Monday, 15 August 2016

|| चौकातल्या सिग्नलवर ||


|| चौकातल्या सिग्नलवर ||
==●==●==●==●==●==
चौकातल्या सिग्नलवर
ऊन, पाऊस झेलत
ती चिमुरडी
तिरंगी झेंडे
जीव तोडून
विकत होती..
अकाली छाटलेले
तिचे पंख मलूल
अन
पोटात भुकेची
आग होती..!!

मी ऐटीत घेतला
एक झेंडा
आपल्या वातानुकूलित
गाडीवर चिकटवला
पाच रुपये भिरकावले
न काहीच वाटले
मनाला
देश प्रेमाची
झापड डोळ्यावर होती
मला कुठे हो तशीही
जाग होती..!!
कळत नव्हते
महत्व स्वातंत्र्य दिनाचे
त्या कोवळ्या जीवाला
तरीही वाटत असेल तिला
की, रोज यावा
असाचं स्वातंत्र्य दिन
आपल्या घराची
चूल पेटवायला..
पण मला तरी
कुठे हो कळलायं..?
मलाही वाटतंय
नेमकं तसेच की,
रोज यावा
असाचं स्वातंत्र्य दिन
मन मुराद, बेलगाम
सुट्टी उपभोगायला..!!
**जय हिंद**
***सुनिल पवार....

No comments:

Post a Comment