Saturday, 29 April 2017

|| मी देव पाहिला ||

|| मी देव पाहिला ||
============
व्यर्थ शोधू नको
देव दिसणार नाही देव्हाऱ्यात
त्याला शोधायचंच असेल
तर
शोधलं पाहिजे माणसात..
तो
असतो लपलेला
गरजवंताच्या भ्रांतात
नसलेल्या प्रांतात
गरीबाच्या पोटात
किंवा
कष्टकऱ्याच्या हातात..!!

ओळखता आली पाहिजे
आपणास
त्या
प्रत्येकाची नड, निकड
अन
केली पाहिजे तयांस
सहहृदयी मदत..
राबले पाहिजेत तुझे हात
तेव्हाच तो दिसेल
इतरांस
अन
सांगतील ते जगास
मी / आम्ही
देव पाहिला
ह्या सहहृदयी माणसात..!!
***सुनिल पवार....✍🏽🙏

|| मंजिल की तलाश में ||

मंजिल की तलाश में...
मै
हर दिन
तुम्हे देखता हूं
तुम
मंजिल की तलाश में
दिल के रास्ते महकाते हुए
रोज संवरकर गुजरती हो..
मंजिल
खुद इंतजार करती है तुम्हारा
फिर भी
न जाने क्यों
तुम यहाँ वहाँ भटक जाती हो.?
मै तो हमेशा
तुम्हारे आसपास रहता हूं
और तुम
फिर भी अनदेखा कर जाती हो..!!
**सुनिल पवार...✍️

|| यातनांचे घर ||

|| यातनांचे घर ||
==========
अनंत यातनेच्या
या घरात
किती
बिनभाड्याचे
भाडेकरू राहतात..?
लावू पाहतात
घरास घरघर
त्यावर
कब्जा करू पाहतात..!!

मिळेल ती जागा
व्यापून बसतात..
जसे
त्यांच्याच बापाचं
हे घर..
कुठे बीपी, कुठे शुगर,
कुठे कँसर
तर कुठे
सर्दी, खोकला
अन मुदतीचा ज्वर..!!
कधी जोंजारतो
त्यांना
कधी हुसकावून लावतो
कधी हतबल होतो
कळत नाही
आवरू तर कसं आवरू..?
शहाणे असतात
त्यातील काही
ते निमूट निघून जातात
पण त्यातलेच काही
अडेल निघतात
ते जुमानत नाही कशास
मग
कितीही बांधा गंडे दोरे
किंवा
करा खुशाल दवादारू..!!
कसेल त्याची जमीन
घुसेल त्याची जागा
असंच जणू समजतात
काही हक्कही गाजवतात..
आपला हिस्सा
लीलया काढून घेतात..
जणू हक्काचे वारसदार
असल्यासारखेच ते वागतात..!!
रोग असो वा
असो नात्यांचा गोतावळा..
शीतं तिथं भुतं
हे ठरलेलेच असते..
माणसाचं शरीर असो
वा असो
त्याच्या मालकीचे घर
केवळ म्हणण्यापुरते
ते त्याचे असते..
आज ना उद्या
परंतु
तेच दुसऱ्याच्या स्वाधीन
होणार असते..!!
***सुनिल पवार....✍🏽

Thursday, 27 April 2017

|| बर्म्युडा ट्रँगल ||

ही कथा आहे प्रेमाच्या त्रिकोणाची, जातीच्या बर्म्युडा ट्रँगलची. जी ग्रासून टाकते कोवळ्या प्रेमाच्या पालवीस. डोळ्यात सजवलेल्या कैक स्वप्नांना क्षणात मातीमोल करते. जातीचा हा बर्म्युडा ट्रँगल सहज गिळून टाकतो एखाद्या उमलत्या कळीला, जाळून टाकतो तिच्या संपूर्ण आयुष्याला.
ह्या कथेच्या नायिकेच्या वाट्याला असाच एक बर्म्युडा ट्रँगल आला. आणि भावी स्वप्नांना सुरुंग लावून गेला आणि भस्म झाल्या त्या जीवनाच्या राखेतूनचं या कथेचा जन्म झाला.
ह्या कथेची सुरवात होते त्या वळणावर जिथे कळीला आपण उमलत असल्याची जाणीव होत जाते. वाऱ्यावर झुलणाऱ्या त्या कळीच्या आजूबाजूस भुंग्याची चहल पहल सुरु होते. अशीच एक कळी होती जिचे नाव होते स्वप्नाली. 

स्वप्नाली या नावाप्रमाणेच तिच्या पाणीदार डोळ्यात स्वप्नांचे भव्य इमले सजलेले होते. भावी जोडीदाराचे चित्र मनात तसेच छान रेखाटले होते. दिसायला गोरी पान, नाकी डोळी छान, अल्लड लाघवी स्वभाव, रुपगर्विता जशी, साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. वाऱ्याच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या फुलाने आजूबाजूच्या बहुतेक भुंग्याना वेड लावले होते. कैक भुंग्यांनी तर तिच्या वाटेवर आपले हृदय अंथरले होते. तिच्या रुपेरी देहावर शब्दांचे तलम मोरपीस कितीदा तरी फिरले होते. कधी कधी अप्रूप वाटायचं तिला आपल्या रुपाचं, ती अधून मधून स्वतःला आरशात न्याहाळायची अन नित्य स्वतःशीच बोलायची, निवडेन एखाद्या सुयोग्य राजकुमाराला, जो साकारेल माझ्या स्वप्नांना, तोच स्पर्शील ह्या सुंदर देहाला. 

किती भुंगे आले अन किती गेले परंतु ती बधली नाही कोणाला. मात्र त्यातील दोन भुंगे मात्र असे होते, ज्यांनी तिचे लक्ष विचलित केले. ते दोघेही घुटमळायचे तिच्या भोवती परंतु त्यांचे घुटमळणे काहीसे वेगळे होते. जणू तिला अभिप्रेत असणारे गुण त्या दोघांत सगळे होते. ती तुलना करायची दोघांची मात्र मनाचा काटा दोलायमान होत असे. कोण अधिक चांगला हा निर्णय काही होत नसे. मग तिने ठरवले की दोघांशी मैत्री करायची म्हणजे सहज कळेल कोण डावा आणि कोण उजवा. जो असेल उजवा त्याचाच हाती आपला हात सोपवावा.
इतर भुंग्याप्रमाणे तिने या दोन्ही भुंग्याना सुद्धा आजपर्यंत आपल्यापासून दूर ठेवले होते. पण आज मात्र तिच्या मनात वेगळेच होते. अपेक्षेप्रमाणे त्यातील एक भुंगा तिच्या भोवती गुंजराव करण्या आला. त्याचे नाव होते आदित्य. 

आदित्य हा दिसायला रुबाबदार, शानशौकीत राहणारा होता. कॉलेजमध्ये शिकत होता. बेडर राडेबाज, भाषा सुद्धा थोडी रांगडी, त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नव्हता. असं असलं तरी तो विचारांनी खूप चांगला मित्रांचा सच्चा मित्र होता. स्वाभिमानी, परखड बोलणारा, हाजी हाजी करणे त्याच्या रक्तात नव्हते. छोट्यांशी मिळून मिसळून राहायचा, मोठ्यांना आदर द्यायचा. हा चागल्या लोकांबरोबर वाईट प्रवृत्तीच्या लोकांत सुद्धा सहज मिसळायचा. त्यामुळे लोकांत त्याच्या बद्दलची भावना मिश्र अशी होती. काही लोक त्याला फार चांगाला म्हणायचे तर काही त्याला गुंड समजायचे. असा हा आदित्य रोड रोमियो मुळीच नव्हता मात्र स्वप्नालीला जेव्हा पाहिले, त्याचे त्यालाच कळले नाही काळीज केव्हा हरवले.? रोज तो स्वप्नालीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, रस्त्यात अडवून एक दोन वेळा विचारले सुद्धा पण ही रूप गर्विता त्याला काही जुमानत नव्हती.
आज तो सुदिन आला. त्याला अपेक्षा मुळीच नव्हती पण तरीही त्याने सहज थांबवले तिला. आणि काय आश्चर्य ती थांबली. त्याने तिच्यासमोर आपले मन मोकळे केले. पण त्याचे बोलणे तसेच रांगडे होते. ती हसली त्यावर व म्हणाली, तूझं माझ्यावर प्रेम आहे हे मला कळतंय पण असा एकाएकी होकार तरी कसा देऊ.? मी तुला नकार देत नाही पण माझ्या भावना समजून घे. तुला जाणून घ्यायला मला अजून वेळ हवा आहे. यावर आदित्य तिला म्हणाला, तू आज माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलली हेच माझ्यासाठी खूप आहे. तुला पाहिजे तितका वेळ घे, या पुढे मी तुला अडवणार नाही. त्याचे हे रोखठोक पण समजुतीचे बोलणे स्वप्नालीला मनापासून आवडले. एक क्षण तिला असे वाटले की होकार देऊन टाकावा पण दुसऱ्या क्षणी दुसरा भुंगा मनात गुंजराव करू लागला आणि तिने सावरले मनाला. पण तरीही जाणवले तिच्या मनाला की असं एकाएकी आदित्यला दूर नको करायला म्हणून मग ती त्याला हात पुढे करत म्हणाली, आदित्य.. मला चालेल तू पुन्हा अडवले तरी. मी काय म्हणते.. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे अधोरेखित झाले आता फक्त माझा निर्णय उरलाय. तो आज ना उद्या कळेलचं तुला.. पण तोपर्यंत आपण चांगले मित्र बनून राहायला काय हरकत आहे..? सांग तुझं काय मत आहे.? तिचा हा प्रस्ताव ऐकून आदित्यने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने तिला सहर्ष अनुमोदन दिले. आणि अशा तऱ्हेने सुरवात झाली एका नव्या मैत्रीच्या पर्वाला.

त्याच दिवशी सायंकाळी दुसरा भुंगा तिच्या वाटेवर आडवा आला. या भुंग्याचे नाव होते, संदेश. संदेश हा स्वभावाने आदित्यच्या विपरीत होता. संदेश सहसा कोणाच्या भानगडीत कधीच पडला नाही. जिथे धोका वाटला तिथून काढता पाय घेतला. मवाळ धोरण पण अस्सल कावेबाज, गोड बोलून इप्सित साध्य करून घेण्यात त्याचा हातखंडा होता. भाषेवर चांगले प्रभुत्व असल्यामुळे त्याचे उठणे बसणे चांगल्या लोकांत होते. त्यामुळे लोक त्याला चांगला सज्जन  समजत होते. त्याची राहणीमान आदित्य प्रमाणेच शानशौकीची होती. मात्र त्याचा पेहराव एखाद्या कॉर्पोरेट जगताचा ऑफिसर शोभावा असाचं असायचा. तसा तो ही कॉलेजचाच विद्यार्थी होता. पण आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न आटोकाट करायचा. 

