Thursday, 26 January 2017

|| आज/उद्या ||

|| आज/उद्या ||
==========
आज जोर धरलाय वाऱ्याने
चहुओर मनमुराद भिरभिरतोय..
फुलवित रोमांच मनात
शितलतेची अनुभूती देतोय..!!
डौलाने विहारतोय पतंग आकाशी
डोळ्यांचे पारणे फेडतोय..
गर्वाने भरून येतेय छाती
अन दोर प्रत्येक हातात दिसतोय..!!
बहरला धुंद प्राजक्त
श्वेत सडा
अंगणा अंगणात दिसून येतोय..
गंधित साऱ्या दिशा दिशा
जो तो श्वासात भरू पाहतोय..!!
पण उद्या मंद होईल वारा
घुसमटेल सामान्य जीव बिचारा.
डोलणाऱ्या पतंगास लागेल किनारा
कोमेजून जाईल प्राजक्त,
विरून जाईल गंध
अन मागे उरेल
केवळ निर्माल्याचा कचरा..!!
***सुनिल पवार...✍🏽
तरीही..
*****प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

|| मी अंगिकारले ||

|| मी अंगिकारले ||
============
एकलव्याची साधना
शिकायची असते मला..
पण द्रोणाचार्यी मोह
कवटाळतो अर्जुनाला..
मग
गुरुदक्षिणेत नाहक
का गमवावे मी अंगठ्याला..!!

कर्णाची असीम जिद्द
वाटते घोळवावी अंगात..
पण परशुरामाची कृपादृष्टी
बदलते दाहक शापात..
अन
ब्रह्मास्त्री चाक हुकमी
रुतते विस्मृतीच्या चिखलात..!!

अश्वत्थामा बनून मग
शोधतो गुरु जन्मदात्यात..
पण होतो तिथेही घात
पीठ मिसळले जाते दुधात..
अन
उपकाराच्या मिंधेपणात
पुत्रास विसरतात तात..!!

संदीपनींच्या आश्रमात
होता मित्र कृष्ण सखा
पण स्वीकारेल का मला..?
प्रश्न शिवला नाही मनाला..
अन
मैत्रीच्या मूल्याखातर
मी अंगिकारले सुदाम्याला..!!
****सुनिल पवार....

|| सावली ||

|| सावली ||
==========
जीवन प्रवासात
चालत असता
सुख दुःख रुपी
उन्हात
आपलीच सावली
कधी छोटी
कधी मोठी होत असते..
परी
भय अथवा न्यूनगंड
मानायचे नसते..
कारण
अनुभवाचे चटके सोसत
ती
तावून सुलाखून
निघत असते..
अन
तीच सावली
मग
जगण्याचे नवे बळ
आपणास देत असते..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| सॉफ्ट कॉर्नर ||

💝तिच्यातील ती💝
|| सॉफ्ट कॉर्नर ||
===========
आज
सहज म्हणाली ती मला
तुझ्या मनात "ती"च्याबद्दल
अजूनही
सॉफ्ट कॉर्नर आहे ना..?
बघ ना
तुझ्या प्रत्येक शब्दातून
तेच जाणवतेय मला..?

मी हसलो म्हणालो
हो आहे ना
आतून सॉफ्ट
पण बाहेरून हार्ड
म्हणूनच
टोचतोय ना तुला..?
बघ ना
तुझ्या कृतीतून
तेच व्यक्त होतंय
क्षणा क्षणाला..!!
ती ही हसली
म्हणाली
खरं सांगू
टोचत नाही रे
गुदगुल्या होतात..
कारण
माझ्यापेक्षा
तो अधिक छळतोय तुला
म्हणूनच
दिसून येतोय अट्टाहास
उजेडात आणण्याचा
"तिच्यातील ती" ला..!!
मी हसलो पुन्हा
उत्तरलो
तसं सांगता येणार नाही
कदाचित
असेल ही नसेल ही
पण तू ओळखतेस चांगलीच
"ती"ला
हे माहीत आहे मला..
तरी ही
उलघडू पाहतो मी
तुझ्याच समोर
नित्य नव्याने
"तिच्यातील ती" ला..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| भाषणबाजी ||

|| भाषणबाजी ||
==========
ते म्हणाले
विकासाला मत द्या
मी म्हणालो
आधी उभा तरी करा..!!

