?? मंग बेस हाय..काय सांगत हुतो म्या..??
चांदोबा मास्तर : अरे काही तरी खटकल म्हणालास ना..मग काय खटकल ते सांग..
चकोर : तेच सांगतोय मास्तर..त्याच्काय हाय.. समदे कवी लई भारी..पण एकचं कविता सामादिकड का म्हनत्यात ते न्हाय कळल..म्हणजे बघा एकीकडे एखाद्या कवितेच कौतिक झाल की मंग तीच कविता समादिकड म्हणत्यात..
चांदोबा मास्तर : मग त्यात चुकीच ते काय..?? प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष तर वेगवेगळे असतात ना..??
चकोर : हो मास्तर अध्यक्ष येगळे असत्यात पण कवी समदे तेच असत्यात नव्ह.. ऐकून ऐकून कान किटत्यात..
चांदोबा मास्तर : तुझ पण बरोबर आहे चकोरा..कवी म्हटलं की विविधता हवीच..निव्वळ कौतुक करून घेण्यासाठी तीच कविता सारखी म्हणण्यापेक्षा..प्रत्यक वेळेस काही वेगळे देता येईल का ह्याचा विचार करणे उचित होईल..भले एखादे वेळेस कौतुक नाही होणार..पण काही वेगळे मांडल्याचे समाधान नक्कीच लाभेल..आणि न जाणो तुमच्या नवीन प्रयोगाला सुद्धा उत्स्फूर्त दाद मिळेल..म्हणून माणसाने नेहमीच प्रायोगशील आणि प्रयत्नशील असायला हवे..चुकले तरी हरकत नाही..निदान प्रयत्न तरी करायलाच हवेत..तुला सुद्धा हाच सल्ला बर का चकोरा..नुसत्याच खोड्या काढण्यापेक्षा..काहीतरी लिहा..चांगल घ्या..चांगल द्या..कळल का..??
चकोर : होय मास्तर..म्या तुमचाच शिष्य हाय..
चांदोबा मास्तर : म्हणूनच तर सांगावं लागतंय..आता जागेवर बसा..बाकीच रामायण आपण नंतर ऐकू..आता जरा अभ्यासाकडे वळा..
चकोर : (मनात) च्यामारी माझंच बुमारयाग माझ्यावरच उलटतंय ..
चांदोबा मास्तर : आता बसतोस का शाल श्रीफळ देऊ..
चकोर : होय मास्तर..
(चकोर चरफडत जागेवर बसतो)
क्रमशा :
**********सुनिल पवार....

Wednesday, 8 January 2014

II धमाल साहित्य संमेलन II

II धमाल साहित्य संमेलन II

स्थळ : चांदोबा गुरुजीची शाळा..
(शाळा सुटली चांदोबा गुरुजी घरी जाण्याच्या तयारीत..सर्व विद्यार्थी घरी निघून जातात चकोर मात्र विचारमग्न जागेवरच बसलेला असतो..)