आज त्याचाही प्रयत्नाला यश आले. स्वप्नाली त्याला ऐकण्यास थांबली. त्याने आपले हृदय स्वप्नालीसमोर अशा पद्धतीने अंथरले की, स्वप्नाली अगदी हुरळून गेली. त्याच्या बोलण्यातील मार्दव तिला अधिक भावले. त्याच्या त्या उच्च संवादफेकीने ती प्रभावित झाली. तत्क्षणी ती आपला संकल्प विसरली. संदेशने स्वप्नालीवर मोहिनीचं अशी घातली ती संदेशला होकार देऊन बसली.

आता संदेश सरिताचे प्रेम फुलू लागले. इकडे आदित्यला त्याची खबर सुद्धा नव्हती. तो मन मोकळे करून स्वप्नालीशी बोलायचा. त्याचा बोलण्यात केवळ निखळपण होता. पण ते निखळपण स्वप्नालीला जपता आले नाही. तिने आदित्यला अगदी अंधारात ठेवले. पण म्हणतात ना कोंबडे कितीही झाकून ठेवले तरी दिवस उगवायचा थांबत नाही. आणि प्रेम लपवता लपत नाही. हळू हळू संदेश, स्वप्नालीची चर्चा आदित्यच्या मित्रात होऊ लागली. पण आदित्यने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याबद्दल त्याने स्वप्नालीला कधी विचारले सुद्धा नाही. तो पूर्वीसारखाच तिच्याशी चांगला बोलत होता. दिल्या वाचनाला तो खऱ्या अर्थाने जागत होता.

काही महिन्यात संदेशचे स्वप्नालीच्या घरी येणे जाणे वाढले. आदित्यला तसे मित्रांनी सांगितले पण तरीही त्याने दुर्लक्ष केले. अन एके दिवशी त्याने त्या दोघाना एकमेकांशी खेटून येताना आपल्या डोळ्यांनी पाहिले. तिच्या सुंदर चेहऱ्यामागचा काळा चेहरा क्षणात दृष्टीस पडला. ते दृश्य पाहून त्याच्या मनाचा तीळपापड झाला. खास करून संदेशला तिच्या सोबत पाहून त्याला अतीव दुखः झाले. पण मोठ्या संयमाने त्याने आपला राग आवरला. त्याने दोघांना पाहिल्या न पाहिल्या सारखे केले व तिथून दूर झाला. 

दिवसावर दिवस सरले, महिन्यावर महिने सरले. आदित्य आता स्वप्नालीपासून नकळत दूर झाला होता.. मात्र कधी रस्त्यात ती भेटली तर मात्र काही झालेच नाही या अविर्भावात बोलत होता. शेवटी त्याने तिच्यावर प्रेम केले हे कसे तो विसरणार होता.?
आता स्वप्नाली संदेशचे प्रेम सर्व दूर पसरले. सहाजिक स्वप्नालीच्या घरच्यांना काळजीने घेरले. त्यांनी दोघांचे लग्न करण्याचे ठरवले. त्यांनी त्यासाठीच संदेशला घरी बोलावले त्याप्रमाणे तो आला सुद्धा, पण लग्नाचा विषय काढता त्याने साफ नकार दिला. तो म्हणला, स्वप्नालीचे आणि माझे फक्त मैत्रीचे संबध आहेत. माझे प्रेम कधीच नव्हते. स्वप्नाली माझ्यावर प्रेम करत असेल तर मला माहित नाही. आणि जरी मी स्वप्नालीसाठी होकार दिला तरी हे लग्न होणे नाही. कारण आमचे घराणे उच्च कुलीन आहे. माझ्या घरचे खालच्या जातीची सून कधीच स्वीकारणार नाहीत. आणि मी त्यांच्या आज्ञेबाहेर नाही. 

संदेशचे ते उद्गार ऐकुन स्वप्नाली उसळून उठली व म्हणाली, याचा विचार शेण खाण्याआधी करायचा होता. तेव्हा का नाही रे तुझी जात आठवली.? माझ्या देहाला स्पर्श करताना तुझा धर्म कुठे तोंड लपवून बसला होता.? तेव्हा घरच्यांना तू विचारले होते का.? प्रेमाची भिक मागताना जराही लाज वाटली नाही ना..? तुमच्या सारखी सभ्यतेचा बुरखा पांघरणारी लोकं समाजासाठी कलंक आहेत.. कलंक. साले दुतोंडी सापाची अवलाद.. एकीकडे निष्पाप मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा उचलायचा आणि दुसरीकडे जातीची ढाल वापरून पलायन करायचं.. थू तुझ्या जिंदगीवर.
संदेशने तिचा तो रौद्र अवतार पाहून गुचूप काढता पाय घेतला. जणू काही झालेच नाही या अविर्भावात तो परिसरात वावरू लागला. पण स्वप्नालीच्या स्वप्नांचा क्षणात चोळामोळा झाला. झाल्या प्रकाराने ती साफ कोलमडून गेली. अशी कशी मी भुलले..? त्याचा गोड बोलण्याला फसले. का मी पडताळले नाही त्याला.? काय झाले होते माझ्या सारासार विचाराला.? याच्यापेक्षा आदित्य लाख पटीने चांगला होता. तो जागला आपल्या शब्दाला. मग मी का नाही स्वीकारले त्याला.? पण तो सुद्धा वरच्या जातीचा आहे. का तो ही असाच वागला असता.? प्रेम करायला जात आडवी येत नाही. मग नेमकी लग्नाच्या वेळेसच का उपस्थित होते.? खालच्या जातीत जन्मले यात माझा दोष काय.? का समाज माणसाला माणूस समजत नाही.? विचार करून स्वप्नालीच्या डोक्याचा भुगा झाला.पण तिला उत्तर काही मिळाले नाही. मिळाले ते फक्त अवहेलना आणि उपेक्षा.

