Monday, 15 August 2016

II आमच्या स्वातंत्र्याची लढाई II

II आमच्या स्वातंत्र्याची लढाई II
===================
सत्तरीच्याही वरची झाली
आमची उत्तुंग लोकशाही..
पण आमच्या स्वातंत्र्याची लढाई 
अजूनही संपलेली नाही..!!
दिवस असो वा रात्र असो
परिस्थितीत कुठे बदल नाही..
ह्या देशातली स्त्री अबला
देशातच सुरक्षित नाही..
भिंतीच्या चौकटीत घुसमटतेय
आमची भगिनी अन् आई..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
जगण्याचा समान हक्क
सर्वांस दिला घटनेने जरी..
दिवसागणिक वाढत चाललीय
जनमनात जातीयतेची दरी..
किती झाले अत्याचार जातीय
त्यास कसली गणती नाही..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
राजरोस लुटून नेतो सावकार
शेतशिवार आणि घरदार..
हतबल आमचा बळीराजा
घेतो फासाचा केवळ आधार..
शासनकर्त्यांनाही त्याचं काही
सोयर सुतक दिसत नाही..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
निवडून देतो आम्ही नेता
थकत नाही तो नेता नेता..
पिढ्यान पिढ्याचं वरपून घेतो
अन् चिपाड होतो करदाता..
आपलाच देश,आपलीच जनता
बोलायची कुठे सोय नाही..
आमच्या स्वातंत्र्याची लढाई
अजूनही संपलेली नाही..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment