Tuesday, 1 March 2016

II संमेलन ते संमेलन II

II संमेलन ते संमेलन II
(भाग : १)
==============
स्थळ : चांदोबा गुरुजींची शाळा...
(शिरस्त्याप्रमाणे चकोर आजही शाळेत उशिरा येतो..)
चकोर : म्या आत येऊ गुरुजी..??
मास्तर : या आलात..?? झाडा पायधूळ वर्गात उपकार होतील आपले...(चकोर आत येणार इतक्यात मास्तर त्याला थांबवत) थांब कुठे चाललास..
चकोर : अहो अस काय मास्तर जागेवर जातो...
चांदोबा मास्तर : थांब तिथेच..आधी सांग तुला दररोज उशीर का होतो..आणि हल्ली..?? मी पाहतोय तुझ्या दांड्या सुद्धा वाढत चालल्या आहेत..?? काय चाललय काय नक्की..??
चकोर :आहो मास्तर..ती एक लई मोठी स्टोरी हाय..समद सांगतो..अदुगर मला आत एव द्या..मंग सांगतो..
चांदोबा मास्तर : बर ये आणि सांग बघू काय तुझी स्टोरी आहे...
चकोर : तर मास्तर त्याच अस हाय की..म्या तुमास्नी म्हटलं हुत ना..हल्ली मला कविता लई आवडते..तिच्या नादान हे समद घडतंय..
चांदोबा मास्तर : अरे कवितेचा आणि तुझ्या दांडी मारण्याचा संबंध काय..?? काही तरी थापा मारू नको..
चकोर : आईच्यान खर सांगतो मास्तर..चार दिस म्या काव्यदिंडी काय व्हायली..लोक मला कवी समजू लागले..अन साम्मेलानाला बोलावू लागले..म्या म्हटलं चला आपण भी भाव खावून घेवया..मग तथ गेल्यावर इथ वर्गात कस काय येणार मास्तर..?? आता तुम्हीच सांगा दांड्या होणार न्हाय तर काय..??
चांदोबा मास्तर : अरे पण दांड्या मारून संमेलनाला जायला कोणी सांगितलं..?? बर गेला ते ठीक पण डोक्यात काय प्रकाश पडला की नाही..?? की नुसताच कोरा..कागद राहिला..??
चकोर : आस कस म्हणता मास्तर..म्या तुमचा शिष्य हाय..शिकल्या बिगर राहायचा न्हाय...
चांदोबा मास्तर : इथे बोललास ते ठीक पण बाहेर कुठे बोलू नको..काय आहे लोक माझ्या तोंडात शेण घातलील रे..म्हणतील कसला अवली शिष्य घडवला मास्तरांनी..
चकोर : मास्तर टोमण मारायचं काम न्हाय..आम्हास्नी बी टकूर हाय.हा आता तुमच्या वाणी नाय..पण सरस हाय...
चांदोबा मास्तर : बर बर..जास्त अक्काल पाजळू नको..
चकोर : बर तर बर..राहील..माझ्या बा च काय जातंय..पुन्यांदा इचारू नका आपण काय बी सांगणार न्हाय..
चांदोबा मास्तर : अरे सोन्या मला अस म्हणायचं आहे की, तू तिथे जाउन शिकला काय..ते तरी तरी कळू दे..
चकोर : त्याच अस हाय मास्तर..चार पाच ठिकाणी गेलो..प्रत्येक ठिकाणी येगळा अनुभव...लई भारी...
चांदोबा मास्तर : अरे वा कळू दे तरी काय भारी होते ते..??
चकोर : त्याच काय हाय मास्तर.. पहिल्यांदा एका संमेलनाला गेलो तिथ समद लई बेस होत..लई झ्याक यवस्था हुती..आपली तरुण मंडळी भारी उत्साही...काय फेटे घालून होते मास्तर अस वाटत हुत बघतच राहावं..लई आदरान वागवल तिथ.. अध्यक्षांच भाषण भी लईभारी हुत.समदयात बेस्ट तिथला तरुण तडफदार म्होरक्या..
