Thursday, 31 December 2015

|| मिटल्या पापण्यांतुनी ||

|| मिटल्या पापण्यांतुनी ||
=●=●=●=●=●=●=●=
तुझ्या घनपर्ण छायेत
घड़ीभर असा विसावतो मी
हिरव्या पानाच्या मायेत
दवबिंदु जसा समावतो मी..!!

नीरव निशेच्या कुशीत
चांदण्यात मुक्त विलासतो मी
देखोनी चंद्र नाभिचा तो
मुखचंद्रमा सुप्त अभिलाषतो मी..!!
रातराणीचा मदमस्त बहर
दरवळता धुंद नादावतो मी..
श्वास श्वासात विरुन
चैतन्य गंध जाणवतो मी..!!
ज्वर चढे रात्रीस असा
बेभान वारा जसा वाहतो मी
मिटल्या पापण्यांतुनी
स्वप्न सितारा पाहतो मी..!!
****सुनिल पवार...

II मॅसेजची खीर II

II मॅसेजची खीर II
=●=●=●=●=●=
जेथे जातो तेथे
तो त्याच्या सांगाती
मोबाईल हाती
दिसतसे..!!

किती लीन दिसे
सदा खाली मुंडी
काय बरे धुंडी
स्क्रीनवर..!!
हात जसा जोड़ी
अंगठे तो मोडी
लागलीया गोडी
चाँटिंगची..!!
सदा समाधीत
दिसतसे ध्यान
झुकलेली मान
रात दिन..!!
ऐसा तो सज्जन
मोबाईल वीर
मॅसेजची खीर
वाटतसे..!!
***सुनिल पवार...

Thursday, 24 December 2015

|| अवघाची देह ||

|| अवघाची देह ||
===========
अवघाची देह
दत्तमय व्हावा..
त्रिगुण त्रिमुर्ती
अंतरी वसावा..!!

घेवुनी जन्मले
ममतेचे सूत्र..
ब्रह्मा, विष्णु, शिव
अनुसूया पुत्र..!!
वैराग्याची मूर्ति
दिव्य देह धारी..
त्रिशूल डमरू
झोळी खांद्यावरी..!!
पुढे श्वान शोभे
मागे धेनु न्यारी..
पाषाणी बैसले
गुरु ध्यानधारी..!!
रुद्राक्षाच्या माळा
शोभे दिव्य गळा
करुणा सागर
देव भक्त भोळा..!!
ऐसे गुरु देव
दत्त दिगंबर..
कृपेची सावली
व्यापून अंबर..!!
विभूती अंगारा
तुमचा प्रसाद..
स्विकारतो देवा
द्यावा आशीर्वाद..!!
***सुनिल पवार...✍🏼

Wednesday, 23 December 2015

II खोलात की अंतात II

II खोलात की अंतात II
=●=●=●=●=●=●=●
माझ्याच वेदनेचे वादळ
उध्वस्त करते मनास माझ्या..
आवरू पाहतोय आवरे ना
आठवणीत जे वाहातंय तुझ्या..!!

आशंकांचे काळे ढग
व्यापून राहतात अंगणात माझ्या..
काहूरांचा पाऊस थमेना
आठवणीत जो बरसतोय तुझ्या..!!
अनंत प्रश्नांचे अनुत्तरीत कोंब
फुलतात नाहक अंतरात माझ्या..
किती खुडपले खुडपेंना
आठवणीत जो तो रुजतोय तुझ्या..!!
विचारांच्या झाल्या चिखलात
मी उभा असा एकांतात माझ्या..
खोलात की अंतात कळेना
आठवणीत कोण ओढतोय तुझ्या..!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
**********सुनिल पवार......

|| बोलणार नाही ||

|| बोलणार नाही ||
=●=●=●=●=●=
काहीच तसे बोलणार नाही
मी शब्द उगा तोलणार नाही..!!
नको वाजवु तू पुंगी मदारी
नाग बहिरा डोलणार नाही..!!
किती करशील वेडे बहाने
मी मन तुझे मोडणार नाही..!!
का लपवतेस भांडे सुखाचे
मी विष त्यात घोळणार नाही..!!
जाणतो मी भावना मनाच्या
उगाच त्यास टटोलणार नाही..!!
हवे कोणास दाखले कशाचे
मी संदर्भ तसे जोड़णार नाही..!!
◆◆◆◆◆◆◆◆●◆◆◆◆
******सुनिल पवार......

Friday, 18 December 2015

|| पुनश्च मी सज्ज ||

|| पुनश्च मी सज्ज ||
=●=●=●=●=●=●=
त्या शब्दांच्या चक्रव्यूहात
मी स्वतःच फसत जातो
वेदनेच्या दलदलीत धसत जातो
लढतोय जणू स्वतःशीच
अभिमन्युस घेवून पाठीवर
पुन्हा मागे न येण्यासाठी..!!


रीते करतोय शब्द भंडार
चढवून कवच कुंडल भावनांचे
नसलेल्या प्रक्तानाच्या लक्तरांचे
लढतोय कोणत्या दिव्यत्वाशी
कर्णास घेवून पाठीवर
नसलेलं औंदर्य जपण्यासाठी..!!

नीती अनीतीच्या पारड्यात
जोखतोय नात्यांचे कांगोरे
पिटतोय आशंकांचे धिंडोरे
नरो वा कुंजरोवा जपत
धर्मास घेवून पाठीवर
कुरुक्षेत्री रण जिंकण्यासाठी..!!

