Monday, 27 February 2017

|| एका शब्दात ||


|| एका शब्दात ||
===========
कळेना
आज
कसलं खुळ भरलं
तिच्या मनात..
म्हणाली,
व्यक्त व्हा माझ्याबद्दल
मात्र
एका शब्दात..!!

विचार केला
अन म्हणालो
"अर्धागीं"
तर म्हणाली ती
असं नको
"एकांगी"
आणि हा
मानापासून बोला
नको केवळ
वरपांगी..!!
मग म्हटलं
बरं तर मग
"सुंदरी"..?
लाजली ती
म्हणाली,
चला काहीतरीच
मुलं मोठी झालीत
भान ठेवा वयाचं
अहो कारभारी..!!
मग पेटली ट्यूब
दाखवले बोट मुलांकडे
अन म्हणालो
"आई"
मूक झाली
न बोलली काही
ठाऊक होतेच मला
प्रश्न आता कोणताच
ती विचारणार नाही..!!
***सुनिल पवार..✍🏽

Sunday, 26 February 2017

|| बेशक ||

|| बेशक ||
=======
फाटलेलंच जीवन जागोजागी
ठिगळासही कुठे आधार नाही..
जगास करू द्या बेशक भांडवल
इतकाही मी लाचार नाही..!!

तुम्ही या खुशाल निवडून त्यावर
तुमच्यातील मी उमेदवार नाही..
किती मागाल जोगवा मताचा
विकाऊ मी मतदार नाही..!!
का लावताय बोली गरिबीची?
तुमच्या चैनीचा हा बाजार नाही..
बंद करा हे वाटप कुबड्यांचे
सक्षम मी नादार नाही..!!
किती फिराल हो घेऊन आरसे
काय भरवसा तडकणार नाही..
लावा कितीही आग शब्दांनी
शांतच मी भडकणार नाही..!!
ह्या मातीत रोवून पाय उभा मी
सहजा सहजी पडणार नाही..
कोरड्या तुमच्या सहानभूतीत
खात्रीने मी बुडणार नाही..!!
****सुनिल पवार....✍🏽😊

|| ती आणि तो ||

|| ती आणि तो ||
===========
ती
अल्लड नदीची धारा
तो
स्तब्ध सागर किनारा..
ती
मोहक गंध फुलोरा
तो
मिश्किल अवखळ वारा..!!

ती
धरणी श्रावण सुंदरा
तो
मेघ सावळा अंबरा..
ती
इंद्रधनुचा रंगारा
तो
स्वप्नील मोर पिसारा..!!
ती
स्फटिक शुभ्र गारा
तो
झरझर विरघळणारा..
ती
गुलाबी ऋतूचा नजारा
तो
उमदा रसिक खरा..!!
ती
प्रेरणा,स्तोत्र सारा
तो
साधन कागद कोरा..
ती
काव्य अलंकृत धारा
तो
लेखणीतला उतारा..!!
***सुनिल पवार..✍🏽

देव? माणूस?

देव? माणूस?
=======
जात होतो आपल्या वाटेनं
वाटेत एक नास्तिक भेटला
अंमळ जरा गोड वाटला
म्हणाला,
तुमचा गॉड फ्रॉड आहे
आमचा जीजस एकच गॉड आहे
मी हसलो केवळ
म्हणालो
हे ही नसे थोडके,
तुला इतकं तरी मान्य आहे..!!

पुढे दुसरा नास्तिक भेटला
अंमळ जरा कट्टर वाटला
म्हणाला,
यह मूर्ती पूजा बकवास है
जहाँ मे एक ही अल्ला है
तोच निराकार देव आहे
मी हसलो केवळ
म्हणालो
हे ही नसे थोडके,
तुला इतकं तरी मान्य आहे..!!
पुढे तिसरा नास्तिक भेटला
तो ही तसाच इरेला पेटला
म्हणाला,
देव धर्म थोतांड आहे
देव खरा माणसात आहे
आमचा धम्म तेच शिकवतो आहे
मी हसलो केवळ
म्हणालो
हे ही नसे थोडके,
तुला इतकं तरी मान्य आहे..
पण एकच सांगा सर्वांनी मला
माणूस कुठे जिवंत आहे..??
***सुनिल पवार....✍🏽

Thursday, 23 February 2017

|| मन ||

|| मन ||
=====
घटकेत जागा
बदलत जाते मन..
विसाव्याचे घर
शोधत जाते मन..
आठवणीत तिच्या
हरवून जाते मन..
क्षणात मनास
भारून जाते मन..!!
***सुनिल पवार...✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील एक रचना)

|| मी हाक देऊ कोणाला ||

|| मी हाक देऊ कोणाला ||
================
हा रुक्ष मनाचा उन्हाळा
जाळू पाहतोय देहाला..
मी हाक दिली सावलीला
तिने झाड बनवले मला..!!

नसे सळसळ ती पानाला
नाही वाव कुठे झुळकीला..
मी हाक दिली वाऱ्याला
झाले निमित्त पानगळतीला..!!
मी बिलगून जरी मातीला
मन व्याकुळ ओलाव्याला..
मी हाक दिली पावसाला
त्याने वाहून नेले झाडाला..!!
हा प्रवास तरी कुठवरला
कोण नेईल सांग तडीला..
मी हाक देऊ कोणाला
कोण आवरेल ह्या झडीला..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| प्रश्न ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| प्रश्न ||
======
प्रश्न पडतात तिला
निरंतर
कधी काळजीने
कधी शंकेने
माहीत असते तिला
तरीही
विचारीत राहते त्याला
प्रत्येक प्रश्नाचे
समाधानकारक उत्तर..!!

कळते त्यालाही तसेच
ती करते विचार
त्याचाच निरंतर
म्हणूनच
तो गोंजारतो तिला
सांधत
तिच्या विश्वासाला
शिंपडतो हळुवार
समर्पक
उत्तराचे अत्तर..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| वेल नात्याची ||

|| वेल नात्याची ||
===========
काल
मातीत
बहरलेली होती
वेल नात्याची..
रंगबिरंगी
गंधित फुलांनी
सजलेली..
मायेच्या दवात
चिंब भिजलेली..
आज
कवनात उरलीय
केवळ
झालीय केव्हाच
नव्हती होत्याची
ना ह्याची ना त्याची..!!


म्हणतात लोक
कोणा स्वार्थाने
ओरबाडली तिला
अर्थाच्या सरीत गुंफून
पोकळ शाब्दिक
शिडकावा मारून
आपल्या सोयीने
ज्याने त्याने
नव्या कुंडीत सजवली..!!

आता
दुरून दिसायला दिसते
साजरी
जणू शोभेची बाहुली
गोजिरी
येता जवळ
तितकीच बेढब
रंगहीन, गंधहीन
अर्थहीन
टाकाऊच जणू
टवटवी तशीच
औट घटकेची
कमतरता तिला
भासतेय
खऱ्या सकस मातीची..!!
**$p...✍🏽

|| भास ||

|| भास ||
=======
मन उत्सुक,आतुर दिसे
सरिता मुख पाहण्याला..
वाटले अवचित मनास
येईल प्रिया भेटण्याला..!!

मन खिन्न,उदास होते
मात्र दुसऱ्या क्षणाला..
मृगजळीचे भास सारे
कुठे शोधावे कसे पाण्याला..!!
***सुनिल पवार...✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील आठोळी)

|| देव्हारा ||

|| देव्हारा ||
=======
मी ठेऊ पाहतो
निरंतर
दीप आशेचा
तेवत अंतरात..
सुने सुनेच परी
गाभारे मनाचे
नाही देव कुठे तो
कोणत्याच मंदिरात..!!

दाटलेल्या काजळीने
घुसमटून जातो
हृदय गाभारा..
अन
काळोखल्या वाटातुन
अंधारल्या दिशांतून
टाहो फोडतो
नित्य देव्हारा..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| अन त्यांनी |

|| अन त्यांनी ||
==========
नुकताच कुठे रांगु लागलो
त्यांच्या सांगण्याने वागू लागलो
त्यांचीच होती री ओढली
अन त्यांनी नाकं मुरडली..!!

