Monday, 26 September 2016

|| झाड ||

|| झाड ||
======
अंदाज नाही काही
वारा कोणत्या दिशेने वाहतोय
पानांशी काडीमोड घेत
झाड सावलीशी फटकून वागतेय..!!
पातेऱ्याचा खच वाढवत
गळत चाललंय एक एक पान..
घर्षणानेच पेट घेईल मात्र
नाही कोणास वास्तवाचे भान..!!
का दोष द्यावा उन्हाला
दाह देणे इतकेचं त्याला समजतेय..
पण आश्चर्य मात्र झाडाचे वाटतेय
ते ही उन्हाचा कित्ता गिरवतेय..!!
किलबिलणाऱ्या पाखरांचा थवा
होऊ लागला परागंदा
अन संधीसाधू गिधाडांचा
कसा तेजीत चाललाय धंदा..!!
विध्वंसक उन्हाची ही सलगी
झाडास किती काळ तारणार..?
नाही अस्तित्व पानाविना काहीच
हे सत्य झाडास कधी समजणार..!!
****सुनिल पवार....

II मानवाच्या पुत्रा II

🌺सुप्रभात🌺
==========
पहाटेच्या प्रसन्नतेकडे
प्रकाशाच्या कवडस्याकड़े
मनाच्या आरशाकड़े
तू ही काही माग..
ओठावर हास्य
सुभाषित भाष्य
ठेव वाणीत अनुराग..!!
वाऱ्याची शीतलता
आकाशाची विशालता
सागराची अथांगता
ह्यांचा काढून बघ माग..
औंदर्याची माहिती तू
जगास ओरडून सांग..!!
फुलांचे झुलणे
दवबिंदूचे चमचमणे
पाखरांचे गाणे
जमेल का तुज सांग..?
मानवाच्या पुत्रा तू
बस माणुसकीने वाग..!!
****$p...✍🏽

|| गोट्याच्या कविता || # 01 (अचंबित)




साहित्य, साहित्यिक आणि
|| गोट्याच्या कविता ||
==============
# 01 (अचंबित)
==============
गोट्या आला
अन
चार चौघात
चक्क शिंकला
काय आश्चर्य
रुमालाचा खच पडला
हैराण गोट्या
च्यामारी
शेंबूड गळला
का
मध ठिबकला..?
**$p..

|| लेबलची भूतं ||

|| लेबलची भूतं ||
===========
हा अमका,तो तमका
हा अलाना,तो फलाना
ह्याने काढला,तो नडला
त्याने काढला,हा चिडला
ह्याने मांडला,त्याने खोडला
त्याने मांडला,ह्याने तोड़ला
नाही सुधारणार कोणीच
ना समजून कधी घेणार
सगळी साली
लेबलची भूतं एक जात
हाकलावी तरी किती
जाता नाही जात
साले लेबलसाठी जगणार
लेबल घेऊन मरणार
ह्यांच्या ह्याच गदारोळात
बिचारा माणूस हरवला
त्याला कुणीतरी शोधा
बाकी सर्व चुलीत घाला...!!
**सुनिल पवार...

|| परतीचा पाऊस ||



|| परतीचा पाऊस ||
============💦
विरहाच्या वेदना
अंतरी रुजवून
परतीचा पाऊस 
वाटेवर रेंगाळला..
फाटले आकाश
पाझर नयनी
अंतरबाह्य जसा
मनी हेलावला..!!
लागला सुरुंग
तुटला स्वप्नझुला
किती वेदना
इवल्या मनाला..
व्यर्थच सारा
थयथयाट परी
संवेदनांची इथे
जाणीव कुणाला..!!
दावू नकोस
डोळ्यातील टिपूस
न कळणार दुःख
तसे जगाला..
करून भांडवल
याच अश्रुंचे
संसार जगाने
उभा मांडला..!!
रितेपणाचे शल्य
अंतरीचे तसे
न जाणवणार कधी
भरल्या ओंजळीला..
आज भरली
उद्या रीती होईल
प्रचितीची साक्ष
येते अनुभूतीला..!!
*****सुनिल पवार....

Wednesday, 21 September 2016

|| काव काव || (एक मनोगत)

काव काव.. (एक मनोगत)

पितृपक्ष आला रे आला
की त्यांची काव काव सुरु होते..
पराच्या कावळ्यांची
उगाच हमरातुमारी होते..!!