ही कोणती अघोरी तपस्या
शोधतेय तिमिरात भक्ष
वेधू पाहतेय आंधळे लक्ष
भळभळत्या जखमेस पूसत
अश्वत्स्थामास घेवून पाठीवर
अंधार लपेटुन घेण्यासाठी..!!

गलितगात्र जरी आयुधे
गीतेस ठेविले स्मरणात
स्पुल्लिंग भरून मनात
करून शंखनाद पुनश्च मी सज्ज
श्रीकृष्णास घेवून पाठीवर
समरांगणी लढण्यासाठी..!!
******सुनिल पवार....

Monday, 14 December 2015

|| मी मूक ||

मी मूक..
पटत नाही मनास
की कागदावर वेदना मांडावी।
म्हणूनच ठरवलंय
मार्गातल्या खुंट्यानेच जीवनास गती द्यावी।
कोणी किती मारायचे ओरखडे
भरून पापाचे घड़े।
वाळू तर निसटते हातातून
पण त्याच पंक्तित दिसतात खडे।
घायाळ मनावरचे
शोषून घेतो जो तो रक्त।
बहुतेक रक्त पिपासु दिसतात
अहिंसेचे निस्सीम भक्त।
ही कोणाची पिल्लावळ म्हणावी
जी दिखाव्याची वळवळ करतेय।
तसे देणेघेणे कोणास नाही
पण मतलबाची चळवळ दिसतेय।
मी लज्जित झालो मूक झालो
पाहुन तयांची थोर थेरे।
आता वाटतेय बंद करावी मी
माझ्याच मनाची संवेदनशील दारे।
--सुनिल पवार..

Saturday, 12 December 2015

II मुर्खांचा दरबार II

II मुर्खांचा दरबार II
=============
भासवती स्वतःस ते
बिनीचा शिलेदार..
पाहिला असाच मी
मुर्खांचा दरबार..!!

ना पेलविले कधी
यत्किंचित शब्दहार..
मिरवले गळ्यात तेच
अभिमानाचे हार..!!
दृष्टीभ्रम होता तो एक
प्रकाशाचा संचार..
अंतरी वाहतोय कुट्ट
ओसंडून अंधार..!!
घेतात तोंडसुख ते
फेकती शब्दांगार..
अभिव्यक्तीचा कोडगा
चेततो शृंगार..!!
स्वानुभव म्हणती त्यांचा
दांडगा अपार..
खाती गटांगळ्या घेत
काडीचा आधार..!!
वाटतात तयांस त्यांचेच
थोर उच्च विचार..
करू इच्छितो मी ही त्यांना
कोपरातून नमस्कार..!!
******सुनिल पवार....

Tuesday, 8 December 2015

|| कैफियत मनाची ||

|| कैफियत मनाची ||
==============
रोजच येते आठवण जरी,
ना बोलणार काही..
होवोत किती यातना मनास,
मौन खोलणार नाही..!!

त्या क्षणांच्या चकव्यात पुन्हा,
ना फसणार काही..
माझ्या मनाच्या चौकटीत,
मीच बसणार नाही..!!

लाभेना का सुख स्वर्गीय,
ना उपभोगणाऱ काही..
वाळवंटाची तृषा माझी,
थेंबाने अशी भागणार नाही..!!

असोत कितीही मतभेद मनाचे
ना भेद राहणार काही..
कळतील कधी भाव मनाचे
नाउमेद मी होणार नाही..!!
******सुनिल पवार....

Monday, 7 December 2015

|| सरिता ||

|| सरिता ||
πππππππ
दूर किती राहशील
परतून तू येशील..
आठवांच्या पावसात
तू चिंब चिंब न्हाशील..!!

फुटेल जेव्हा पालवी
तव कोरड्या मनाला..
आवेगाने दौडशील
तू सामावण्या क्षणाला..!!

तटस्थपणा माझा ग
नाही तुज जमणार..
रुक्षपणाचे सोंग तू
किती काळ धरणार..!!
सागराची आर्त गाज
ना व्यर्थ कधी जाणार..
जरी दूर सरिता तू
सागरास मिळणार..!!
****सुनिल पवार.....

|| भरला घड़ा ||

|| भरला घड़ा ||
■◆■◆■◆■◆■
काय अर्थ उरतो हो बेताल बोलण्याला..
नसे धरबंध कुठे तो त्यांच्या वागण्याला..!!
ते एकजात कर्मठ अंध सारेच धर्माचे
ना दृष्टिकोण काही त्यांच्या पाहण्याला..!!
ओकतात गरळ नित्य रसाळ वाणीतून
अमृत मानु कसे मी, त्यांच्या सांगण्याला..!!
सछिद्र रांजण एक एक सडक्या मातीचे
प्रत्येक भरला घड़ा घेतला फोडण्याला..!!
येतील रावण कैक सीता हरण्यास नित्य
प्रत्यंचा ओढली मी, ती नाभी भेदण्याला..!!
किती जन्म झाले ना कळलेच कोणाला
एक नवा आयाम मिळो त्यांच्या जगण्याला..!!
*****सुनिल पवार.......

|| तू अन मी ||

|| तू अन मी ||
=========
तू बंदिस्त सिद्धांतात
मी मुक्त आसमंतात..!!

