Thursday, 26 January 2017

|| मी अंगिकारले ||

|| मी अंगिकारले ||
============
एकलव्याची साधना
शिकायची असते मला..
पण द्रोणाचार्यी मोह
कवटाळतो अर्जुनाला..
मग
गुरुदक्षिणेत नाहक
का गमवावे मी अंगठ्याला..!!

कर्णाची असीम जिद्द
वाटते घोळवावी अंगात..
पण परशुरामाची कृपादृष्टी
बदलते दाहक शापात..
अन
ब्रह्मास्त्री चाक हुकमी
रुतते विस्मृतीच्या चिखलात..!!

अश्वत्थामा बनून मग
शोधतो गुरु जन्मदात्यात..
पण होतो तिथेही घात
पीठ मिसळले जाते दुधात..
अन
उपकाराच्या मिंधेपणात
पुत्रास विसरतात तात..!!

संदीपनींच्या आश्रमात
होता मित्र कृष्ण सखा
पण स्वीकारेल का मला..?
प्रश्न शिवला नाही मनाला..
अन
मैत्रीच्या मूल्याखातर
मी अंगिकारले सुदाम्याला..!!
****सुनिल पवार....

No comments:

Post a Comment