एकाच विभागात राहून संदेशला विसरणे स्वप्नालीला सहज शक्य नव्हते. कारण कुठे ना कुठे येता जाता मार्गात त्याचे दर्शन होत होते. पण जणू, तो मी नव्हेच असेच त्याचे वर्तन होते. तरीही एक दोन वेळा तिने पुन्हा विनवून पाहिले. पण त्याने साफ धुडकावून लावले. त्यानंतर ती कधी दिसली असता त्याचे मित्र हळूच संदेशला खुणावायचे. शेरेबाजी करायचे. ते पाहून स्वप्नालीस मेल्याहून मेले व्हायचे. मन मुक्त डवरणारे हे फुल मलूल दिवसेंदिवस दिसू लागले. 

संदेशचा विसर पडावा म्हणून तिने नोकरी पकडली. कामावर दिवस चांगला जात असे पण पुन्हा विभागात आल्यावर कुठे ना कुठे तिला तो दिसायचा आणि तिचा चेहरा पुन्हा मलूल व्हायचा. अशीच एके दिवशी कामावरून परतत असताना तिची गाठ आदित्यशी पडली. तिचा मावळलेला चेहरा पाहून त्याने विचारले, काय ग स्वप्नाली.. आजारी वगैरे आहेस का..? किती निस्तेज दिसते आहेस.? यावर स्वप्नाली उत्तरली, नाही रे सहज.. कामाच्या व्यापामुळे काहीसा थकवा जाणवतो.. त्यामुळे तुला तसे वाटत असेल..? तिच्या त्या उत्तरावर आदित्य काय समजायचे ते समजला व सरळ विषयाला हात घालत म्हणाला, संदेशबरोबर काही बिनसले का..? आदित्यचा तो प्रश्न ऐकून स्वप्नाली मनोमन हादरली. पण नंतर स्वतःस सावरत संपूर्ण हकीगत त्याला कथन केली. व त्याला अंधारात ठेवल्याबद्दल माफी सुद्धा मागितली. तिची हकीगत ऐकून तो तिला म्हणाला. मला माहित होतं हे असंच घडणार. खूप वेळा मनात आले की तुला सांगावे पण द्विधा मनस्थितीत सांगू शकलो नाही. न जाणे तुला माझे म्हणणे पटले असते की नाही.? कदाचित तुला असेही वाटले असते की, तु मला मिळाली नाही म्हणून मुद्दाम तुझे कान भरतोय. त्यामुळेच मी नाईलाजाने गप्प बसलो. त्याचे ते बोल ऐकून ती काकुळतीला येऊन म्हणाली, एकदा तरी बोलून दाखावाचे होते रे..? निदान सावध तरी झाले असते. प्रेमी म्हणून नाही निदान मित्र म्हणून सांगायचे होते.? स्वप्नालीच्या त्या मैत्रीच्या दाखल्यावर आदित्य छद्मीपणे हसला व म्हणाला, मैत्री..? कोणाची मैत्री..? ती तुला तरी कळली का..? कळली असती तर मला असं अंधारात तू ठेवलं नसतं..? आदित्यच्या प्रश्नाला तिच्याजवळ  उत्तर नव्हते.. ती काही न बोलता एखाद्या अपराध्यासारखी खाली मान घालून उभी राहिली. तिची ती अवस्था पाहून आदित्यला तिची दया आली. म्हणाला, सॉरी तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता. पण मैत्री ही विश्वासाच्या पायावर उभी असते गं, तो पायाच जर डळमळीत असेल तर त्या मैत्रीला काहीच अर्थ उरत नाही. आदित्यच्या बोलण्याने स्वप्नाली खजील झाली व म्हणाली खरंच मला माफ कर मी चुकले. मी तुला नाही समजू शकले. यापुढे अशी चूक होणार नाही. आपली मैत्री अशीच कायम राहू दे. तुझ्या मैत्रीमुळे तरी निदान जगण्यास नवे बळ मिळेल. तिचे भावूक उद्गार ऐकून आदित्य अंतर्बाह्य हेलावला व म्हणाला, बरं.. आता या पुढे काय करायचं ठरवले आहे.? त्यावर तिने खिन्नपणे उत्तर दिले म्हणाली, ठरवण्याचे अधिकार मी केव्हाच गमावले आहेत, किंबहुना तसे अधिकार मला नव्हतेच कधी. तसे असते तर एव्हाना मी ठरवल्याप्रमाणे घडले असते. हे जग दिसायला आकर्षक असले तरी त्याच्या अंतरात केवळ अंधकार भरून आहे, हे मला आता कळलय. या जगात जात खूप मोठी असते आणि माणूस मात्र एकदम खुजा. माणसाने जगायचं ते जातीत आणि मारायचं सुद्धा जातीत. प्रेम,प्यार,इश्क,love जातीपुढे सब बकवास. म्हणून आता ठरवले आहे. आपणही जातीचीचं माती खायची. त्यामुळे निदान आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल.? स्वप्नालीचे ते निर्वाणीचे उद्गार ऐकून आदित्य तिला समजावणीच्या सुरात म्हणाला, हे बघ स्वप्नाली, एक माणूस वाईट निघाला म्हणून सगळे जग वाईट असते असे नाही. काही चांगली माणसे आहेत या जगात म्हणून जगरहाटी सुरळीत सुरु आहे. आणि काही असेही आहेत, जे जातीला दुय्यम आणि माणसाला प्रथम मान देतात. पण तुला ते दिसत नाहीत. कारण संदेशच्या प्रेमापलीकडे तू कधी कुठे पाहिलेच नाही. आदित्यच्या बोलण्यावर ती छद्मीपणे हसली व म्हणाली, तू सुद्धा उच्च जातीचाचं आहेस ना..? मग तू करशील का माझ्याशी लग्न.? माझ्यासारख्या खालच्या जातीच्या मुलीला सून म्हणून तुझे घरचे स्वीकारतील..? सांग ना... स्वीकारतील..? स्वप्नालीच्या प्रश्नावर आदित्य तडक म्हणाला, घरच्यांच माहित नाही पण माझ्याबद्दल म्हणशील तर माझी काहीच हरकत नाही. हा..आता घरचे जरा जुन्या वळणाचे आहेत, पण माझी खात्री आहे त्यांचं मन वळवण्यात मला यश येईल. फार तर काय वर्षभर ताणून धरतील. मग नातवंडाच तोंड पाहताच सर्व विसरून जातील. मग काय विचार आहे तुझा.? करशील माझ्याशी लग्न..? मी तयार आहे.