तू प्राजक्त अंगणात
मी आसक्त सुमनात..!!

तू असते संभ्रमात
मी हरवतो प्रेमात..!!

तू मोहरते मनात
मी आतुरल्या क्षणात..!!

तू बोलतेस मौनात
मी उत्साही वदनात..!!

तू रती एक साक्षात
मी लुब्ध मदनबाणात.!!
****सुनिल पवार....

|| करणी ||

|| करणी ||
=======
करणी माणसाची ती
अन दोष देवाला
त्यांचा असतो तो धर्म
अन आमचा नावला..!!


कोण दगड म्हणतोय
कोण शिव्या देतोय
कुठले संदर्भ जोडून
मनाच्या ओव्या म्हणतोय..!!

कळत नाही त्याला
त्याचा तोल ढळतोय
दुसऱ्याच्या धर्मावर तो
आकसापोटी जळतोय..!!

सर्व धर्म समभाव
असही तोच म्हणतोय..
दुखणे मग कसले
तो कशाला कण्हतोय..!!

कसली ही मानसिकता
काय मिळवू पाहतेय..
दुहिच बीज नव्याने
मातीत रुजू पाहतेय..!!
*****सुनिल पवार.....

II आठवणीच्या पानास II

II आठवणीच्या पानास II
================
प्रत्येकाच्या मनात असतो
पाऊस दाटलेला..
आठवणीच्या पानास तोच
जलबिंदु खेटलेला..!!


आयुष्याच्या वळणावर एका
अनपेक्षित भेटलेला..
मनास उलथवणारा कधी
अलवार नटलेला..!!

अवीरत कोसळणारा जसा
इरेला पेटलेला..
मूक राहतो अवचीत तोच
हुंदका फुटलेला..!!

रेंगाळतो मन मनात तो
पाऊस निसटलेला..
पागोळ्यातुन ओघळलेला
मी ओंजळीत समेटलेला..!!
******सुनिल पवार.....

Sunday, 6 December 2015

|| एक सुर्य ||

|| एक सुर्य ||
★★★★★
जातियेतेच्या तिमिर सारा
मनमनात होता अंधार दाटला..
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने  पेंटून उठला...!!
दलदल होती जिकडे तिकडे
बहुजन होता गाळात रुतला..
कमळ फुलवले तयात लीलया
वंचितांस असा देव भेटला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
प्रवेश निषिद्ध होता मंदिरात
त्या देवासही निषिद्ध केला..
फेकुन वल्कले धर्माची बेगड़ी
समतेचा नवा पेहराव चढवला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
बामण होता डुबक्या मारत
पाण्यास दलित होता मुकला..
पेटविले पाणी चवदार झाले
धर्माभिमानी आपासूक् झुकला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
संविधान रूपी ग्रंथ लिहला
जातीयतेचा तिमिर मिटला..
एक नवा इतिहास घडला
समतेने सारा देश नटला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
🙏महामानवास विनम्र अभिवादन🙏
*****सुनिल पवार.....

Tuesday, 1 December 2015

|| अंधश्रद्धेचा पेढ़ा ||

|| अंधश्रद्धेचा पेढ़ा ||
=============
काय तर म्हणे लोकहो देव बाटला..
अंधश्रद्धेचा पेढ़ा त्याने लोकांमधे वाटला..!!

स्त्रीने स्पर्शिला म्हणत न्हाऊ माखु घातला..
थारा कसा मिळतो अशा अनिष्ट कृत्याला..!!

कोसायचे ना नरा तुझ्याही नापाक जन्माला..
तिच्याच उदरातून तू जन्म जो घेतला..!!

आदि शक्ती म्हणत तू बसतोस ना पूजेला..
अर्थ काय उरतो तुझ्या दुटप्पी वागण्याला..!!

पुरुषी अहंकाराची झापड़ तुझ्या डोळ्याला..
घाण्याचा बैल जसा सजतोय मात्र पोळ्याला..!!

देव भक्तीचा भुकेला नसे थारा दूजेपणाला..
उन्मत्त तुझ्या कृत्याने तो देव असेल लाजला..!!

*****सुनिल पवार.....


Monday, 30 November 2015

II गर्दीतले श्वापद II

II गर्दीतले श्वापद II
============
ट्रेनचा तो प्रवास होता
धकाधकीचा ज़रा होता..
न्याहाळता सहज आसपास
एक बोका गर्दीत लापला होता..!!


पाहिले ज़रा निरखुन त्याला
तो इकडे तिकडे पाहत होता..
त्याच्या नजरेतला भाव तो
जाता मनातून जात नव्हता..!!

ओसरताच मग गर्दी जराशी
भेद त्याचा खुलला होता..
नजरेतला श्वापद त्याच्या
अंगाशी तिच्या भिडला होता..!!

थांगपत्ता नव्हताच काही तिला
तो नजरेने असा शोषित होता..
अंध समाज आसपास सारा
नकळत त्या पोषित होता..!!

टाकला एक कटाक्ष जळजळीत..
तो मनोमन चरकला होता..
शेपुट घालून मग कुत्र्यागत
तो हळूच मागे सरकला होता..!!