चांदोबा मास्तर : अरे चिटोरा आपला काय तो हा...चकोरा आज घरी जायचा विचार नाही का..??
चकोर : (तंद्री भंग होवून) काय मास्तर..??
चांदोबा मास्तर : अरे मी म्हणालो घरी जायचं नाही का आणि कसला विचार करतोस बाबा तू..??
चकोर : मास्तर एक इचारू..??
चांदोबा मास्तर : (आता ह्याने काय नवीन खूळ काढलं कोणास ठाऊक..वाड्यावर जाणे बोंबलले बहुतेक) बर विचार काय विचारायचे आहे ते..
चकोर : मास्तर साहित्य संमेलन म्हंजी काय..??
चांदोबा मास्तर : अरे वा चकोरा आज साहित्य संमेलनाच खूळ कसं काय शिरलं..??
चकोर : काय मास्तर तुम्ही भी खेचताय..म्या भी पेपर वाचतो..त्यात लिवल होत साहित्य संमेलन.. डोस्क्यात काय भी शिरलं न्हाय म्हटल मास्तराला विचारू..जनरल नोलीज म्हणून..
चांदोबा मास्तर : म्हणजे माझी परीक्षा घ्यायला आला की काय तू..??
चकोर : तसं न्हाय मास्तर मला भी माहित असलेल बर नाय का..उद्या कोणी इचारलं साहित्य संमेलन म्हणजे काय..?? तर काय सांगणार मास्तर..?? अन मला न्हाय आल मग नाव कुणाच खराब हुणार तुमच नव्ह..आता तुमास्नी नाय सांगायचं तर राहील..माझ्या बा च काय जातंय म्हना..!!
चांदोबा मास्तर : अरे चकोरा कधी रे सुधारणार तू..?? अरे बाबा मला तसं म्हणायचं नव्हत..बर ऐक सांगतो..
चकोर : हा सांगा गुरजी..
चांदोबा मास्तर : अरे वा एकदम गुरुजी..!!  चांगल आहे त्या निमित्ताने का होईना तुझ्या तोंडून गुरुजी शब्द आले भरून पावलो रे चकोरा...(कोपरापासून हात जोडतात)
चकोर : मास्तर आता सांगताय का नुसतेच फुटेज खाताय..??
चांदोबा मास्तर : (मास्तर सावरत)बर सांगतो ऐक..साहित्य संमेलन म्हणजे जिथे छोटे मोठे कवी लेखक एकत्र जमतात..आपल्या काव्य कथा लोकांपर्यंत पोहचवतात..नवीन कवी कथाकारांना व्यासपीठ निर्माण करून देतात..आपले विचार सर्वाना वाटतात..इतरांचे विचार घेतात त्याला संमेलन म्हणतात..
चकोर : बर मग मला सांगा तिथे सूप वाजवतात का हो..??
चांदोबा मास्तर : सूप कसल सूप..??
चकोर : मंग ते पेपर मन्धे छापल हुत ना साहित्य संमेलनाचे सूप वाजले..
चांदोबा मास्तर : अरे वेड्या सूप म्हणजे बिगुल वाजले..
चकोर : अरे वा बिगुल भी वाजवत्यात..??
चांदोबा मास्तर : अरे चकोरा बिगुल म्हणजे नांदी झाली संमेलनाची..
चकोर : पण मास्तर नांदी नाटकात हुते ना..??
चांदोबा मास्तर : (वैतागत) आता ह्याला कस समजावू..?? नांदी म्हणजे सुरवात झाली..
चांदोबा मास्तर : मग सपष्ट बोला ना मास्तर सुरवात झाली म्हनून..म्हनजे बघा अस..सूप म्हजे बिगुल..बिगुल म्हनजे नांदी..नांदी म्हनजे सुरवात...
चांदोबा मास्तर : (वैतागत) हा बरोबर सुरवात..
चकोर : मास्तर म्या भी कविता लिवली हाय..सुगंधाला दावली लई आवडली तिला..
चांदोबा मास्तर : काय म्हणालास..??
चकोर : म्हनल म्या सुदिक कविता लिवली हाये सगुणा साठी..
चांदोबा मास्तर :( तरीच म्हणतो इथे सुगंधा कुठून आली.) वा वा चकोरा तू कविता लिहिली.. क्या बात..वाच बघू काय लिहल आहे जरा मला पण कळू दे..
चकोर : ऐका हा मास्तर..
माझी गुणाची बाय सगुणा..
भेटशील ना मला पुन्हा पुन्हा..
बापाला लाव चुना अन..
फडात येउन भेट ना पुन्हा पुन्हा..!!
चांदोबा मास्तर : शी शी शी काय रे हे चकोरा काय तुझ लिखाण..ह्याला काय कविता म्हणायची..??
चकोर : मास्तर ह्याला चारोळी म्हणत्यात..लई फ़ेमस हाय..अन मास्तर ह्यात डोस्क लावायची गरज न्हाय..आपल्या जे बोलायच हाय ना ते फकस्त जोडायचं हाय..लई भारी वजन पडतय बघा..सामानिच्यावर..
चांदोबा मास्तर : धन्य रे तू आणि धन्य तुझे विचार...
चकोर : मग बेस्ट हाय ना म्या..विद्यार्थी कुणाचा आहे चांदोबा गुरजींचा..
चांदोबा मास्तर : अरे गधड्या त्या साहित्य संमेलनात जावून ये जरा.. पहा तिथे कविता कशां असतात लोक कसे बोलतात शिक जरा कसे भाषण करतात..डोक्यात काही तरी घे..नुसताच माजलाय वळू..
चकोर : काय घ्यायचे मास्तर.. तिकडूनच आलो ना मी..म्हणूनच शाळेत यायला उशीर झाला ना मास्तर..!! अन काल दांडी मारली ती काय उगाच..अन हा वळू बोलायचं काम न्हाय..सांगून ठेवतो..
चांदोबा मास्तर : म्हणजे तू गेला होता तिकडे तरीही कोरडाच..(डोक्यात काही गेलंच नाही बहुतेक)...बर मग काय शिकला तिथे तु.. आणि काय काय पाहिलेस ते तरी सांग...
चकोर : मास्तर त्या संमेलना परिस आपली चावडी बरी..
चांदोबा मास्तर : का रे बाबा अस का बोलतो..