 
रांगणे सोडले धावू लागलो
ह्याला त्याला भावू लागलो
न कळे कोणी खोडी काढली
अन त्यांनी नाकं मुरडली..!!

त्यांच्या संगती चालू लागलो
मनातलं मन खोलू लागलो
बाळगली काही स्वप्न वेडी
अन त्यांनी नाकं मुरडली..!!

आता रांगत नाही धावत नाही
मनातलं कोणास दावत नाही
सहजच त्यांची चादर ओढली
अन त्यांनी नाकं मुरडली..!!
****सुनिल पवार....✍🏽

Thursday, 16 February 2017

|| रामायण ||

|| रामायण ||
========
ऐकलंय मी
त्याने लिहले रामायण
घडण्याआधीच
लोक म्हणतात
त्या आधी तो वाल्या होता..
अनुभावातून
घडला वाल्मिकी
अनुभव हाच
त्याचा गुरु होता..!!

मग कोण असावा नारद
ज्याने
पहिली ठिणगी पेटवली
कळलाव्या की गुरु
त्याने ही किमया लीलया केली..
भस्मसात झाला वाल्या
अन
वाल्मिकीला नवी दिशा मिळाली..!!

कपोल काल्पीत वाटेल तुम्हास
पण द्रष्टे असावेत ते
कारण
सत्य हेच आहे
रामायण आज ही घडतेच आहे
फरक मात्र इतकाचं
आता नारद ते घडवतोय
तेव्हा तो एक होता
आता बरेच आहेत
आणि
त्यांच्याच कृपेने
वाल्मिकीचं पुन्हा
वाल्यात रूपांतर होतंय..!!
*****सुनिल पवार....✍🏽

|| गुलाब ||

|| गुलाब ||
=======
हल्ली
रंग बदलतात गुलाब ही
क्षणात
अन
बदलत जाते
त्यांच्या प्रेमाची परिभाषा..
अदलाबदलीच्या ह्या खेळात
पुसून जातात सहज
निखळपणाच्या रेषा..!!

काल होते ते
मोहक गुलाबी
पण आज
भडक लाल रंगी रंगले..
क्षणिक
सुखाचे स्वप्न सोनेरी
जसे
आज पाहिले
अन उद्या भंगले..!!
तरीही
मी जपलंय मनात
अजूनही
त्यातलंच एक
सुंदर मोहक गुलाब..
पण
ते ही बदललंय आता
नकळत डोकावतं
कधीतरी
आठवणीतून
डोळ्यांच्या कडांतून
तेच रंगहीन गंधहीन
गुलाब..!!🌹
***सुनिल पवार....✍🏽

Monday, 13 February 2017

|| वृत्ती ||

आजच्या दैनिक देशोन्नती वृत्तपत्रात छापून आलेली माझी कविता...
|| वृत्ती ||
======
मी मुसळ म्हणतो
ते कुसळ समजतात..
अन मिटलेले डोळे
उगाच चोळत बसतात..!!


मी दाखवतो एक
ते दुसरीकडे बघतात..
अन हाताच्या कांकणाला
आरशाचा पुरावा मागतात..!!

मी सांगतो गुपित मनाचे
ते जत्रेत मिरवतात..
अन ह्या कानाचा घास
त्या कानाला भरवतात..!!

मी जपतो आपलेपणा
ते सूर तसेच मिसळतात..
अन आस्थेच्या जागा
ते तिऱ्हाईतपणे गळतात..!!

मी लिहतो मनाचे
ते पुस्तकात चाळतात..
अन मनाच्या रोगास
नाहक मस्तकात पाळतात…!!
****सुनिल पवार...✍🏽😊

|| खामोशी ||


|| खामोशी ||
========
खामोश लब्जो पिछे
न जाने यह कैसी
अजीबसी कशिश है..
कैसे समजावु मगर
किसे और क्या
पाने की कोशिश है..
बस यु समझ लो
आजमाईश की
यह अनोखी तपिश है..
खामोश दिल को
समझने की
दिल की गुजारिश है..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

Friday, 10 February 2017

|| निर्मोही ||

|| निर्मोही ||
========
असूयेने कधीच
तिच्या मनास छळले नाही..
असंही नाही
राधेचं प्रेम तिला कळले नाही..!!