गर्दीतले हे असे श्वापद
कळणार नाहीत कोणास सहज..
खुल्या नजरेने वावरु जगी
सुरक्षतेची ती आहे गरज..!!
*****सुनिल पवार.....

|| कभी कभी ||

|| कभी कभी ||
=========
कभी कभी हसीं गुन्हा
करने को जी चाहता है--
रूबरू हो जावु उनसे
के मरने को जी चाहता है-!!


सिले सिले होट मगर
कुछ कहने को जी चाहता है--
आँखों आंको में बतलादु
के बहने को जी चाहता है--!!

राह अंजानी सही
पहचानने को जी चाहता है;-
हमसफ़र बन जाओ अगर
साथ चलने को जी चाहता है--!!

हर घडी हर लमहा
इंतज़ार करने को जी चाहता है--
वोह बेखबर ही सही
के प्यार करने को जी चाहता है--!!
******सुनिल पवार-----

शब्दशृंगार

शब्दशृंगार..
मिटल्या पापण्यातून
ती अवचीत येते।
माझ्या सुप्त मनोराज्यात
ती नकळत वावरते।
कळेना मज काही
ती काय जादू करते।
माझ्या निद्रिस्त मनास
ती नवसंजीवनी देते।
मग अंधार उसवत जाता
ती हळूच निघून जाते।
मी नेत्र उघडतो जेव्हा
ती पहाट होऊन येते।
ती स्वप्न, ती उर्मी
ती निरंतर सोबत असते।
माझ्या अंतरीच्या बोलीचा
ती शब्दशृंगार होते।
--सुनील पवार..

|| नजरबंदी ||

|| नजरबंदी ||
=========
किती समजावु मना
ऐकनार तरी कधी..
घालावी ग गळ किती
माने ना विनंती साधी..!!


डसे इश्काची इंगळी
ठेचावी ती किती नांगी..
वादळ घोंगावे ते मनी
दिसे शांत वरपांगी..!!

नाही दोष माझा काही
केली अशी तू नजरबंदी..
झालो जन्माचा ग कैदी
केले प्रेमास मी फिर्यादी..!!

आता दे सजा काहीही
प्रिये घाल प्रेम बेडी..
कैदी तुझ्या नजरेचा मी
अन प्रीत ही माझी वेडी..!!
******सुनिल पवार....

।। सुप्रभात ।। शुभ सकाळ ।।

।। सुप्रभात ।। शुभ सकाळ ।।
===================
उजळित दिशा
दिनकर उगवला..
फुलांच्या देशा
बहर आला..!!


पाकळी उमलली
प्रेमे बहरली..
मधुरस टिपण्या
पाखरे भिरभिरली..!!

किरण कोवळी
अलवार उतरली..
सुवर्ण कांती
दवबिंदु ल्याली..!!

छेडित स्वरसाज
भिरभिरला वारा..
मोहरल्या मनास..
शिशिर शहारा..!!

खुणावितो मज
पहाटेचा नजारा..
स्वर्गीय सुख
उतरले भुवरा..!!
*****सुनिल पवार....

Monday, 23 November 2015

|| कवी आईना ||

|| कवी आईना ||
==========
कळे ना मज
काय असतो कवी..
त्याच्याही मनाची
चाचणी घ्यायला हवी..!!


पुन्हा त्याच शब्दात
का फसतो तो कवी..
कधी तरी वाचावी
त्याने एखादी नवी..!!

जगास नवा आईना
दाखवे तो कवी...
त्यात आपली छबी
ज़रा परखुन पहावी..!!

म्हणाल तुम्ही आता
मला सुद्धा कवी..
त्यातलीच एक प्रत
आता मला तुम्ही द्यावी..!!
*****सुनिल पवार......

|| अन म्या बी कवी झालो ||

|| अन म्या बी कवी झालो ||
=================
काय सांगू राव लई झ्याकं झाल
मन माझ भरून पावल..
संमेलनाला काय गेलो
अन म्या बी मोठा कवी झालो..!!

इचारा तर खरं
कसं गॉड झाल कारलं..
कंची कविता म्या म्हणलं
आसं काय तीर मारलं..!!

आहो काय सुदीक केलं नाय
फकस्त धरल त्यांच पाय..
म्हणलो आहो सर सर
तुम्हासंग एक फोटु हवाय..!!

एका मागन  एक मग
म्या फोटु काढत गेलो..
दिग्गजांच्या संगतींन
म्या तुम्हास धाडत गेलो..!!

म्हणले तुम्ही वाह वाह
गाजीवलं मैदान पठ्ठयानं..
वर करून आंगठे बापहो
लाईक दिल गठ्ठयानं..!!

आता म्या कई बी लीहतो
जो तो मले कवी म्हणतो
संमेलनावर संमेलन गाजवतो
कारण...
त्या फोटुच म्या गमक जाणतो..!!
****सुनिल पवार.....

Friday, 20 November 2015

तुम्ही आम्ही / आम्ही तुम्ही

तुम्ही आम्ही / आम्ही तुम्ही           
==================
तुम्ही दया
आम्ही घेतो
फटका पसा
काही सांडतो..!!

तुम्ही मांडा
आम्ही जुळवतो..
काही राखतो
काही कळवतो..!!

तुमचे विचार
आमचा प्रचार..
एका कळीवर
सर्वत्र संचार..!!

तुमचे मनोगत
आमचे स्वगत
घेतो समजून
करतो अवगत..!!