ते म्हणाले
चला भ्रष्टाचार मिटवूया
मी म्हणालो
शिष्टाचार घोषित करा..?
ते म्हणाले
आमचा नारा गरिबी हटाव
मी म्हणालो
झोपडी पेटवून सुरवात करा..!!
ते म्हणाले
शिकेल त्याला शिक्षण देऊ
मी म्हणालो
आधी लेक्चर बंद करा..!!
ते म्हणाले
चला आत्महत्या रोकू या
मी म्हणालो
फांद्या छाटून सावली धरा..!!
ते म्हणाले
आमच्या पार्टीस विजयी करा
मी म्हणालो
मतदारास तुम्ही गृहीत धरा..!!
****सुनिल पवार....✍🏽

|| उंबर ||

|
उंबर..
तो आंबेमोहर हसतो उंबराला
ना बहर, ना दरवळ
नुसती फुकटची वळवळ
काय अर्थ उरतो
तुझ्या बारमाही फळाला
खोऱ्याने घातलेल्या रतीबाला
ना विचारत कोणी त्याला
नुसती निरर्थक भर कचऱ्याला..!!
हसला उंबर उत्तराला
जरी रसाळ तू
तरी बहर तुझा औटघटकेचा
ओसरता बहर कोण पुसतो तुला
मी फुलतो झुलतो
काट्याकुट्यात पाषाणात
अन् तुझं अस्तित्व केवळ कुंपणात
तुझी हयात जाते
एका केवळ विशिष्ट वर्गास खुश करण्यात
अन् मी रमतो खुशाल
पाखरांच्या गाण्यात अंतरातल्या वंचितांत
इतकेच नव्हे तर
दुर्लक्षित निशाचर
त्या वटवाघूळाचेही उदर भरण्यात..!!
--सुनिल पवार...✍️

Thursday, 19 January 2017

|| अकल्पित ||

|| अकल्पित ||
=========
अचेत कलेवर ते
दगडास फोडते पाझर..
अनुभूती ही क्षणाची
कोरून घेतो मनावर..?

गुंतलेल्या पाशात किती
माणुसकी घुसमटलेली..
सोपस्काराच्या सोहळ्यात
तितकीच सैल सुटलेली..!!
बेदखल क्षणचित्रे सारी
काळोखात जतन केलेली..
भारावलो मी पाहून
नव्या प्रदर्शनात रंगलेली..!!
हरलेल्या जीवनाचे कसे
हार सत्कार,उपहार झाले..
मिटलेल्या डोळ्यांनी असे
मानवी चमत्कार पाहिले..!!
लपेटून घेताच ज्वाळा
तेजपुंज देह झाला..
जोडून हात भावे
जगण्याचा उहापोह केला..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| घडी ||

🌺तिच्यातली ती🌺
=============
|| घडी ||
=●=●=
घडी करत होतो
चादरींची
तशी नेहमीच करतो..
उशिरा उठणारा मी
न करून कुणास सांगतो..!!

इतके दिवस नव्हतं
पण
आज तिचं लक्ष गेलं
म्हणाली,
छान मारतो तू घडी..
अशी
मलाही जमणार नाही
अगदी तंतोतंत
नाही कुठेच वेडीवाकडी..!!
मी हसलो म्हणालो,
अगं
यत्किंचीतशी ही चादर आहे
त्यास
विशेष मी म्हणणार नाही..
खरी कलाकार तूच आहेस
कारण
तू बसवलेल्या घडीचे अनुकरण
प्रत्यक्ष
ब्रह्मदेवालाही जमणार नाही..!!
*****सुनिल पवार....✍🏽

|| किनारा ||

|| किनारा ||
========
दूरवर कुठेतरी
दिसतो
आशेचा किनारा
अधिक जवळ आलेला
काठा काठावरून चालताना..!!

वाटते
भेट नक्की घडेल तिथे
अन
समज गैरसमाजाची
भिंत गळून पडेल
काठा काठावरून चालताना..!!
भ्रमच असतो परी
सांगायचं कुणाला.?
मी पणाच्या धुक्यात
नकळत
हरवतो किनारा
काठा काठावरून चालताना..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| निमित्त ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| निमित्त ||
=======
ठाऊक असते
तिलाही
न जमणार त्याला कधी
साधा
गजरा आणायला..
पण
निमित्त हवे असते काही
लटका अबोला धरायला..
अन
त्याला बोलते करायला..!!

हे कळते त्यालाही
म्हणूनच,
तो गोंजारतो हळुवार तिला
अन
तिच्या लटक्या रागाला..
कदाचित
दाखवायचं असतं त्यालाही
बघ.
काळीज आहे ग,
ह्या कागदी वाघाला..!!
तिने
बांधून घेतलंय त्याच्या
चौकटीला..
अन त्याने नोकरीच्या
दावणीला..
मग दोष तरी द्यावा कोणाला..
आणि कशाला..?
तरीही ती
आवर्जून वाढते त्याला
अशाच
गोड शब्दांचे पक्वान्न
प्रत्येक सणाला..
त्याला बोलते करायला..??
****सुनिल पवार.... 

Friday, 13 January 2017

🌺मन मनाचे🌺


🌺मन मनाचे🌺
===========
मातीचीच चूल
परी
आकाशाची भूल..
आत्मप्रौढीच्या
तट्टाणीला
ऐरावती झुल..!!