मत्सर तर कधी
तिला मुळीच शिवला नाही..
असंही नाही
सत्यभामेने कधी जागविला नाही..!!
इर्षेने कधीही
तिचे मन सुकोमल जळले नाही..
असंही नाही
मीरेच्या वीणाने छळले नाही..!!
निर्महीच होती ती,निर्मळ मनाची
भार्या,पट्टराणी,रुक्मिणी मनमोहनाची..
पारिजातक ही गंधाळे तिच्याचसाठी
आस तयास तिच्या पावन चरणांची..!!
*****सुनिल पवार...✍🏽

|| ती आणि ती ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| ती आणि ती ||
=============
आधी,
तिच्याशिवाय तिचं
पानही हलत नव्हतं
पण अलीकडे
तिचं आणि तिचं
बिलकुल पटत नाही..
आपल्याच मुद्द्यावर ठाम
ती आणि तीही
मागे कोणीच हटत नाही..!!

पूर्वी
तिला तिचा होता
पण आता
लागलाय त्याचा लळा
त्यालाही येतो
तिचाच कळवळा..
पण
तिनेही सोसल्यात तिच्या कळा..
म्हणूनच लागतात अधून मधून
तिलाही नकळत झळा..!!
मग
तिच्या आणि तिच्यामध्ये
तोच सांधतो हळुवार दुवा..
तिला न दुखावता
अन
तिलाही न दुखावता
कारण
ती त्याची रमणी असते..
अन
तीही त्याची चिमणी असते..!!
****सुनिल पवार....✍🏽😊

|| आलिंगन ||


💝तिच्यातील ती💝
=============
आलिंगन...
आज ती
अचानक त्याला म्हणाली
कळत नाही का ते..?
पण तुम्हा पुरुषांचा मात्र
नेहमीच कहर असतो..
तुमच्या शब्दांचाही तसाच
सतत आलिंगनावर भर असतो..!!
तो हसला व म्हणाला,
नसते ग तसेच काही
फक्त तुला तसे वाटतेय
खरं तर हा,
निस्सीम प्रेमाचा आविष्कार आहे..
अंतरातल्या ओढीने दिलेला
अंतरात्म्याचा पुरस्कार आहे..!!
ती ही हसली व म्हणाली,
तुला असे नाही वाटत..?
की तू चालवलेला केवळ
शब्दांचा बेमालूम खेळ आहे..
एकांती मज गाठून अशी
तुला साधायची इच्छित वेळ आहे..!!
तो हसला पुन्हा व उत्तरला,
तुझ्या आक्षेपावर माझी
बिलकुल तक्रार नाही..
पण तू म्हणतेस
त्यातलाही हा प्रकार नाही..
हवं तर,
बघ ना एखादा येऊन मिठीत
मला खात्री आहे
तुझ्या तोंडून शब्द चकार निघणार नाही..!!
***सुनिल पवार...✍️

|| सांजवेळी ||

|| सांजवेळी ||
=========
आयुष्याच्या सांजवेळी
तू दिसतेस अजून सज्जात उभी..!!
ते भुरभुरणारे केस तुझे
जणू तारुण्याची अल्लड छबी..!!

हास्य लाघवी मोहित करते
मनी चांदण्यांची उधळण होते
तूच चंद्रकोर देखणी नभी..
आयुष्याच्या सांजवेळी
तू दिसतेस अजून सज्जात उभी..!!
तोच बहर अजून फुलांस
परिमळ धुंद वेड भ्रमरास
मी भ्रमित तुझ्या कैफात सुरभी..
आयुष्याच्या सांजवेळी
तू दिसतेस अजून सज्जात उभी..!!
ही कातर वेळ नयनी पाणी
वळणावरची एक कहाणी
कोण जाणे अंती का आरंभी..
आयुष्याच्या सांजवेळी
तू दिसतेस अजून सज्जात उभी..!!
*****सुनिल पवार....✍🏽