Monday, 1 August 2016

|| ज्वलंत ||

|| ज्वलंत ||
=======
आम्ही नेहमीच
चीड चीड करतो..
त्यांच्या नावाने
खडे फोडतो..
ही गोरी माकडं
आमच्या देशात येतात..
आमच्या बकालीकरणाचे
चित्रण करतात..
आमची अब्रू
वेशीवर मांडतात..!!

बोंबलतो आम्ही
त्यांना असावा
डोळ्यांचा विकार..
का दिसत नाही
आमचा अविष्कार..
आमच्या देशातील
विविधता..
ती नटलेली सुंदरता..!!
शेवटी परकेच ते
त्यांना कसले
सोयर सुतक असणार..?
पण आम्ही तर
ह्या मातीत जन्मलो
सांगा आम्ही
कधी सुधारणार..?
आमचा चित्रकारही
त्यांचाच कित्ता गिरवतोय..
जीर्ण झाल्या कापड्यातून
दिसणाऱ्या अवयवाचे
तो ही प्रदर्शन भरवतोय..
आमचा साहित्यिकही
काही कमी नाही..
शब्दांच्या झरोक्यातून
तो ही हळूच डोकावतोय..!!
कधी डोंबारीन,
कधी भिकारीन
कधी कोल्हाटीन
कधी लाल बत्तीच्या
वस्तीवरही जातोय..
जिथे जातोय तिथे
पिचलेली बाईच पाहतोय..
स्त्री मुक्ती,
सामाजिक विषमता,
अबलांवर अत्याचार
अशा ज्वलंत विषयावर
म्हणे
तो भाष्य करतोय..
का आपल्याच पुस्तकांचा
तो खप वाढतोय..??
***सुनिल पवार...

No comments:

Post a Comment