तुमचे शब्द
आमचे शब्द
कधी बोलतात
कधी स्तब्ध..!!
***सुनिल पवार...


Wednesday, 18 November 2015

|| सांजसावल्या ||


सांज सावल्या...
दाखवित वाकुल्या त्या दूर निघुन गेल्या..
अंधारल्या दिशा दिशा विरल्या सांजसावल्या..!!
रंग भरून मनात होते क्षितिज रंगलेले
भासातले मिलन स्वप्न अधूरे भंगलेले..!!
चांदण्यांच्या नीलसेजी चंद्र मजेत खेळतो..
खेळ कलेचा कलेचा नित्य मनास छळतो..!!
अंधारल्या वस्त्यातून उसवत गेल्या वाटा
स्तब्ध अजुन किनारा झेलीत असंख्य लाटा..!!
--सुनिल पवार...✍️

Monday, 16 November 2015

|| डोळे जुल्मी गड़े ||

|| डोळे जुल्मी गड़े ||
============
का म्हणते मन हे माझे
डोळे तुझे जुल्मी गड़े..
काय बोलतात हे डोळे
उलघडे ना मजला कोड़े..!!

गहराईत डोळ्यांच्या
हरवले मन माझे वेडे..
कसले कयास लावू
ह्रदय गुंतले बापुड़े..!!

पाहता तव डोळ्यात
ठोक्यात ह्रदय धड़धड़े..
पाणीदार नयानांवर
प्रीत माझी वेडी जड़े..!!

कसे म्हणू सांग सखे
डोळे तुझे जुल्मी गड़े..
तुझ्या ह्याच नयनांनी
साज नवा स्वप्ना चढ़े..!!
******सुनिल पवार....

Friday, 13 November 2015

|| फुगली बाई करंजी ||

|| फुगली बाई करंजी ||
==============
फुगली बाई करंजी
मनात घाली रुंजी..!!
तिला भेटली शंकरपाळी
खुसखुशीत भारी मधाळी..!!
धम्मक पिवळा चिवड़ा
नमकीन जसा मनकवडा..!!
नटुन आला अनारसे
खसखस पिकली गोड दिसे.!!
वाकडी गोल चकली
तिखट मिठाने माखली..!!
डुलकत आला लाडू
आधी त्याचा फडश्या पाडू..!!
आईने सजवले ताटात
सगळेच गेले पोटात..!!
***सुनिल पवार....✍🏼
दिवाळीच्या दोल दोल तुभेच्छा
म्हणजेच *गोड गोड* शुभेच्छा😃

Monday, 9 November 2015

|| शांत हो बाई ||

|| शांत हो बाई ||
===========
मी नुसत म्हटल
शांत हो बाई
खरच शांत झाली अन
आता बोलत नाही काही..!!


हायस वाटलं मनाला
म्हटलं मनात बरं झालं
कळले नाही माझे मलाच
वड्याचं तेल वांग्यावर आलं..!!

7 वाजता उठायाच होत
10 वाजता जाग आली
बोलायला तोंड उघडल अन
कागदावर नजर गेली..!!
अहो 7 वाजले उठा
असं त्यावर लिहल होतं
तिच्या मौनाच अस स्वरुप
मी नव्यानं पाहिलं होतं..!!

आता बोलायचं म्हटलं की
ती एक कागद फडकवते
अन होणाऱ्या घोळाने
माझे काळीज धडधड़ते..!!

मी।म्हणालो म्हणून
तुम्ही नका करू घाई
शांत झाली बाई पण
सुरु झाली हातघाई..!!
😀😀😀
*****सुनिल पवार.....

|| तुरडाळ महिमा ||

|| तुरडाळ महिमा ||
============
जय  डाळी जय डाळी
जय जय तुरडाळी..
अशी कशी झाली तू
बाजारी काळी..!!
जय डाळी जय डाळी...

शेतकऱ्यास भाव
मिळतो चिरीमिरी..
व्यापारी देतोय
हातावर तुरी..!!
जय डाळी जय डाळी..

गगनाला असे
दर हे चढले
साठेबाजीने आता
कंबरडे मोडले..!!
जय डाळी जय डाळी..

सरकारही तुझ्या
प्रेमात पडले..
छापेमारीचे मग
नाट्यही घडले..!!
जय डाळी जय डाळी..

कमळाबाईंने म्हणे
दूकान थाटले..
शोधावे कुठे
नाही सापडले..!!
जय डाळी जय डाळी..

अगाध महिमा तुझा
वर्णावा किती..
तुझ्याच पावली
यावी श्रीमंती..!!
जय डाळी जय डाळी..

जय डाळी जय डाळी
जय जय तुर डाळी..
अशी कशी झाली तू
बाजारी काळी..!!
😀😜😀😜😀😜

****सुनिल पवार....

Thursday, 5 November 2015

|| ती रात्र ||

|| ती रात्र ||
=======
भावनांनी भारलेली
ती रात्र मंतरलेली..
त्या मोहमयी क्षणानी
चांदण्या अंथरलेली..!!

उन्मादी एक नजर
नजरेस भिडलेली..
जादुई नायनांवर
वेडा जीव जडलेली..!!
स्पंदनांचे दोन वारु
वायु वेगे दौडलेली..
बाहुपाशांच्या शिखरी
आवेगाने भीड़लेली.!!
प्रीतकुंड चेतवून
अग्नि श्वासी विरलेली
खुल्या घन बटांतून
मोरपिस फिरलेली..!!
गोडवा अंगी लेवुन
रातराणी बहरलेली..
एक ओढ़ अनामिक
लागून हुरहुरलेली..!!
भावनांनी भारलेली
ती रात्र मंतरलेली..!!
****सुनिल पवार..

Tuesday, 3 November 2015

|| मांजराचार ||

|| मांजराचार  ||
==========
तो अंधश्रद्धाळु माणूस
रास्ता माझा अडवतो..
अन राग मात्र साला
का माझ्यावर काढतो..??

कधी कधी येतो विचार
बोचकारु का माणसास..
आंधळ्या त्याच्या वागण्याला
अद्दल घड़वावी ख़ास..!!

अंधश्रद्धा त्याच्या मनात
शोभा करतो माझी जगात..
वणवण करतो मी खाद्यास
खुपते का रे तुझ्या डोळ्यात..!!

सोड मनाचा वेडाचार
कर विचार तू सारासार..
ज्ञानी तू परी महाअज्ञानी
शिकून घे तू मांजराचार..!!
****सुनिल पवार.....

Monday, 2 November 2015

|| फुल भ्रमर ||

|| फुल भ्रमर ||
============
पाहताच त्या फुला
वेडा भ्रमर भुलला
न कळे काय तो बोले
फूल मुग्ध असे डोले..!!


हसले फूल जरासे
ऐकून गुज तयाचे
कळी कळी उमलता
भ्रमरा वाटे हायसे..!!

लुब्ध भ्रमर फुलाशी
लगट करी हळुवार
लज्जीत सुमन अन
लटकाच प्रतिकार..!!

प्रेमात फुलाच्या त्या
विसरे भ्रमर भान
मिटता चक्षु पाकळ्या
कैद भ्रमर नादान..!!

जरी भ्रमर नादान
जाण तयास ख़ास
ना सोडवी स्वतःस
जपे तया अस्तित्वास..!!
****सुनिल पवार....

Tuesday, 27 October 2015

II समतेची ठेव II

II समतेची ठेव II
==========
होय त्या दगडातही माझा देव आहे..
अनेक नावे परी ईश्वर एकमेव आहे..!!

करू दे ना मला माझी पूजा शांततेत..
तुला सांग आता कशाचे भेव आहे..!!

शांतीचाच पाठ पढवतोस ना रे तु ही..
अंतरात सांग कोणासाठी चेव आहे..!!

काय साध्य होणार रे उडवून रेवड़ी..
जीवन तुझेही तसच उडती रेव आहे..!!

नाही असरदार ते जातीय विष तुझे..
हृदयी माझ्या समतेची ती ठेव आहे..!!
**********सुनिल पवार.........


Monday, 26 October 2015

|| चांद ||

|| चांद ||
======
नभीच्या चंद्रा तू
ढगाआड़ रहा..
माझ्या सवे आहे
माझा चांद तू पहा..!!

तू खेळ नभात
एक माझ्या अंगणात..
चंद्र तोच आहे
का तुझ्याही मनात..!!

नजरेत भरून आहे
ओठी तीच बात..
कोजागिरी दिनी
उजळली चांद रात..!!
*****सुनिल पवार.....

|| एक लाट आठवणीची ||

|| एक लाट आठवणीची ||
=================
त्या पावलावर पाऊल उमटवत
मी सहज वाळुत चालु लागलो..
आठवणीच्या असंख्य लाटांशी
मी संवाद नवा साधू लागलो..!!


विचारले मी,
किती वेळ थड़कणार असे
निर्जीवशा भग्न किनाऱ्यावर..
किती बांधाल घर नवे
कोसळणाऱ्या त्याच वाळुवर..!!

किती ठोठवाल हृदयाचे दार
कितीदा व्हाल प्रेमात लाचार
प्रश्न असेच मनी हजार
वाळुच घर ते कुठवर टिकणार..!!

उत्तरल्या लाटा,
नसेना का तमा त्या कठोर किनाऱ्यास
लाटा मनाच्या नित्य थड़कणार..
भरून ओलावा मन मनाचा
पुन्हा किनाऱ्यास लुभावु पाहणार..!!

कधी ओहटी तर कधी भरती
लाटांच प्रेम अबाधित राहणाऱ..
एक लाट आठवणीची
हृदया समीप येऊन थडकणार..!!
:
एक लाट आठवणीची
हृदया समीप येऊन थडकणार..!!
******सुनिल पवार.....

|| पुरस्कार वापसी ||

|| पुरस्कार वापसी ||
=============
पुरस्कार वापसीवरुन
आता साहित्यकारांत जुंपली..
जखमी झाला कोण
अन कोण काढतोय खपली..!!


आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी
अशीच अवस्था आहे
प्रत्येक दृष्टीकोनाची एक
अजब व्यवस्था आहे..!!

तर्क वितर्क फारच भारी
कुणाच कुत्र कुणाच्या दारी
विद्वानांच्या भन्नाट विद्वतेने
डोक भणभणतय च्यामारी..!!

मढ़याच्या टाळूवर जसे
लागलेत स्वार्थाचे डोळे..
भांडत बसले बोके आपसात
अन माकड़ करतयं भलते चाळे..!!
*******सुनिल पवार.....