ईवलस झाड
म्हणे
मूळ बहू खोल..
दूतर्फी वाजतो
त्याच्या
महिमेचा ढोल..!!
आसक्ती गुलाबाची
देते
काट्यांस भूल..
लालसेच्या पायी
नाहक
कुस्करते फुल..!!
औंदर्याचा वानवा
लावी
सागरास बोल..
डबकं मारे फुशारकी
सांगे
मीच अधिक खोल..!!
दगड सारे वाटेवर
त्यावर
ना चढवणार फुल..
माझ्याच पावलांची
माथी
मी लावणार धूळ..!!
***सुनिल पवार....✍🏽😊

🌺मैत्री🌺

🌺मैत्री🌺
=======
मैत्री म्हणजे एक
अनोखे आनंदी पर्व..
प्रत्येक मित्राने करावा
आपल्या मैत्रीचा गर्व..
ईर्षा,लोभ,राग,मत्सर
इथे अभावानेच दिसतात..
सुख दुःखाच्या पावसात
मित्र एकत्र भिजतात..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| शर्यत ||

|| शर्यत ||
=======
निखळता हरवली जगण्याची
अन बदलली रीत वागण्याची..
लक्षाचा ना ठावठिकाणा
ही शर्यत अनोखी पळण्याची..!!

तू पळतो का मी पळतो
प्रश्न उगाच मनास छळतो..
जुंपून घेतलंय घाण्याला
पण नंबरासाठी जीव जळतो..!!
हे चित्र विचित्र दिसे धूसर
जसे दुरून साजिरे डोंगर..
गर्दी जमलीयं पोट भरू
पण मृगजळीच सारे लंगर..!!
खेळे नियती आंधळी कोशिंबीर
जो तो खेळण्यास दिसे अधीर..
असमाधानी मार्ग मोहाचा
शोषून घेतोय सांडून रुधिर..!!
****सुनिल पवार...✍🏽

विचार कधी करणार..?

🌺सुप्रभात🌺
==========
मारणाऱ्यास
अडवु शकतो हमखास
पण
बोलणाऱ्याचे काय.?
पांगळाच तो म्हणावा
त्यास
नसतात हात पाय..!!

त्यानं मारलं वासरू
म्हणून
मी मारावी का गाय..?
विचार कधी करणार
नेमकं
आपलं चुकतंय काय..?
***$p..✍🏽😀😜

|| प्रतिभा / श्रवणीका ||


💝तिच्यातील ती💝
=============
|| प्रतिभा / श्रवणीका ||
==============
शेवटी वैतागून
मी म्हणालो तिला
तीन चार दिवस झाले ग
काही सुचत नाही..
निजलीयं प्रतिभा बिनघोर
अन बघ ना
काव्यालाही शब्द रुचत नाही..!!

हसली ती खुदकन
म्हणाली
चला बरंच झालं
ते म्हणतात ना
सुंटेवाचून खोकला गेला..
म्हणजे नेमकं
तसं म्हणायचं नाही मला
पण दमली असेल बिचारी
निजू दे जरा
चाळवू नको तू उगाच तिला..!!
उत्तरलो मी
कळतंय हा मला
तुझं हे खोचक बोलणं..
ते म्हणतात ना काय ते..?
हां..
नाकाने कांदे सोलणं..
का असं म्हणू..?
माझ्या काव्यावर तुझं जळणं..
तू काही म्हण
पण
कठीण आहे ग
आता माझं मन वळवणं..!!
ती साळसूद म्हणाली
हा गैरसमज आहे तुझा
त्यात जळायचं ते काय..?
आणि जो आधीच वळलाय
त्याला वळवायचं ते काय..?
आणि
धरून कुत्रं पारधीला
कधी न्हेता येतं काय..?
सांग ना
काही आहे का तरणोपाय..?
म्हटलं मी
बरं.. बरं कळलं हा
आता बघचं तू
जागवतो प्रतिभेला
अन भेटवतो काव्याला
मग कळेलंच तुला
काय असते प्रतिभा
अन कशी असते कविता
तसा
मी ही आहे तितकाच खमका..
ती हसली पुन्हा
म्हणाली ईतकेच
वाया जातील रे तुझे
सारेच प्रयत्न
कारण..
ठार बहिरी आहे ना
माझी
सुकोमल श्रवणीका..!!
****सुनिल पवार...

|| नात्याची वीण ||

==========
|| नात्याची वीण ||
==========
नात्याची वीण कधी
सुटता सुटत नाही..
हे बंध रेशमाचे जरी
तुटता तुटत नाही..
दूधच असते जणू
मायेच्या घट्ट साईचे
तापमान कोणतेही असो
फाटता फाटत नाही..!!
***सुनिल पवार...✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील वाक्य)