कणीकाच्या गोळ्याचा तो
इवलासा असतो पिंड..
नासाडीच्या नावाखाली
तुम्ही नाहक लढवता खिंड..!!

वर्षभर उकिरडे फुंकतो
जीव जातो घाण उपसता..
स्वच्छतेचा पाईक म्हणून
कौतुक मात्र भारी करता..!!

कुणाच्या नावाने का असेना
एक घास गोडधोडीचा मिळतो..
त्यातही तुमची आडकाठी
तुमचा भाव उगा मनास छळतो..!!

पशु पक्षांवरील प्रेमाचे भरते
नेमके याच महिन्यात जाते कुठे..?
मोठ्या घराचे तुमचे पोकळ वासे
नाव मोठे अन् लक्षण खोटे..!!

तुम्ही माणसं बाकी भारी इरसाल
नेम नाही तुमचा
तुम्ही कधी कुठे घसराल..
मतल(बा)चं केळं केव्हा फस्त कराल
अन्
दुसऱ्याच्या पायाखाली साल कधी फेकाल..!!
--सुनिल पवार....✍🏽😜😜

|| साहित्याच्या प्रसूती गृहात ||

|| साहित्याच्या प्रसूती गृहात ||
===================
अनौरस
घेतेय गती
अन,
औरस
खातोय माती..
साहित्याच्या प्रसूती गृहात
विचित्र
येतेय प्रचिती..!!

ह्याचं पोर
तो पळवतोय
बाप बनून
जगी मिरवतोय..
जन्मदाता हतबल बिचारा
चोर निलाजरा
शिरजोर ठरतोय..!!
****सुनिल पवार...✍🏽😜 

|| पुरस्कार ||

|| पुरस्कार ||
========
रोजच भरतो साहित्य दरबार
पण अजब त्याचा कारभार..
तर्क शून्य ते सारे व्यवहार
झाले उदंड पुरस्कार..!!

फडफडतो कुठे कागद कोरा
त्यास, वाहत्या वाऱ्याचा आधार..
रांगू लागले बाळ जरासे
मिळवी जीवन गौरव पुरस्कार..!!
एकमेकांची पाठ खाजवू
असे अलिखित ठरलेले करार..
वजन वाढवता कागदाचे ते
खुलते पुरस्काराचे द्वार..!!
मलिन सारे आरसे मनाचे
जगा,काय छबी दिसणार..?
दिवा दावितो प्रकाश जगास
बुडाखाली त्याच्याही अंधार..!!
****सुनिल पवार...✍🏽 

|| प्राक्तनी ||

|| प्राक्तनी ||
========
उमलण्या आधीच
कळ्यांच्या प्राक्तनी ओघळणे येते..
ऋतू कोणताही असो
पानांचे नेहमीच गळणे असते..!!

साचलेले डबके असो
वा असो पाणी खळखळते..
संकुचित दगडांचे तसेच
वरवरचे हिरवळणे असते..!!
किती जपावे आरशास
ओरखड्या पासून, कशास ते..?
नुसत्या स्पर्शानेही नशिबी त्याच्या
डागाळणे असते..!!
माथ्यावरील सूर्याचे
शाश्वत जरी कवडसे ते..
एक मेघ साशंक अन
आसमंताचे ढगाळणे असते..!!
किती गायिले गोडवे जगी
चंद्र, चांदण्याच्या प्रीतीचे ते..
वातीच्या नशिबी केवळ तेच
रात्रीचे जळणे असते..!!
****सुनिल पवार...

Monday, 12 September 2016

|| मुंबई लोकल ||

|| मुंबई लोकल ||
==========
धडाक पडाक
धडाक पडाक
पो.…..ss
ढुश्श.…
ए भाय बाजू हट
मच्छि का पानी
उसकी माँ का
साकिनाका
चल अंदर
पो....ss
धडाक पडाक
धडाक पडाक
खट.. धप
ढुश्श....
क्या हुआ..?
कु्छ नही भाय
एक कम हो गया
चलो भीड कम हो गयी
हा..हा...हा...
ढुश्श...
पो......ss
धडाक पडाक
धडाक पडाक..!!
**रेल यात्री...$p..✍🏽😬