Friday, 23 October 2015

|| धर्म म्हणावा का ||

|| धर्म म्हणावा का ||
=============
धर्म म्हणावा का म्हणावी गुळाची ढेप
कारण प्रत्येक मुंगळा घेतोय त्यावर झेप..!!

चिकटुन बसतोय असा ना सुटणार तो कधी..
सुटण्यासाठी केली ना धडपड त्याने साधी..!!

जीव घालवतील पण जाणार नाही खोड..
धर्माचा गुळ म्हणतात आहे फार गोड़..!!

अगाध त्यांच्या विचारांना नाही कसली तोड़
आपण राहावं चिकटून अन दुसऱ्यास म्हणाव सोड..!!

****सुनिल पवार......

|| मी सांभाळतो माझी मड़की ||

|| मी सांभाळतो माझी मड़की ||
===================
उंगली निर्देशाने सांग
तू कुठे साव ठरतो..
स्वतःकडची चार बोटं
तू कसा काय विसरतो..!!


भूतकाळाची झापड़ं
तू कशापाई ओढतो..
आपल्याच बांधवाना
तू अकारण तोडतो..!!

झोपलेला उठेल पण
तू सोंग किती करणार..
सूर्य आला माथ्यावर
तू डोळे कधी उघडणार..!!

साप मरून पडलाय
तू भुई कशास ठोकतो..
फेकून दे ते कातड़
टिमकी कशास बडवतो..!!

उघड आता दार
तू कशास कड़ी लावतो..
अंधारात बसून सांग
कोणास उजेड दावतों..!!

भले असो मी अनाड़ी
तू कर रे PHD
समतेच भरून पाणी
मी सांभाळतो माझी मड़की..!!
******सुनिल पवार.....

|| अबोली बोलली ||

|| अबोली बोलली ||
============
अबोली बोलली अन
कर्ण तृप्त झाले
गोड तिच्या शब्दात
मन लुप्त झाले..!!


किती वेळ गेला
ना वेळेचे भान होते
तिच्या बोलण्यात जणू
सरितेचे उधाण होते..!!

भावनांची मुक्त पाखरे
हृदयी घर करीत होते
उत्स्फूर्त बोल तिचे
मन अधीर करीत होते..!!

बोलली ती तेच नेमके
माझ्या जे मनात होते
शब्द तेच काव्यात
मग उमटले क्षणात होते..!!
*****सुनिल पवार.....

|| सोड वल्कले ||

🌹विचार🌹पुष्प
==========
|| सोड वल्कले ||
🙏🌹🙏🌹🙏
जातीची तू सोड वल्कले
जीर्ण झाली फाटली कापडं
घे पेहराव नव्या युगाचा
का ओढतो तू उगा झापड़ं..!!


भाव तुझा तोच माझा
हवा कशास सांग दूजा
घे समतेचे आकाश कवेत
सरसावु दे वैचारिक भुजा..!!

कशास काढतो उणे धूणे
नाही साध्य त्यात रे काही
शब्द नुसतेच पेटतात इरेला
अन वाया जाते रक्ताची शाई..!!

जगा अन जगु दया
जगी जागव रे भूतदया
तू माझा अन मी तुझा
मूलमंत्र हाच मनी रुजवुया..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.....

Monday, 19 October 2015

।। उपास-ना एक फार्स ।।

।। उपास-ना एक फार्स ।।
================
माते तुझा उपवास धरतो..
मला तर एक उपहास भासतो..
कड़क उपवास सांगुन सर्वत्र..
फळे वेफर भरपेट चापतो..!!


घरात नळाच पाणी मुश्किल..
बाहेर आम्हा बिसलेरीच लागते..
शोभेच्या ह्या उपवासाला मग..
अनवाणी मात्र फिरावे लागते..!!

स्त्री शक्तिची उपासना करतो..
स्त्रीयांना डोळे फाडून पाहतो..
सेटिंग साठीच उशिरा पर्यंत...
दांडियाचा अट्टाहास राहतो..!!

रंग बदलण्याच्या नवरंगात..
सरडयालाही आम्ही मागे सारतो..
बेगडी बेरंग उपास-ना मग..
बेमालूम एक फार्स ठरतो..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार......

|| अब की बार ||



|| अब की बार ||
===========
अब की बार
सुरु होतील बार
बार मालकांची होईल
एंट्री दमदार..!!
अब की बार..


कंटकांचा वाढेल
पुन्हा रात्रीचा संचार
कृष्णकृत्यांस असेल
त्यांच बारचा आधार..!!
अब की बार..

नाचतील बारबाला
उड़तील नोटा अपार
वासनेच्या दलदलीत
होईल देहाचा व्यापार..!!
अब की बार...

तळीरामाच पाऊल
पडेल झोकदार
पोरबाळ उपाशी अन
सुटेल घरदार..!!
अब की बार..
***सुनिल पवार.....

|| हळद / कुंकु आणि करंडा ||

हळद..
नंदलाला रे नंदलाला
जाण जरा रुक्मिणीला..
पहिला मान असे हळदीला
ठावुक आहे का सांग तुला..!!
कुंकु बनुन मिरवते जरी
तुझ्या जगात सत्यभामा..
न बोलली कधी तुला हळद
सवारते तीच तुझ्या धामा..!!
अक्षता जशी सखी राधा
उधळीत फिरशी तिजसवे..
तू जाणलेस का कधीतरी
हळदीस तुझ्या काय हवे..!!
सुमन जशी वेडी मीरा
चरणात पडून नित्य राहते..
शिंपडून उदक नयनांचे
हळद तीज सामावून घेते..!!
अशीच कहाणी हळदीची
आहे का हो तुमच्या घरी..
तुमचाही करंडा करतो का हो
त्या लिलाधराशी अशी बरोबरी..!!
---सुनिल पवार...✍️

|| प्रेम जसे ||

|| प्रेम जसे ||
========
प्रेम जसे तिचे
तसेच प्रेम त्याचे
मोहरे जरी बदलले
घर तेच वेदनेचे..!!