चांदोबा मास्तर : म्होरक्या..?? कोण म्होरक्या...?? अन काय केल त्याने..??
चकोर : म्होरक्या म्हणजे..ते काय म्हणतात ते..हा प्रमुख..ज्यान ह्या संमेलनाच नियोजन का काय म्हणतात ते केल हुत..लई भारी त्याची सप्न..परदेशवारीची नोकरी सोडून म्हणला ह्या मातीची सेवा करायची हाय...म्हणून शान त्यान ते online का काय म्हणत्यात ना..ते पब्ली..पब्ली..काय बर तो शब्द..??
मास्तर : पब्लिकेशन असेल...
चकोर : हा बरोबर प्रकाशन...त्याच नव दालन उघडलंय...तिथ तुम्हाला नवीन जुन्या कवितांच अन लेख, कथा, कांदबरी आस समद एका ठिकाणी वाचायला गावनार हाय...हाय का नाय लई भारी...??
मास्तर : वा वा चकोरा छान माहिती दिलीस..आजची तरुण पिढी साहित्याबद्दल फारच सजग दिसतेय..
चकोर : तर हो मास्तर..पण एक खटकल मास्तर..
चांदोबा मास्तर : आता काय खटकल....
चकोर : कार्यक्रम लई भारी हुता पण खटकल अस की जे अध्यक्ष येतात ते नेहमीच घाईत का हो असत्यात..??
चांदोबा मास्तर : अरे असेल काही काम त्यांना..
चकोर : बरं मानल मास्तर तुमचं एकांद्या येळी असल काम.पण मंग दुसऱ्या एका ठिकाणी गेलो तिथ बी तीच बोंब..
चांदोबा मास्तर : म्हणजे ते सुद्धा अर्ध्यावर सोडून गेले..??
चकोर : तर हो मास्तर..तेच तर सांगतोय तुमास्नी..
चांदोबा मास्तर : काय म्हणतोस काय चकोरा.. मला सुद्धा कळू दे काय आणि कस असते हे संमेलन..
चकोर : हा तर मास्तर अस बघा..पहिल्या येळी अध्यक्ष त्यांच भाषण करून गेले..कविता अशी हवी कविता तशी हवी..लांबलचक लेक्चर दिले..अन कलटी मारली..
चांदोबा मास्तर : मग..??
चकोर : मंग काय मास्तर बाकीचे बोंबलले..दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथ बी तेच..कोण मोठ गझलाकार आले हुते..ते म्हणले म्या समद्यांच्या कविता ऐकणार हाय..समाद्यांची पाठ थोपटणार हाय...
चांदोबा मास्तर : अरे वा मग पुढे काय झाल..??
चकोर : कसलं काय मास्तर..पाठ थोपटायच सोडा मास्तर..ऐकल्या की न्हाही ते सुद्धा सांगता यायच न्हाय..ते आपल्या गप्पात रंगले हुते..अन नवोदित कावितेत दंगले हुते..कुठूनसा फोन आल्याच निमित्त झाल..अन अध्यक्ष गुल झाल..
चांदोबा मास्तर : काय सांगतोस काय चकोरा..??ऐकावे ते नवलच..पण हि वृत्ती बरोबर नाही चकोरा..
चकोर : तेच म्हणतोय म्या बी..तुमास्नी येळ न्हाई मंग आदुगर सपष्ट करायचं हुत..उगाच नवोदितांना आशेवर झुलावायाच ते कशा पाय..??
चांदोबा मास्तर : बरोबर आहे चकोरा..नवोदित मोठ्यांचे विचार ऐकायला येत असतो..त्याच बरोबर व्यासपीठावर अपल्या विचारांच सादरीकरण मान्यवरांसमोर करून मिळालेल्या संधीच सोन करण्याच्या उद्देशाने तिथे येत असतो..ती संधीच जर अशा तऱ्हेने मातीमोल होत असेल तर..त्या अध्यक्षपदाला आणि त्यांच्या मोठेपणाला काय अर्थ उरतो..??
चकोर : अक्षी बेस बोललात मास्तर..हे अस होतंय सामादिकडे..हेला बी काही अपवाद हैत मास्तर..अस बी काही अध्यक्ष असत्यात जे समद्यासनी येळ देत्यात..समद्यांच्या कविता मन लावून ऐक्त्यात..त्यांना शाबासकी पण देत्यात.. अन कान भी उपटत्यात ते बी हसत हसत..
चांदोबा मास्तर : बरोबर आहे चकोरा..कान उपटणे सुद्धा गरजेचे असते..पण समोरच्याला न दुखावता..जसे मी तुझे उपटतो..तसेच..निव्वळ वरवरची शाबासकी देवून नवोदिताचा गैरसमज वाढण्याचा संभव असतो..आणि मग सुधारणा होण्या ऐवजी बिघाड होण्याची शक्यता जास्त असते..
चकोर : हो मास्तर..म्हणून तर मी तुमास्नी कधी उलटून बोलत न्हाय..पण कावा कावा इनोदान..
चांदोबा मास्तर : (चकोरास मधेच थांबवत) पुरे..कळल..पुढे काय झाला ते सांग..
चकोर : आणखी एक मास्तर चार पाच ठिकाणी गेलो..समदे कवी भारी पण एक गोष्ट खटकली मास्तर..
चांदोबा मास्तर : (कपाळास आट्या पाडत) आता आणखी काय खटकल..??
चकोर : तेच सांगतोय मास्तर मधे मधे दिष्टरब करू नका..
चांदोबा मास्तर : दिष्टरब नाय रे चिटोऱ्या डिस्टर्ब..
चकोर : तेच ते मास्तर..तुमास्नी कळल ना..?? मंग बेस हाय..काय सांगत हुतो म्या..??
चांदोबा मास्तर : अरे काही तरी खटकल म्हणालास ना..मग काय खटकल ते सांग..
चकोर : तेच सांगतोय मास्तर..त्याच्काय हाय.. समदे कवी लई भारी..पण एकचं कविता सामादिकड का म्हनत्यात ते न्हाय कळल..म्हणजे बघा एकीकडे एखाद्या कवितेच कौतिक झाल की मंग तीच कविता समादिकड म्हणत्यात..
चांदोबा मास्तर : मग त्यात चुकीच ते काय..?? प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष तर वेगवेगळे असतात ना..??
चकोर : हो मास्तर अध्यक्ष येगळे असत्यात पण कवी समदे तेच असत्यात नव्ह.. ऐकून ऐकून कान किटत्यात..
चांदोबा मास्तर : तुझ पण बरोबर आहे चकोरा..कवी म्हटलं की विविधता हवीच..निव्वळ कौतुक करून घेण्यासाठी तीच कविता सारखी म्हणण्यापेक्षा..प्रत्यक वेळेस काही वेगळे देता येईल का ह्याचा विचार करणे उचित होईल..भले एखादे वेळेस कौतुक नाही होणार..पण काही वेगळे मांडल्याचे समाधान नक्कीच लाभेल..आणि न जाणो तुमच्या नवीन प्रयोगाला सुद्धा उत्स्फूर्त दाद मिळेल..म्हणून माणसाने नेहमीच प्रायोगशील आणि प्रयत्नशील असायला हवे..चुकले तरी हरकत नाही..निदान प्रयत्न तरी करायलाच हवेत..तुला सुद्धा हाच सल्ला बर का चकोरा..नुसत्याच खोड्या काढण्यापेक्षा..काहीतरी लिहा..चांगल घ्या..चांगल द्या..कळल का..??
चकोर : होय मास्तर..म्या तुमचाच शिष्य हाय..
चांदोबा मास्तर : म्हणूनच तर सांगावं लागतंय..आता जागेवर बसा..बाकीच रामायण आपण नंतर ऐकू..आता जरा अभ्यासाकडे वळा..
चकोर : (मनात) च्यामारी माझंच बुमारयाग माझ्यावरच उलटतंय ..
चांदोबा मास्तर : आता बसतोस का शाल श्रीफळ देऊ..
चकोर : होय मास्तर..
(चकोर चरफडत जागेवर बसतो)
क्रमशा :
**********सुनिल पवार....

No comments:

Post a Comment