||शब्दांचं जग||

||शब्दांचं जग||
तसे जुनेच असतात शब्द
मात्र अर्थ नवे निघत राहतात।
सोयीचं सारं राजकारण होतं
अन् शब्द मात्र घुसमटत राहतात।
शब्दांच्या गोतावळ्यात दिसते
शब्दांचेच मिरवलेले नाव।
शब्दांच्या पलीकडचा डाव
अन् शब्दांनी केलेला बेबनाव।
किती गोंडस दिसतं ना..?
शब्दांचं मोहक आभासी जग।
अन् यामागे लपलेला त्यातलाच
न दिसणारा आसूयेचा धग।
साखर घोळून येतात शब्द
करत राहतात मर्जीची भलामण।
खरंच होतं का हो त्याने
एखाद्याचं मनसोक्त उदरभरण।
निखळता जोपासणाऱ्या शब्दाचा
चोहीकडे दिसतोय वानवा।
आता तुम्हीच ठरावा शब्दांनो
तुमचा मुद्दा खोडावा का मानावा।
नाही म्हणत मी शब्दांनो
शब्द सारेच वाईट असतात।
शब्दांच्या याच सुरावटीत
शब्दच गळ्यातले ताईत असतात।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'तसे जुनेच असतात शब्द अर्थ नवे निघत राहतात| सोयीचं सारं राजकारण होतं अन् शब्द मात्र घुसमटत राहतात| |।शब्दांचं जग।। शब्दांच्या गोतावळ्यात दिसते शब्दांचेच मिरवलेले नाव| शब्दांच्या पलीकडचा डाव शब्दांनी केलेला बेबनाव। किती गोंडस ना..? शब्दांचं मोहक आभासी जग| त्यामागे लपलेला त्याच्यातलाच न दिसणारा आसूयेचा धग| साखर घोळून येतात शब्द करत राहतात मर्जीची भलामण| खरंच होतं का त्याने एखाद्याचं मनसोक्त उदरभरण| निखळता जोपासणाऱ्या शब्दाचा चोहीकडे दिसतोय वानवा| आता तुम्हीच ठरावा शब्दांनो तुमचा मुद्दा खोडावा मानावा| नाही म्हणत शब्दांनो शब्द सारेच असतात| शब्दांच्या याच सुरावटीत शब्दच गळ्यातले ताईत असतात| सुनील पवार..'
140
People Reached
9
Engagements
7

|| खबर खोद के || (कपिल शर्मा)

|| खबर खोद के ||
===========
कपिल शर्माचा शो आता
राजकीय व्यासपीठावर रंगणार..
ट्विटर वरची टीव टीव
बहुतेक त्याच्याच अंगलट येणार..!!

पाण्यात राहून कधीच
माशाशी वैर धरायचं नसतं..
सेलिब्रेटी असला म्हणून काय झालं
अनधिकृत बांधकाम त्यानेही करायचं नसतं..!!
*****$p.....✍🏽😜😄😜

II ऑनलाईन प्रेमाचे II


😄😄हसा लेको😄😄
==============
II ऑनलाईन प्रेमाचे II
==============
ऑनलाईन प्रेमाचे
ऑफलाईन धडधडणे असते..
मॅसेंजरच्या पावसात
शब्दांचे गडगडणे असते..!!

पोस्टवरच्या बगिच्यात
स्मायलींचे फुलणे असते..
बोटांच्या टप्प्यात
मुक्याचे बोलणे असते..!!
वॉलवरच्या फोटोसाठी
डोळ्यांचे झुरणे असते..
आंबट चवीसाठीच
लोणच्याचे मुरणे असते..!!
ऑनलाईन प्रेमाचे
रोजच हुरहुरणे असते..
साठीच्या वयातही
मन कसे तरणे असते..!!
****सुनिल पवार....✍🏽 

|| तडतड लाही |

=D हसू नका =D
😭रडू नका😭
माणूस आपलाच हाय
उगाच तडतडू नका😬
############
|| तडतड लाही ||
==============
करू नका हो कोणीच
अंगठे वर करण्याची घाई...
तुम्ही आमचे , आम्ही तुमचे
तुमची चालू द्या कंपुशाही..!!

नको आम्हास शब्द उपरे
जरा आवरा स्वतःस भाई..
म्यान करा तलवारी
उगा, उडवू नका हो राई..!!
समर्थ आमची आई
उगा हवी कशास दाई..
तडतडू दे तुमची लाही
आम्ही सांभाळतो शब्दाई..!!
😜*****$p***** 

|| खबर खोद के || (खाट सभा)

|| खबर खोद के ||
===========
खाट सभेने
खाट खडी केली..
कार्यकर्त्यांनी
नेत्यावर कडी केली..!!

