Friday, 2 September 2016

|| बोल बाप्पाचे ||

|| बोल बाप्पाचे ||
===========
11 दिवसाची ही न्यारी
असेल माझी सणवारी..
येतोय मी तुमच्या दारी
तुमची झाली का तयारी..?

तुमचा मान राखाया
मी तुमच्या नगरीत येतो..
इकडे जरा लक्ष द्या
मी तुम्हास विनंती करतो..!!

इवल्या माझ्या डोळ्यांना
आता भारीच होतोय त्रास..
पहा किती गावे अंधारात
थोपवा विजेचा ऱ्हास..!!

सुपा एव्हढे माझे कान
त्यांनीच झालोय मी बेजार..
ध्वनी प्रदूषण आवरा आता
करा विचार हो सारासार..!!

संवेदनशील अति सोंड माझी
त्याने घुसमटतोय हो श्वास..
पहा जरा ती उघडी गटारे
असते तिथेच नेमकी आरास..!!

तुंदील माझ्या भव्य तनुला
आता सोसवत नाही भार..
सारेच उंदीर सोकावलेत
त्यांनी पुकारलाय असहकार..!!

चार जरी हे हात माझे
मी हतबल तरी तुमच्या पुढे..
हात उठेना आशीर्वादास
तुम्ही समजून घ्या हे कोडे..!!

दुखवायचे नाही कोणास मला
माझा समजून घ्या जरा भाव..
गाऱ्हाणे मी ऐकेन तुमचे
मात्र ठेवा शुद्ध भक्तिभाव..!!

समाजाचे देणेकरी आपण
जरा ठेवू समाजीक भान..
उत्सवाने मिळवून देऊ
सकल जना समाधान..!!
***सुनिल पवार...

No comments:

Post a Comment