आदित्यच्या प्रश्नावर स्वप्नाली काहीसी भावूक झाली व म्हणाली, किती मोठ्या मनाचा आहेस तू.? मी मात्र केवळ तुझ्याबद्दल गैरसमज पाळले. कबुल करते मी, माझी निवड साफ चुकली. त्याच्या लाघवी बोलण्याला भुलले. प्रत्येक पाऊल जपून टाकणारी मी, न जाणे त्या दिवशी काय झाले.? मी माझा सारासार विचार हरवून बसले. तिचे असे हतबल उद्गार ऐकून आदित्य तिला समजावत म्हणाला.. जाऊ दे..जे झालं ते झालं.. चूक ही माणसाकडूनचं होते. चुकांतून शिकत पुढे जायला हवे. म्हणून सांगतो आयुष्याचा नव्याने विचार कर. मात्र त्या विचारात मला जमेस धर. आदित्यच्या बोलण्याने स्वप्नाली सुखावली व किंचीतशी हसली.व म्हणाली इतकं सर्व कळून सुद्धा तू मला होकार देतो आहेस हे तुझे मोठेपण आहे. पण खरं सांगू मी तुझ्या लायक नाही. तेव्हा इच्छा असूनही मी तुला होकार देऊ शकत नाही. संदेशसोबत नाव जोडून मी माझी बदनामी ओढवून घेतलीच आहे. त्यात तू आणखी वाटेकरी नको. माझ्यामुळे उगाच तुझी बदनामी नको. स्वप्नालीचा नकार ऐकून आदित्य उसळून म्हणाला, माझ्या बदनामीच मी बघून घेईन, नाही एक एकाचे दात घशात घातले तर नाव सांगणार नाही. कोण आहेत ही लोकं..? तू का त्यांची पर्वा करते..? साली ही जी लोकं तुला नावं ठेवतात.. ती तरी कुठे धुतल्या तांदळाची आहेत.. तो संदेश लोकांसमोर सज्जन बनून फिरतो.. तुला ही तसाचं वाटला होता ना..? काय झाले..? दिसले ना त्याचे असली रूप..? हे बघ.. तू फक्त हो म्हण मग बघ ही संदेशची अवलाद कशी शेपूट घालून पळ काढते ती.. तुला बोलायचं तर दूर तुझ्याकडे नजर वर करून बघायची हिंमत होणार नाही साल्यांची.. आदित्यचा रौद्र अवतार पाहून ती त्याला शांत करत म्हणाली, अरे उगाच डोक्यात राग घालून काही साध्य होणार आहे का..? माझा निर्णय ठाम आहे.. माझ्यावर जर खरोखर तुझे प्रेम असेल तर मला विसरून जा. अथवा माझ्या या देहाची लालसा असेल तर तसे सांग.. मी तयार आहे.. मग त्यासाठी तुला लग्नही करायची ही  गरज नाही.. आता तुझ्याकडे केवळ हेच दोन पर्याय आहेत.. काय निवडायच ते तुझं तू ठरव. स्वप्नालीचे ते निर्वाणीचे बोल ऐकून आदित्यची तळपायाची आग मस्तकात गेली.. वाटले की तिच्या कानाखाली दोन सणसणीत ठेवून द्याव्या.. काय समजते ही मला..? आणि काय समजते ही स्वतःला.? पण त्याने आपला आपला राग मोठ्या प्रयासाने आवरला व कोणतेही प्रतिउत्तर न देता तिथून निघून गेला.

आदित्य निघून जाताच स्वप्नाली मनाशी म्हणाली, माफ कर मला आदित्य. तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. खूप मोठं मन आहे तुझं. पण मी तुझ्या लायक नाही. माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात वादळ यावे हे मला रुचणार नाही. म्हणूनच तुला मी नकार देतेय. शक्य झाले तर मला माफ कर.
प्रेमी गमावल्याच दुखः तिने या आधीच पेललं होतं पण आज दिलदार मित्र गमावला होता याचं शल्य अधिक बोचरे होते. नकळत तिचे डोळे पाण्याने डबडबले डोळ्यावर अंधारी आली व त्याच अवस्थेत ती घरी पोहचली.