एक क्षण सुखाचा
बाकी विरहाचा
जपून ठेवायचा
क्षण आठवणीचा..!!

फरक एक सूक्ष्म
न कोण जाणतो
कुठे घुसमटतो
कोण व्यक्त होतो..!!

प्रेम जसे तिचे
तसेच प्रेम त्याचे
हृदयाने हृदयास
समजून घ्यायचे..!!
***सुनिल पवार.....

Tuesday, 13 October 2015

II आई भक्तांची कैवारी II

II आई भक्तांची कैवारी II
================
माझ्या आईचे
आईचे आगमन झाले..
हर्ष उल्हासा
उल्हासा उधाण आले..
तिच्या पाऊली
पाऊली सुख चालत आले..
तिच्या चरणात
चरणात मन लीन झाले..!!


वाघ सिंहावर
सिंहावर बैसोनी आली..
निल मोरावर
मोरावर बैसोनी आली..
आई कोंबड्यावर
कोंबड्यावर बैसोनी आली..
आदि शक्तीची
शक्तीची स्थापना झाली.!!

वस्त्र आभूषणे
आभूषणे भरजारी..
पद्म, शंख चक्र
चक्र नि त्रिशुलधारी..
शोभे ललाटी
ललाटी मळवट भारी..
आई विराजली
विराजली दरबारी..!!

जागर करितो
करितो आई दरबारी
गोंधळ मांडतो
मांडतो आईच्या द्वारी
भंडारा उधळीतो
उधळीतो आईच्या पायी..
आई भक्ताची
भक्तांची हाय कैवारी..!!
*****सुनिल पवार....

|| कल्पना संकल्पना ||



|| कल्पना संकल्पना ||
==============
मी हाक तुला देतो
तू साद मला दे
मी गीत तुझे गातो
तू दाद मला दे..!!

मी शब्द फूल अर्पितो
तू दरवळ त्यास दे..
मी भावना तुज देतो
तू गहीवर खास दे..!!

मी सुर तुझे छेड़तो
तू साज नवा दे..
मी मुक्तछंदी न्हातो
तू अंदाज नवा दे..!!

मी लेखणीत बोलतो
तू कल्पना तीज दे..
मी कविता ही करतो
तू संकल्पना तीज दे..!!
****सुनिल पवार.....

Friday, 9 October 2015

|| जत्रा ||

|| जत्रा ||
======
किती बदलल्या काना मात्रा
गलित झाल्या शब्द गात्रा..
किती पुजू शब्दांच्या सूत्रा
जगात भरली कोरडी जत्रा..!!


का कुरवाळतो मी शब्दाला
काय मोल त्या भावनेला..
गहीवर तोच मनाचा माझा
कधी भावला कुठे कोणाला..!!

काय फलित मम शब्दांचे
कशास होते त्यांस जुळवले..
शब्द शब्द हा फोडतो टाहो
शब्द कुणाचे कुणी पळवले..!!

हौशे गवशे नवशे सारेच
शब्द जत्रेत लीलया रुळले..
का मज मग शब्दांनीच छळले
माझ्याच नावास असे गाळले..!!
*******सुनिल पवार......

|| सांग ना रे वाऱ्या ||

|| सांग ना रे वाऱ्या ||
==============
मन गुंतले कोणात
कोण आहे मनात..
सांग ना रे वाऱ्या
निरोप तिच्या कानात..!!


पिंगा नको घालू
तू नुसता भोवताली.
काळीज माझं होतय
नित्य वरखाली..!!

खेळू नको बटेशी
तू काळ्या भोर नभाशी
माझ्या मनाचा पाऊस
लढतोय पापण्यांशी..!!

उडवु नको अवेळी
तू मोहक पदरपिसारा..
बेभान होते मन
पाहुन तो नजारा..!!

दरवळू दे गंध
तू वाह मंद धुंद
दोन प्रीत फुलांचा
पसरु दे सुगंध..!!
*******सुनिल पवार.....

।। एका निवांत वेळी ।।

।। एका निवांत वेळी ।।
==============
एका निवांत वेळी..
रात्रीच्या प्रहरी..
तरळला चांद..
स्मृती पटलावरी..!! 


स्वच्छंद निरागस..
अवखळ पारस..
स्पर्शिला मनास..
भिडला हृदयास..!!
रोमांचित नजारा..
चांदण पसारा..
प्रेमाच्या धारा..
चिंब करी अधारा..!!

यौवनाचा उन्माद..
मनी घाली साद..
पाखरु नादान..
भरू पाहे उड़ान..!!

वाऱ्याच्या आवेग
मनाचा वेग
रोखावा कैसा
दौडला अश्वमेघ..!!
****सुनिल पवार....