खाटेची लाट
जोरदार उसळली..
कार्यकर्त्यांच्या घरी
जाऊन विसावली..!!
कोणाची खाट
अन निजतंय कोण
सगळीकडे त्याचंच
पसरतंय लोण..!!
***$p...✍🏽 

|| संयुक्त अलिप्त ||

|| संयुक्त अलिप्त ||
============
कधी संयुक्त असणारे
भांड्यात मिसळून वावरणारे
ते भांडे,
सुखाच्या शोधात
बरोबरीच्या भांड्यातुन
हट्टाने अलिप्त झाले..
भासले त्यास मुक्त काही काळ
न कसला आवाज
आता
सारे कसे शांत शांत झाले..!!

चार भिंतीच्या फडताळात
विजयाच्या अविर्भावात
हर्ष उल्हासात
सजवली त्याने
दोन भांड्याची आरास..
पण,
उशिरा कळले त्या भांड्यास
ज्यासाठी केला होता
इतका अट्टाहास
तोच होता केवळ भास..!!
नाद रव ना समजला
मुकला अस्सल संगीताला
दोष तोच हलक्या कानाचा
हे कळून चुकले त्याला..
पण
निघून गेली वेळ
आता जमवतोय नव्याने भांडी
शोधू पाहतोय आजूबाजूस
पण मिळणार कशी..?
तशीच हक्काची भांडी
पण निर्णय हा त्याच्याच होता
त्याने निवडले होते
स्वतःहुन त्याच्या एकांताला..!!
***सुनिल पवार...

|| गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||


|| गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||
=====================
चिमण्या बाळांचा
चिमणा गणपती..
निरागस हास्य
बाळांच्या ओठी..!!

लाभो सकलांस
सद्बुद्धी सुसंगती..
सुख समृद्धीने तयांची
भरावी ओटी..!!
***$P..

नाही म्हणत मी..

नाही म्हणत मी..
नाही म्हणत मी राम
मानतो तुझा सल्ला..
आता तसाही तो कुठे
तुझ्यात नाही उरला..!!
नाही म्हणत मी येशू
नको होऊ रे उदास..
तो नव्हता कधीच तुझा
नको करून घेऊ त्रास..!!
नाही म्हणत मी अल्ला
पण थांबावं तुझा सल्ला..
कळणार नाही तो तुला
दंड आवर रे मल्ला..!!
नाही म्हणत मी बुद्धा
मित्रा, आता तू सुद्धा..?
धम्म ना कधी स्मरला
उगा पेटतोय बघ मुद्दा..!!
नाव त्यांचे घ्यायचा..
हक्क नाही तुला, मला..
मग दाखले कसले देतोस
विसरून माणुसकीला..!!
आता तूच झाला दगड
म्हणूनच, मी पूजतोय त्याला..
तुला फुटणार नाहीच तसा
कदाचित फुटेल पाझर दगडाला..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| ती आलीच नाही ||

|| ती आलीच नाही ||
=============
कधीची पाहतोय वाट
तीचा पत्ता कुठेच नाही..
हूरहूर लागून राहिली
ती आलीच नाही..!!

तिच्याच मी मार्गावर
वेलीवर फुलांवर
स्वप्नांच्या झुल्यावर
कुठे फुल बहरलेच नाही
ती आलीच नाही..!!
पावसाच्या सरीवर
वाऱ्याच्या लहरीवर
इंद्रधनूच्या दोरीवर
कुठे रंग भरलेच नाही
ती आलीच नाही..!!
मनाच्या तळ्यात
निळ्याशार डोळ्यात
भावनेच्या जाळ्यात
कुठे सापडलीच नाही
ती आलीच नाही..!!
वर्तमानाच्या रकान्यात
ना भूत भविष्यात
वेगळ्या भावविश्वात
कुठे रमलीच नाही
ती आलीच नाही..!!
अशीच ती अल्लड
संवेदनेची सांगड
पण आहे तशीच गोड
तुम्ही समजता ती नाही
ती आलीच नाही..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| खबर खोद के || (jio)

|| खबर खोद के ||
===========
अंबानी म्हणतात
गांधीगिरी झाली
आता डेटागिरी सुरु..
तुमचे पैसे आमची सेवा
अवघेची फेर धरु..!!

गरीब मरतात मरू द्या
रिलायंस तुम जियो..
पार्टी फंड रग्गड फुगणार
कुछ समज आयो..
केम छो भायो..??
***$p...✍🏽😄