काळ किंचित पुढे सरकला. तरी घाव अजूनही गहिरे होते. स्वप्नालीच्या आई वडिलांना तिच्या लग्नाच्या काळजीने घेरले. अशात एक नात्यातले स्थळ चालून आले. मुलगा ओळखीतला आहे, स्वप्नालीचा चांगला सांभाळ करेल. शिवाय शेजारपाजारच्या चर्चेला पूर्ण विराम मिळेल या हेतूने स्वप्नालीस लग्नाची गळ घातली आणि त्यांच्या समाधानासाठी ती मुलगा पहायला तयार झाली.
ठरल्या दिवशी मुलगा आला. त्याने पाहताक्षणी स्वप्नालीस पसंत केले. पसंत न करण्यासारखे काहीच नव्हते. कारण तो अमावास्या तर स्वप्नाली पौर्णिमा होती. तो कोबीचा कांदा तर स्वप्नाली गुलाब कळी होती. शिवाय त्याच्या मानाने स्वप्नाली शिक्षणात तसेच पगारात सुद्धा उजवी होती. मग अशा मुलीस कोण मूर्ख नाकारेल.? त्याने स्वप्नालीला पसंत केले हे पाहून तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. पण मुलीला काय आवडते ह्याचा विचार कोणी केला..? कोणीच नाही. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत मुलींची हीच शोकांतिका आहे की प्रत्येक वेळी तिला गृहीत धरले जाते.. स्वप्नालीच्या बाबतीतही तसेच झाले. तिचे मन आधीच मेले होते. मग या अचेत देहास कोणत्याही सरणावर ठेवा काय फरक पडतो.? इथे काय अन तिथे काय..?  जळणे कुठे चुकणार आहे.? हाच विचार करून आई वडिलांच्या इच्छेखातर तिने होकार दिला.  

काही दिवसातच लग्न उरकले. स्वप्नाली तिच्या सासरी आली. राजा राणीचा संसार सुरु झाला. मात्र आठवड्याभरात त्याला सुरुंग लागला. मित्र मंडळीत तसेच शेजारीपाजारी स्वप्नालीचा नवरा चर्चेचा विषय ठरला. लंगुर के हाथ अंगूर अशा पद्धतीची टिपण्णी ऐकू येऊ लागली. सहाजिक त्याच्या मनात संशयाच्या किड्याचा शिरकाव झाला. इतकी देखणी, शिकलेली मुलगी इतक्या सहज त्यांनी दिलीच कशी.? नक्कीच हीचं बाहेर काही लफडं असावं..म्हणूनच माझ्या गळ्यात मारलं असावं. असा त्याचा पक्का ग्रह झाला आणि स्वप्नालीचे दशावतार सुरु झाले. मन मानेल तसा तो तिच्या मनाचे तसेच शरीराचे लचके तोडू लागला. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो पाळत ठेवू लागला. त्यामुळे कुणाशी साधे बोलणे सुद्धा दुरापास्त झाले. तेव्हा तिला जाणवले आदित्यला नकार देऊन आपण पुन्हा घोडचूक केली. आदित्य सोबत असता तर त्याने फुलासारखे जपले असते. भले काही दिवस सासू सासरे फटकून वागले असते पण या मरण यातनातून तरी सुटले असते. पण आता विचार करण्यात काही अर्थ नव्हता. पदरी पडलं आणि पवित्र झालं या उक्ती प्रमाणे ती दिवस कंठत होती.
वर्षभरात स्वप्नालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. स्वप्नालीची पडछाया जणू. वाटले मुलीला पाहून आता तरी तो सुधारेल. त्याचे अत्याचार थांबतील पण नाही. तिच्या जीवनाचे दुःचक्र थांबण्याचे नाव घेत नव्हते. मुलगी कलेकलेने वाढत होती, बघता बघता चार वर्षाची झाली. पण तरीही स्वप्नालीच्या नवऱ्याची मती बदलली नाही. शेवटी एके दिवशी सहनशक्तीचा कडेलोट झाला, जेव्हा त्याने मुलीवर इवल्याशा चिमुरडीवर हात उचलला. तत्क्षणी तीच्यातील सौदामिनी कडाडली व घरदार सोडून मुलीला घेऊन तिथून निघाली. 

नवऱ्याचे घर सोडून तर ती निघाली पण अशी एकाएकी कुठे जाणार होती.? तिला काहीच कळत नव्हते. डोक्यात विचारांच काहूर आणि पाय नेतील तिकडे ती निघाली होती. काही वेळाने मुलगी भुकेने रडायला लागली आणि स्वप्नाली भानावर आली. जवळच्या एका हॉटेलमध्ये तिने मुलीला नेले. तिला खायला दिले. पोट भारताच ती चिमुरडी आईशी खेळू लागली. तिचा तो निरागस चेहरा पाहून स्वप्नाली आपले दुखः विसरली व मनाशी ठाम निश्चय करत म्हणाली, आता जगायचं ते केवळ हिच्यासाठी. मी साहिले ते साहिले.. मात्र मझ्या मुलीला तसे साहू देणार नाही. मी चुकले पण तिला चुकू देणार नाही. तिला तिच्या भल्या बुऱ्याची जाण योग्य वेळी देईन. माझी स्वप्न भंग पावली पण तिची स्वप्न पूर्ण करीन. माझ्या उर्वरित आयुष्याचा गाडा मी एकटीनेच ओढेल. आता या पुढे माझ्या जीवनात कोणीही पुरुष येणार नाही. आता मी कोणाच्या प्रेमाला, कधीच भिक घालणार नाही. ह्या राख झाल्या जीवनातून मी पुन्हा भरारी घेईन.. मी पुन्हा भरारी घेईन..

मित्रांनो प्रेम जरी आंधळे असले तरी ते डोळसपणे करणे काळाची खरी गरज आहे. मान्य की प्रेमाची उत्पत्ती हृदयातून होते आणि तेच खरे प्रेम असते. असे असले तरी अलीकडे मानवी मेंदूतून उपजणारे, डोळ्याला भुरळ पाडणारे प्रेम, तुमचा गळा कधी घोटेल हे सांगता येणार नाही. जातीच्या पडद्या आडून प्रेमावर वार करणारा हा संदेश आपल्या समाजात एकमेव नाही असे कैक संदेश याच समाजात सुरुंगा प्रमाणे विखुरले गेले आहेत. चुकून जरी कोणा स्वप्नालीचा पाय त्या सुरुंगावर पडला तर तिच्या देहाच्या क्षणात चिंधड्या उडाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रेमात प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची आवशकता आहे. एक छोटासा निर्णय जरी चुकला तर त्याची भरपाई मात्र आयुष्यभर करता येत नाही. जशी या कथेतील नायिकेला करता आली नाही. पाच वर्षाचा काळ उलटून गेला. आज ती विध्वंसाच्या वाटेवर उभी आहे. तिला ह्या वाटेवर उभा करणारा संदेश सामाजात उजळ माथ्याने वावरतोय. तो आज त्याच्या संसारात मग्न आहे. तिचा नवरा तो तर तिच्याच जातीचा होता. तो सुद्धा तिचे दुखः समजू शकला नाही. आणि तिच्या दुखाःचा वाटेकरी बनू पहाणारा तिच्या मैत्रीला खऱ्या अर्थाने जागणारा आदित्य, तो ही सारं विसरून आपल्या संसारात व्यस्त झाला आहे. स्वप्नाली मात्र छोट्या कळीला कवटाळून राखेतून पुन्हा स्वप्न शोधते आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री ची हीच शोकांतिका आहे. जातीत असो वा जातीच्या बाहेर वनवास तिचा अजून संपला नाही..

उमलण्या आधीच, कळ्यांच्या प्राक्तनी ओघळणे येते..
ऋतू कोणताही असो, पानांचे नेहमीच गळणे असते..!!

साचलेले डबके असो, वा असो पाणी खळखळते..
संकुचित दगडांचे तसेच, वरवरचे हिरवळणे असते..!!

किती जपावे आरशास, ओरखड्या पासून, कशास ते..?
नुसत्या स्पर्शानेही नशिबी त्याच्या, डागाळणे असते..!!

माथ्यावरील सूर्याचे, शाश्वत जरी कवडसे ते..
एक मेघ साशंक अन आसमंताचे ढगाळणे असते..!!

किती गायिले गोडवे जगी चंद्र, चांदण्याच्या प्रीतीचे ते..
वातीच्या नशिबी केवळ तेच, रात्रीचे जळणे असते..!!   
समाप्त..


|| नाणे ||

|| नाणे ||
======
ते खणखणीत असेल
समजून
मी त्याला जवळ केलं
नीट निरखून पाहिले
तेव्हा कळले
दोन बाजू होत्या त्याला
वरची बाजू जरा उजळ
पण धूळ होती त्यावर
मी लाख फुंकर मारली
नाही उडाली
चिकटून बसली होती जणू..
मी पालटून पाहिली
दुसरी बाजू
तर ती ही होती काळी
बऱ्याच वर्षांपासून
पालटले नसावे तिला
ती अंधारात होती जणू..
मी लाख चालवू पाहिले
ना चालले ते कुठे
अहंपणाचे नाणे
असते निव्वळ खोटे..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| भीष्म बळी ||

|| भीष्म बळी ||
==========
शरपंजरी पडलेल्या भीष्मांचं शल्य
नाहीच कुणी का कधी जाणले..?
तोंडचं पाणी हिरावण्यास पहा
अर्जुनाने ही धनुष्य ताणले..!!

त्याचीच होती ही भूमी सारी..
अन, त्यानेच होता शकट हाकला..
एकनिष्ठतेचा निष्ठावान पाईक
त्याच्याच मातीत उपरा ठरला..!!
जगणे केले मुश्किल जगाने
मरणानेही ना प्रश्न सुटले..
इच्छा मरणाचे वरदान असे
त्याच्यावर हे कोणी लादले..?
अथक लढतोय अजून स्वतःशी
मार्गात परी कैक शिखंडी..
निष्प्रभ होती प्रयत्न सारे
कोण सोडविल मृत्यूच्या गाठी..??
****सुनिल पवार....✍🏽

Tuesday, 18 April 2017

|| शृंखला ||

💝तिच्यातील ती💝
=============
शृंखला..

म्हणाली ती
किती प्रेम करतो
एकदा शब्दात कळू दे..
म्हटले मी
बघ ना जरा नजरेत
बिलकुल नको ढळू दे..!!

म्हणाली ती
हे रे काय..?
आवाज कुठे त्यात.?
म्हटले मी
ऐक ना नीट
ती लय आहे हृदयात..!!

म्हणाली ती
काही तरीच काय.?
त्यास स्पंदन म्हणतात..
म्हटले मी
बरोबर आहे तुझं
पण ती प्रेमातच उमटतात..!!

म्हणाली ती
फसवतोस तू
हे काही खरे उत्तर नाही..
म्हटले मी
भरून बघ ना श्वासात
या सम दुसरे अत्तर नाही..!!

म्हणाली ती
कळत नाही का
पण शब्दात उणीव भासते..?
म्हटले मी
शक्य आहे
पण जाणीव तशी नसते..!!

म्हणाली ती
असेल तसं
तर दाखवून दे दाखला..
म्हटले मी
मिटून घे डोळे
अन सजवून घे शृंखला..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| प्रेम,प्यार,इश्क,लव्ह ||

|| प्रेम,प्यार,इश्क,लव्ह ||
===============
हल्ली प्रेमालाही कळत नाही
मौनाची सूचक हळवी भाषा..
बदलत्या प्रेमाच्या परिभाषेत
पदरी पडते केवळ निराशा..!!


वेगवान झालेल्या ह्या जगात
थांबायला कुठे वेळ असतो..?
ह्या फुलावरून, त्या फुलावर
फुलपाखराचा खेळ दिसतो..!!

