Wednesday, 24 August 2016

|| उरलेत मागे ||

|| उरलेत मागे ||
==========
कैफियत होती तिची
भर पावसात तो
कोरडा वागतो..
नुसताचं इकडे तिकडे
बरसतो..
वळवाच्या पावसा सारखा
आगंतुक येतो..
दोन चार थेंब शिंपडून
नामानिराळा होऊन जातो..!!

किती काळ चालणार
असेच.?
बरस ना रे
कधीतरी बेधुंद..
मोडून टाक सारे
फसवे प्रतिबंध..
कर रिता आसमंत
अन होऊ दे मन
निश्चल शांत..!!
कळले असावे त्यास ,
तो बरसला मुक्त
मोडून कयास
झुगारून सारेच संकेत..
उलघडू लागला
पदर एक एक
क्षणात,
चिंब ती अन चिंब तो
भिजले अवचित
नखाशिकांत..!!
उधणली नदी
दुथडी भरून वाहू लागली
भाव भावनेच्या पुरात
वाट सोडून धावू लागली
गंध ओल्या प्रीतीचा
दरवळला श्वासात
अन
रात्र मंत्रमुग्ध
मूक हुंकार भरू लागली..!!
आता,
निघून गेला पाऊस
ओसरला पूर
अन उरलेत मागे
मात्र गरम उच्श्वास,
चुरगळलेली चादर,
तथा विस्कटलेला
केश संभार..
क्षणिक अनामिक तृप्ती
अन सारे कसे शांत शांत
तो पुन्हा बरसून येईपर्यंत
असणार तिला
त्याच्या याच आठवणींचा
फसवा आधार..!!
*****सुनिल पवार.......💦

No comments:

Post a Comment