Wednesday, 3 June 2015

II खेळ ६४ घरांचा II

II खेळ ६४ घरांचा II
**************
 एक असतो राजा,
ना कसली घाई त्याला..
एक एक घर घेत,
चहु ओर फिरला..
येता टप्प्यात शत्रु,
नकळत गारद केला..
पण घाबरतो हां
प्रत्येक प्याद्याला..!!


एक असतो वजीर,
कुठेही हजर..
चाल करून जाई
शत्रूवर भराभर..
वाटेत जो आला
आडवा कर त्याला
संचार ह्याचा चहुओर
सर्वत्र 64 घर..!!

एक असतो ऊंट,
जशी वाकडी भिंत
तिरकी ह्याची चाल,
करे शत्रूस भयभीत..
मार्ग न बदले कधी,
न सोडे रंगसंगत..
राजाच्या दिमतीला,
असते उंटाची पंगत..!!

एक असतो घोड़ा,
असा दुडदुड धावला
अडीज घराच्या चालीत,
चौखूर तो उधळला..
कळेना कधी शत्रूस,
हा नक्की कुठून आला
कळण्या आधीच काही,
त्याचा कार्यभाग संपला..!!

एक असतो हत्ती,
अति विशाल काय
असता तो जवळी,
भीती राजास नाय..
संकटाच्या समयी
नेमका (कैस्लिंग) धावून जाई
येईल जो मार्गात,
त्याची धडगत नाही..!!

एक असतो प्यादा,
सैनिक असे खंदा..
दिसला जरी साधा,
बलाढ्य त्याचा इरादा..
रूप बदलतो बेमालूम
उडवतो शत्रुचा धुव्वा.
64 घरांचा असतो
हाच रूपया बंदा..!!

सुख दुखाःची जशी
असावी ओली भेळ
64 घरांचा असतो
तसाच संघर्ष खेळ..
खडतर जीवन पटावर
देतो जगण्यास नवे बळ..
तुम्हा आम्हा परिचित
नाव त्याचे बुद्धिबळ..!!
*******सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment