Tuesday, 23 August 2016

|| अंधार ||

|| अंधार ||
=======
लहानपणी घाबरत होतो
अंधाराला
म्हणायचो, आई दिवा लाव ना
आई लावायची दिवा
घरात अन दारात
तसेच चित्र दिसे
आजूबाजूच्या परिसरात..!!

मी विचारायचो आईला
आई,
घरात ठीक आहे गं
पण सांग ना,
कशाला पाहिजे दिवा दारात..?
म्हणायची आई हसून
तुला आवडतं ना खेळायला..?
शिवाय कोणी वाटसरू नको
ठेचाळुन पडायला मार्गात..!!
अप्रूप वाटले होते तेव्हा
मला आईचे आणि शेजारधर्माचे
तसेच त्यांच्या हृदयातील
दिव्य प्रकाशाचे..
सूर्य चंद्राचे कोंदण घेऊन
जन्मलेल्या
असंख्य तारकांना सामावून घेणाऱ्या
त्या विशाल आकाशाचे..!!
आता तिमिरातच चाचपडतोय
माणूस
आकाश फाडून,
मनातील सूर्य केव्हाच गेलाय मावळतीला
अन दिवे लावण्यासही
तो सोयीस्कर विसरलायं..
भय आजही कायम आहे
अंधाराचे
तरीही कळेना कशास..?
हा अंधार त्यास आता
अधिक जवळचा वाटू लागलायं..!!
******सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment