Friday, 13 January 2017

|| प्रतिभा / श्रवणीका ||


💝तिच्यातील ती💝
=============
|| प्रतिभा / श्रवणीका ||
==============
शेवटी वैतागून
मी म्हणालो तिला
तीन चार दिवस झाले ग
काही सुचत नाही..
निजलीयं प्रतिभा बिनघोर
अन बघ ना
काव्यालाही शब्द रुचत नाही..!!

हसली ती खुदकन
म्हणाली
चला बरंच झालं
ते म्हणतात ना
सुंटेवाचून खोकला गेला..
म्हणजे नेमकं
तसं म्हणायचं नाही मला
पण दमली असेल बिचारी
निजू दे जरा
चाळवू नको तू उगाच तिला..!!
उत्तरलो मी
कळतंय हा मला
तुझं हे खोचक बोलणं..
ते म्हणतात ना काय ते..?
हां..
नाकाने कांदे सोलणं..
का असं म्हणू..?
माझ्या काव्यावर तुझं जळणं..
तू काही म्हण
पण
कठीण आहे ग
आता माझं मन वळवणं..!!
ती साळसूद म्हणाली
हा गैरसमज आहे तुझा
त्यात जळायचं ते काय..?
आणि जो आधीच वळलाय
त्याला वळवायचं ते काय..?
आणि
धरून कुत्रं पारधीला
कधी न्हेता येतं काय..?
सांग ना
काही आहे का तरणोपाय..?
म्हटलं मी
बरं.. बरं कळलं हा
आता बघचं तू
जागवतो प्रतिभेला
अन भेटवतो काव्याला
मग कळेलंच तुला
काय असते प्रतिभा
अन कशी असते कविता
तसा
मी ही आहे तितकाच खमका..
ती हसली पुन्हा
म्हणाली ईतकेच
वाया जातील रे तुझे
सारेच प्रयत्न
कारण..
ठार बहिरी आहे ना
माझी
सुकोमल श्रवणीका..!!
****सुनिल पवार...

No comments:

Post a Comment