चकोर नाय तर काय मास्तर..बघाव तवा वाद..राग अन रुसवे..निस्त्या तंगड्या घालत हुते जणू कबड्डीचा सामानाच रंगलाय.. राड्याशिवाय बात न्हाय..अन बोलल्या शिवाय रहात नाय..
चांदोबा मास्तर : अरे असं नाही बोलायच तो वैचारिक वाद असतो..विचारांची आदान प्रदान होत असते.. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते..
चकोर : काय सांगताय तुम्ही मास्तर..आम्ही आडाणी हाय व्हय..आम्हास्नी भी कळत की राजकारण..कोटी शिवाय बात न्हाय यांची अन वडापाव शिवाय खात न्हाय अस समद हाय..अध्यक्ष सुदिक ह्याना कोट्याधीश लागतोय म्हणे... आता बोला..??
चांदोबा मास्तर : अरे चकोरा कोट्याधीश म्हणजे पैश्याने नाही रे.. ते भाषणात कोटी करतात ना म्हणून त्यांना कोट्याधीश म्हणतात..तुझ आपल काही तरीच..
चकोर : बर राहील मास्तर पण आता मला सांगा संमेलन साहित्याच हाय नव्ह.. मग साहित्य कुठाय..?? जसं तुम्ही आमास्नी सांगता उद्या हस्तकलेचा तास हाय तवा समद साहित्य घेऊन या..पर इथ तर पुस्तका बिगर काय बी दिसलं नाय..
चांदोबा मास्तर : किती रे अज्ञान चकोरा साहित्य म्हणजे सामान नाही..साहित्य म्हणजे लिखाण.. त्यांनी जे काही लिहल आहे ना म्हणजे कविता.चारोळी कथा ह्याना साहित्य म्हणतात..
चकोर : अस होय मला वाटलं आपल...बर ते राहुदे मास्तर.. पण तिथे कुर्मुड्या ज्योतिषांच काय काम ते तरी सांगा बघू..??
चांदोबा मास्तर :  ज्योतिषी..!! कोण ज्योतिषी..??
चकोर : आल हुत एक पेटकर म्हणून..देशाच भविष्य सांगून गेले..नुसता धुरळा उडून राहिलाय त्यांच्या भविष्याने..बर मला सांगा मास्तर नरेंद्र नावाचा ह्या ज्योतिषांना इतक वावडं का..??
चांदोबा मास्तर : अरे गधड्या तुला काहीच कसं कळत नाही..जेष्ठ पत्रकार आहेत ते..त्यांचा अनुभव दांडगा आहे..त्यामुळे ते जे काही म्हणतात त्याला आपोआप वजन येते..आणि प्रसिद्धीत राहण्यासाठी त्यांना असे बोलावे लागते..आणि हो असे अनुदगार काढू नये थोरा मोठ्यांच्या विषयी..
चकोर : वा मास्तर ते बोलले म्हणजे अनुभव..आम्ही बोललो म्हणजे अज्ञान..हे बेस हाय मास्तर...तुम्ही चार बुक जास्त शिकले म्हणून तुम्ही फकस्त श्याने अन आम्ही येडे होय..?? आम्हास्नी कळत न्हाय का राजकारण कसं असत्ये ते..?? म्या सांगतो मास्तर जिथ जिथ राजकारण शिरतंय तिथ तिथ गजकरण सुरु होतंय..ह्याची लस बरी हुतच  नाय..कितीबी मलम चोळा काय सुदिक फरक नाय बघा..हा समदा खाजवून खरुज काढण्याचा परकार हाय..
चांदोबा मास्तर : अरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात कार्यक्रमात..आपण लक्ष द्यायचं नाही..
चकोर : अस कसं म्हनता मास्तर ह्याला संमेलन म्हनायचं काय..?? कविता दोन चार अन भाषणबाजी दमदार..ह्या कोण साहित्य संमेलन म्हणाल काय..?? अन मला सांगा सगळ आलबेल असलं तर मग नारेबाजी काश्यापाय झाली..?? तुकाराम ज्ञानेश्वरांपासून सुरवात करायची अन नुसतीच दंगामस्ती करायची हे तुम्हास्नी पटतंय का..?? त्या परिस आमच्या चावडी वरचा गोंधळ बरा म्हणावा अस म्हणायची येळ आली आता..खर हाय का नाय मास्तर..??
चांदोबा मास्तर : हो रे चकोरा हे बाकी मुद्द्यांच बोललास तु..चला संमेलनाला जावून काही तरी अक्कल आली हे काय कमी आहे...
चकोर : मग मास्तर विद्यार्थी कोणाचा हाय..नुसताच जाउन नाही आलो मास्तर..कमाई करून आलो...
चांदोबा मास्तर : काय म्हणतोस चकोरा..?? कशी काय केली रे कमाई..??
चकोर : त्याच अस झाल मास्तर..इतकी मोठी मोठी लोक येणार मंग म्हटलं वडा पावची गाडी टाकू.. लई जोरात चालल..अन काय सांगू मास्तर आपली तर लॉटरीच लागली ना..तुम्हास्नी म्हणून सांगतो मास्तर..भोजनाच्या कुपन आपल्याच गाडीवर मिळत हूत्या ना..!!
चांदोबा मास्तर : ते कस काय रे चकोरा..??
चकोर : त्याच काय हाय मास्तर फुकट वाले पास हुते ना जे जेवणाचे.. ते आले माझ्या गाडीवर कमिशन वर.. अन तिकडे समद्यास्नी सांगितलं पास संपले म्हणून..मग काय गाडीवर एकचं झुंबड उडाली..बक्कळ पैसा कामीवला..आता मास्तर रातच्याला वाड्यावर पार्टी आपल्या तर्फे बर का..संकोच करायचं काम न्हाय..चकोर आपलाच विद्यार्थी हाय..बरंय मी निघतोय आता..तुम्ही लागा तयारीला..भेटूच पुढ्या संमेलनाला..काय...??

*चकोर*

https://www.facebook.com/pages/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97/274730592665311