दिवसेंदिवस विरळ होतेय
हृदयाची अनामिक हुरहूर..
लुप्त झाल्या तरल भावना
हिंसक होतेयं शुल्लक कुरबुर..!!

संयमाची खडतर वहिवाट
चोखंदळत नाही आता कुणी..
विरहाची झालर झाली जुनी
केलीय तिचीच पायपुसणी..!!

प्रेम, प्यार, इश्क, लव्ह
भरता पोट होते बेचव..
क्षणाच्या आकर्षणापोटी
क्षणिक दिसते सर्व उठाठेव..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| भीमा तुझ्या प्रज्ञेने ||

|| भीमा तुझ्या प्रज्ञेने ||
============
तिमिराचे चिरुनी काळीज
पहाट नवी झाली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!धृ!!

पिचलेल्या जनतेमध्ये
जान नवी आली..
समतेच्या किरणांनी ही
वाट सुकर झाली..
पसरल्या हातांचीही
वज्रमुठ झाली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!

बाळ तडफडे पाण्याते
तहान बहू लागली..
तरी दृष्ट धर्मांधांस
दया नाही आली..
आग लावून पाण्यास
तळी खुली केली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!

चहूओर जातीयतेची
अराजकता वाढलेली..
विटाळाच्या वेटोळ्यात
छाया घुसमटलेली..
दिली धर्मा तिलांजली 
मुक्त झाली सावली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!

बहु झाले विरोध जरी
पर्वा नाही केली..
संविधान लिहून तयांना
चपराक दिली..
महामानव बाबा माझा
जनता बोलू लागली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| मन ||

|| मन ||
=====
जीवनात माणसाचं येणं जाणं
निरंतर असचं चालत असतं..
कधी हळुवार फुंकर
तर कधी, हृदय जाळत असतं..!!


कोणी स्वीकारत असतं मनाने,
कोणी कुणाला टाळत असतं..
त्याला/तिला कळलं न कळलं.?
आपणास मात्र कळत असतं..!!

जगण्याच्या चढाओढीत इथे
प्रत्येक मन पळत असतं..
एकांतात बसता कधी
आठवणीत छळत असतं..!!
***सुनिल पवार....✍🏽😊

|| त्याच्या अंगणात ||

|| त्याच्या अंगणात ||
============
त्याच्या अंगणात
प्रेमे विसावतात..
मुक्याचे बोलणे
नयन बोलतात..!!
त्याच्या अंगणात..


स्वप्नांचे इमले
वाळूत सजतात..
किती साकारतात?
कैक ढासळतात..!!
त्याच्या अंगणात..

वाऱ्याची लगट
कुंतल उडतात..
हृदयाची दारं
हळूच उघडतात..!!
त्याच्या अंगणात..

रंगांची उधळण
होते क्षितिजात..
आतुरतो रवी
उतरण्या हृदयात..!!
त्याच्या अंगणात..

पाठशिवणीचा खेळ
लाटा खेळतात..
ओहट विरहात
कातळ ओलावतात..!!
त्याच्या अंगणात..

उमटली पावलं
पाण्यात विरघळतात..
मोत्याचा शिंपला
सागराच्या तळात..!!
त्याच्या अंगणात..
***सुनिल पवार..✍🏽

|| देखल्या देवा ||

|| देखल्या देवा ||
===========
हेच का फळ मम तपाला?
का घेरे अंधार गाभाऱ्याला..?
प्रेम दीपक मन मंदिरी लाविला
कुण्या वादळाने निर्दये विझविला..??

आता भग्न झाले मंदिर मनाचे
ना चाड त्याची दिसे कुणाला..
अडगळीत फेकून हृदयातील मूर्ती
का पूजले असे देखल्या देवाला..??
****सुनिल पवार..✍🏽
आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतून)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-81

Tuesday, 4 April 2017

|| ती एक कविता ||

आजच्या दैनिक देशोन्नती (जळगाव आवृत्ती) वृत्तपत्रात माझी कविता "तिच्यातील ती"
================================================== 
तिच्यातील ती : ०१
============
|| ती एक कविता ||
===========
तसं पाहायला गेलं तर
जगाला त्याची ओळख तीच करून देते
तरीही
तिच्यावर हुकूमत मात्र त्याचीच असते..
नेहमीच त्याचा अट्टाहास दिसतो की,
तिने नाचावे तर
केवळ त्याच्याचं बैठकीत
आणि तीही मुकाट सूर पकडते
अन त्यानेच बांधलेल्या रंगीत चौकटीत
नकळत फसते..!!
नेहमी तोच ठरवतो
तिने असं दिसावं, तिने तसं सजावं
इथे उठावं आणि तिथे बसावं
कसं सोसत असेल ती हे सारं.?
तीचं दुःख हे तिलाचं ठावं..!!
ती केवळ गिनीपिग बनून राहिलीय
नवनवीन प्रयोग
तिच्यावर निरंतर होत असतात..
अन्वयीत अत्याचारांची ही मालिका
न जाणे कधी थांबणार.?
तिने कितीही झाकून घेतले अंग..
तरीही तिचे
विनयभंग जणू ठरलेलेच असतात..
सृजनतेच्या पडद्याआडून
पांढरे कलंदर
नित्य बलात्कार करतात..!!
मग
कविता असो, वा असो कोणी स्त्री
मात्र
दोहोंच्या वेदनचं स्वरूप सारखचं दिसते..
एकीकडे अश्रुंचे ढाळणे दिसते..
तर दुसरीकडे
लेखणीचे पाझरणे असते..
***सुनिल पवार...