Monday, 31 August 2015

|| पाळणाघर ||

|| पाळणाघर ||
=========
[बोल बाळबोध]
=========
काल होते हातावर
आज आहे काट्यावर
मम्मी पपा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!


कुटुंबाच्या त्रिकोणात
संक्रात आजी आजोबावर
संस्काराची धुरा सारी
आली आया मावशावर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!

गोड अक्षरांची आई
आली कधीच मॉमवर
बाबांचाही डॅड झाला
असतात नेहमी टूरवर
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!

रांगत होते बाळ गोजिरे
चिऊ काऊच्या घासावर
काळ बदलला आले सारे
शिस्तीच्या धोशावर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!

वेळ नाही घेण्या कडेवर
कसरत ही नित्य तारेवर
अवलंबून सारेच गरजेवर
कळतय जरी नाही बरोबर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
******सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment