|| पावसाची गाणी ||
===========
म्हटलं तर पाऊस,
म्हटलं तर पाणी..
भरलेल्या आभाळाची
समजून घे तू वाणी..!!
किती घालशील बांध
किती अडवशी पाणी..
तरी ओघळतो थेंब
घेता मिटून पापणी..!!
देता चाहूल क्षणाची
विचलित तू विराणी..
कसे ठरेल पाऊल
बरसता तो अंगणी..!!
वारा चंचल गंधित
वार्ता सांगे कानोकानी..
अंतरात लपलेली
लख्ख दिसे सौदामिनी..!!
मिटणार ना कधीही
काळजावरील लेणी..
युगायुगांची कहाणी
गाती पावसाची गाणी..!!
--सुनिल पवार...

No comments:
Post a Comment