Friday, 29 January 2016

|| नेते आले ||

|| नेते आले ||
=●=●=●=●=
विकासाचे सुटले वारे
कोरडेच परी ते पावसाळे..
वल्गनेचे पिक घेऊन
नेते आले नेते आले..!!

जातीयतेचं रुजलं बियाणं
ख़तपाणी ते घालतं गेले..
आरक्षणाचं गाजर गोजिरे
पुंगी ते वाजवत गेले..!!
एकच नारा गरीबी हटाव
स्वप्ने मनात रुजवत गेले..
श्रीमंतांचेच चोचले सारे
गरीबास ते हटवत गेले..!!
भूमीपुत्र तो गरीब बिचारा
गळा त्याचा घोटत चालले..
भुखंडाचे गोड श्रीखंड
आपआपसात ते वाटत गेले..!!
भ्रष्टाचारी दूकान फायद्याचे
जागोजागी थाटत गेले..
समाज सेवेचे नाम मुख़ात
देशास ते लूटत गेले..!!
●●●●●●●●●●●
****सुनिल पवार.....

II कोकणचा शेतकरी II

II कोकणचा शेतकरी II
===============
या कधीतरी कोकणात
पहा तिथलाही शेतकरी..
नाही गेला तो कधी
सावकाराच्या दारी..!!

एक सामायिक घर
त्यात वेगवेगळ्या चुली..
ताटात चतकोर भाकरी
त्यावर हिरवी चटणी ओली..!!
चंद्र मुखड्याची
जमीन तुकड्या तुकड्याची
भावा भावात वाटली..
आडात नाही काहीच
मग पोहऱ्यात तरी कुठली..!!
तीच पारंपारिक शेती..
आणेवारीची खाती
नाही आधुनिक यंत्र..
एका बैल जोड़ी मात्र
तेच मशागती तंत्र..!!
आंबा काजू फणसावर
त्याची सारी मदार
नाही दूसरा आधार..
वर्षाच्या बेगमीवर
त्याचा चालतो संसार..!!
निसर्गान नाडल
पावसानं झोडलं
भरला मोहर करपला..
तरी नाही डगमगला
नाही रोष प्रकट केला..!!
अठरा विश्व दारिद्र जरी..
ना कवटाळली त्याने दोरी
प्रसंगी करितो चाकरी
आहे चिवट तो भारी
माझा कोकणचा शेतकरी..!!
******सुनील पवार.....

Wednesday, 27 January 2016

|| कविता ||

|| कविता ||
=●=●=●=
ती सहज म्हणाली
आज माझ्यावर
कविता करा..
मी हसलो
म्हणालो,
तूच खरी कविता
तो उडतोय पदर
सावर ज़रा..!!


ती लटकेच रागावली
म्हणाली,
चल चावट कुठला..
मी मिश्किल हसलो
म्हणालो,
चला सुटलो बुवा
आता प्रश्नच मिटला..!!

ती चिडली अन
म्हणाली,
आता बदलू नको
विषय..
मी घेतले कवेत
म्हणालो,
नाही ग राणी
ज़रा समजून घे
आशय..!!

ती गहिवरली
म्हणाली,
असा फिरवू नको ना
शब्दात..
मी पुन्हा हसलो
म्हणालो,
बघ चांदण फूलतयं कसं
मस्त नभात..!!

तिने पाठ फिरवली
म्हणाली,
तू ऐकनार नाहीस का
कधीच माझे..
मी जवळ ओढले
म्हणालो,
बघ तो आरक्त चंद्रमा
रूप सजलयं ना
त्यात तुझे..!!

ती खुदकन हसली
जणू
कविता तीज कळली
मुक्त चांदण्यांची
उधळण झाली..
मूक झाले प्रश्न सारे
अन कविता मौनात
बोलू लागली..!!
◆◆◆◆◆◆
 **सुनिल पवार....

|| होण्याआधीच ||

|| होण्याआधीच ||
=●=●=●=●=●=
कसे फुलावे ते नंदनवन
आभाळ हल्ली भरत नाही..
भरलेच कधी चुकून जरी
भाकित खरे ठरत नाही..!!

भेगाळली भूई चीत्कारली असह्य
वेदनेचा फाळ रुततो मनात..
पेरावी स्वप्ने किती गुलाबी
सल काट्याची तीच अंतरात..!!
रुजतो हिरवा कोंब कोमल
कोणी पायदळी तुडवतो..
मनात केले मंदिर ज्याचे
तोच अवकाळी घडवतो..!!
तरीही जीव सृष्टिवर जडतो
पुन्हा तोच गुन्हा घडतो..
आशेचा थेंब कोणी शिंपडतो
नवतीची तोच कळी खुडतो..!!
नाही वाटत आता मुक्त बहरावे
कोणाच्या ओठी गीत व्हावे..
होण्याआधीच निर्माल्य भावनेचे
वाटते...
आपल्याच उदरात गड़प व्हावे..!!
******सुनिल पवार....

Friday, 22 January 2016

|| कर धुंद शृंगार ||

|| कर धुंद शृंगार ||
=●=●=●=●=●=
स्पंदनाचे गीत नवे
ऎक सखे हळुवार..
ते अलगुजी श्वासांचे
नाद मधुर झंकार..!!

स्पर्शाचे बोल अबोल
उमजुन घे साकार..
हृदयातुन हृदयाला
अवचीत दे आकार..!!
खुल्या घन बटांतून
कर चंद्रा तू संचार..
चांदण्यात सजुन ये
तनी पेटव अंगार..!!
आलिंगन दे लतीके
बन वृक्षाचा आधार..
माळून घे सुमनांस
कर धुंद तू शृंगार..!!
****सुनिल पवार..

|| कल्ला||

|| कल्ला||
=●=●=
कशी प्रसवावी कविता
खल वाढतोय यावर..
यूनानी, जनानी वैदुंचा
गल्ली बोळात दिसतो वावर..!!


ती वैचारिक उपजावी
की यमकात रेंगाळावी..?
कोणता मुहूर्त साधावा
कशी प्रसूती व्हावी..??

नाना विविध सूचना
कोणाची म्हणून खोडावी..
कळे मज काहीच
नाळ जोडावी? का तोडावी..!!

सहज सुलभ व्हावी
का आड़ वळणाने यावी..?
वेदना निराळ्या साऱ्या
कोणाची कुणी घ्यावी..!!

तो डॉक्टर सीजरवाला
कात्री लावतो शब्दा शब्दाला..
चकाचक त्याचा दवाखाना
म्हणून तज्ञ म्हणू का त्याला..?

तो हकीम अलंकारी
त्याची मात्रा वाटतेय भारी..
कोणाच गं पोर ते
बघ फिरतय कोणा दारी..!!

अहो डॉक्टर हाकिम सोडा
आता कंपाउंडर भी देतो गोळ्या..
कोणाच्या तापलेल्या तव्यावर
कोण शकतोय पोळ्या..!!

मानु तरी कोणाचा सल्ला
सारेच करतात नुसता कल्ला..
माझी झोळी रिकामी झाली
अन त्यांनी त्यांचा भरला गल्ला..!!
●●●●●●●●●●●●●●●
***सुनिल पवार.....

|| कुणी वेदना घेता का ||

|| कुणी वेदना घेता का ||
=●=●=●=●=●=●=●=
कुणी वेदना घेता का
वेदना..??
मांडला शब्दांचा बाजार
का मनाचा आजार
उधारीचाच व्यवहार
सांगा हवाय कोणा..?
कोणी वेदना घेता का
वेदना..??
गोठवणाऱ्या संवेदना
आल्यात ताज्या मना
विचार कसला करता
एखाद दूसरी घ्या ना..!!
कोणी वेदना घेता का
वेदना..??
भळभळणाऱ्या जखमा
भावनेचा मुलामा..
ह्याच्या, त्याच्या अन तिच्या
जमविल्या नाना..!!
कोणी वेदना घेता का
वेदना..??
प्रेमाच्या,विरहाच्या
नसलेल्या नात्याच्या
विचारू नका कोणाच्या
तुमच्या तुम्हीच जाणा..
कोणी वेदना घेता का
वेदना..??
सौदा हा फायद्याचा
नाही बडगा कायद्याचा
करू नका मना
अनुभवुन तर बघा ना..
कोणी वेदना घेता का
वेदना..??
****सुनिल पवार...

II दाखले प्रेमाचे II

II दाखले प्रेमाचे II
=●=●=●=●=●=
कोणी तरी म्हटलय
एकाचा अस्त
अन दुसऱ्याचा उदय..
प्रेमाचे असावे
तसेच काही प्रमेय..??

तिने केला ब्रेक-अप
त्याचा झाला पँच-अप..
बोलायची सोय नाय
ऐकायचं गुमान गप..!!
त्याने म्हटले हाय
तिने केले बाय..
अज़ला हाय गुणा
उद्या सगुणा हाय..!!
एकेकाचे हाय फाय
निरनिराळे फंडे..
कोण म्हणतोय झेंडू
कोण घोळतोय गोंडे..!!
तुम्हीच म्हणता ना राव
बदल श्रुष्टीचा नियम..
प्रेमातही दिसतात
असेच दाखले कायम..!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
******सुनिल पवार.....

|| सभ्यतेचे भान राखून ||

|| सभ्यतेचे भान राखून ||
=●=●=●=●=●=●=●=
म्हणतात लोक,
नंगे से खुदा डरता है
म्हणूनच की काय,
तो शब्दांना नगवा करुन
आपल् वेगळपण सिद्ध करतो
का भागवतो सुप्त इच्छा
मनातील आशा आकांशा
ओगळवाण्या शब्दात
घोळून रेखाटुन..!!

मनाचा का मानाचा
मळवट भरतो
तथाकथित दुखाःच्या
अंतरपटा आडून
काव्यरूपी बोहल्यावर
सजतोय नवरदेव नवा
स्विकारतोय पुष्पगुच्छ
रोज नवनवे
समारंभ थाटुन..!!
अडून बसतो नवरदेव
डावरीवजा मागणीसाठी
अवास्तव अक्राळस्ता
व्यक्त करून
लाखोली वाहतोय
समाजाला..? नव्हे
हात बांधलेल्या
त्या हतबल मूक संयमाला
द्रोह का विद्रोही म्हणत
अभिव्यक्तीच्या
बुरख्या आडून..!!
अमर्याद प्रसिद्धीच्या झुल्यावरून
निघते वरात वाजत गाजत
रंगतात चर्चा तशाच
त्या अनोख्या विवाहाच्या
चाव्हाटयावरच्या हनीमूनच्या
चविने चघळतात लोक
गल्लीपासून दिल्ली पर्यंत
वर म्हणतात
आम्हास शक्य नाही
असे नागवे होणे करणे
सभ्यतेचे भान राखून..!!
****सुनिल पवार....

Saturday, 16 January 2016

|| माणसांच्या भाऊगर्दीत ||

|| माणसांच्या भाऊगर्दीत ||
=●=●=●=●=●=●=●=●=
काही बोलावे नव्याने
मनास माझ्या वाटतं नाही..
भरून आलं आभाळ
आतासं तसं फाटत नाही..!!

वेदनांची सुई बोथट
शल्य मनास टोचत नाही..
ठिगळ झाला पदर
उगाच हल्ली खोचत नाही..!!

भिजला धागा पाण्यात
गुंतला गुंता सुटत नाही..
पान्हा तसाच तरल
भावनेत काही फूटत नाही..!!

ओरखडे ते शब्दांचे
घाव गहिरे मिटत नाही..
डोंगारे तसे यातनांचे
कधी कुठेच पीटत नाही..!!

दिल्या डागण्या मनास
मेले मन तसे पेटत नाही..
माणसांच्या भाऊ गर्दीत
माणुस सहसा भेटत नाही..!!

***सुनिल पवार.....

Friday, 15 January 2016

|| मकर संक्रात शुभेच्छा ||

|| मकर संक्रात शुभेच्छा ||
●●●● म मनाचा ●●●●
=●=●=●=●=●=●=●=
म : मनाचा
मेळ सुजांनांचा..
सण स्नेहाचा
गोड क्षणांचा..!!

क : कवडस्याचा
उबारा थंडीचा..
सुघट भरावा
सुख समृद्धीचा..!!
र : रविचा
सहवास किरणांचा..
तेजपुंज व्हावा
आनद जीवनाचा..!!
स : संक्रातिचा
रवी संक्रमणाचा
तीळा गुळाच्या
रुजवात ऐक्याचा..!!
क्रां : क्रांतिचा
मनःशांतीचा..
रुजवुया मनात
गंध मातीचा..!!
त : तनाचा
गोडवा मनाचा
वाढवा निरंतर
रस वाणीचा..!!
***सुनिल पवार....

|| तिच्या कटाक्षात ||

|| तिच्या कटाक्षात ||
=●=●=●=●=●=●=●=
तीला सांगावे ते कसे
काहीच कळत नाही
नजर तिच्यावरची
जराही ढळत नाही..!!

त्या मोहक अदांवर
मी नित्य असाच फ़िदा
शब्द ओठात विरुन
स्तब्ध तसाच कैकदा..!!
रोज तिच्या वाटेवर
भेट नेहमी घडते
अन शब्दांच्या ऐवजी
ह्रदय धड़धड़ते..!!
मनातून उमटतो
नजरेचाच संवाद..
बोल मुके अबोल्याचे
मनाशी घालती वाद..!!
तिच्या एका कटाक्षात
मी स्वतःस हरवतो..
आज नको उद्या बोलू
रोज तसे ठरवतो..!!
****सुनिल पवार...

|| मोकळा श्वास ||


|| मोकळा श्वास ||
=●=●=●=●=●=●=
कधी विचार येतो मनी
जाणते अजाणतेपणी..
सकारास धरून गृहीत
का नकाराचं भरतो पाणी..??

हा अट्टाहास तरी कसला.?
उगा शब्दांना पेटवण्याचा..
राख झाल्या भावनांना
मृगजळात भेटवण्याचा.!!

कुठे पटतयं मनास तरीही
पोसतोय उगाच ठिणग्यांना..
कळे ना कसला मिळतो उबारा
का गोठवतो मी संवेदनांना..??

हा शवाधिन झालेला देह
का असा तिरडीवर सजतो..
चार घोड्यांच्या खंद्या रथावर
नक्राश्रूंच्या कौतुकात रांगतो..!!

वाटे सत्वर पहुडावे चितेवर
व्हावा भस्मसात निर्जीव आभास..
असंतोषाच्या गिळून ज्वाळा
घ्यावा वाटतो मोकळा श्वास..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| नटसम्राट ||

|| नटसम्राट ||
=●=●=●=●=
जगावं का मरावं??
हाच प्रश्न मागे उरतो
आयुष्याच्या रंगमंचावर
म्हातारा नट नेहमी हरतो..!!

हार त्याची नसते खरी
हार कारुण्याची असते..
उर्मीतल्या गुर्मीची
हार तारुण्याची असते..!!
कळतंय तारुण्यालाही
उद्या म्हातारपण येणार आहे..
बेजबाबदार बेफ़िकरीने
प्रश्न तोच उरणार आहे..!!
कुणी घर देता का घर..??
प्रश्न हां ही फिरणार आहे..
मालक बेघर होणार अन
वारस घरात घुसणार आहे..!!
वंशाचा दिवा काय दिवटी काय
दिवस उद्याचा उजळणार आहे..
अन वात बिचारी म्हातारी
कायम अंधारी जळणार आहे..!!
कैक असे घडतात नटसम्राट
त्यांचाही असतो तसाच थाट..
प्रश्न तोच मग पुन्हा पुन्हा
आ वासुन पाहतो त्यांची वाट..!!
******सुनिल पवार......

|| सांग कधी ||

|| सांग कधी ||
=●=●=●=●=
वृक्षासही वाटतो घ्यावा
कोमल लतेचा आधार..
आवेगाचे तरल भाव
सांग कधी तुज कळणार..!!

सागरही सरकतो मागे
झेलण्यास नदीची धार..
पावले तशीच अल्लड
सांग कधी मजकडे वळणार..!!
नभासही सुखावतो रात्री
पूर्ण चंद्राचा संचार..
रातराणीच्या त्या चांदण्या
सांग कधी तू माळणार..!!
वाऱ्यासही नादावते नित्य
वर्षाराणी पाणीदार..
टवटवी गंधीत धरेची
सांग कधी तू लेवणार..!!
क्षितिजही मिरवते भाळी
लाल रंगाचा श्रृंगार..
संकेत तसेच मिलनाचे
सांग कधी तू पाळणार..!!
*****सुनिल पवार....

|| माझी आजी ||

|| माझी आजी ||
=●=●=●=●=●=
सुरकुतल्या हातांनी
किलकिल्या डोळ्यांनी
तू डोईवर हात फिरवते
आजी तुझ्या प्रेमाने
मन अजूनही गहिवरते..!!

आईविना होतो पोरका
दिली तू त्यास ममता
पित्याची तू माता
झाली तशीच माऊली
मज सांभाळता..!!
हयात गेली गावात
ना कसली खबरबात
परी आली तू शहरात
लेकराच्या लेकरासाठी
तू राबली दिनरात..!!
केलेस बहु लाड माझे
तू वाढविले कौतुकात
आहे मज सारेच ज्ञात
जपले मज फुलापरी
तू ठेविलें सुखात..!!
अडानी तू होतीस परी
शिकवलीस रीत भात
आजी तुझ्या आठवणीस
मी जपलय हृदयात..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.....

Friday, 8 January 2016

|| घे भरारी ||

|| घे भरारी ||
=●=●=●=●=
किती वाढशील
जोमात रोपा
त्या विशाल वृक्षाच्या
गर्द छायेत..
सुरक्षिततेचे भास
असतील क्षणिक
लुप्त होशील खचित
दुनयेच्या मायेत..!!

वेष्टणाची चमक
डोळ्यांना लुभावणारी जरी,
मोल अनमोल
त्यातील वस्तुस असते..
नजर पड़ताच
लोकांची त्यावर
वेष्टन ते आपसूक
कचऱ्यात जाते..!!
त्या सूर्याच्या
दिव्य प्रकाशात
मोहक चंद्रही
नित्य फीका पडतो..
स्वयंप्रकाशीत
जरी काजावा
तिमिरातही मग
मस्त टिमटिमतो..!!
यथेच्छ वापरा
आणि फेकून दया
बदलत्या जगाची
हीच रीत न्यारी..
सांभाळून ठेव
तुझ्या अस्तित्वाला
घे स्वःकर्तुत्वात
गगनी भरारी ..!!
*****सुनिल पवार.....

Wednesday, 6 January 2016

II मन रंगले II

II मन रंगले II
=========
भेट तुझी माझी व्हावी
हे विधिलिखित असावे..
गत जन्माचे कर्ज काही
तसेच थकित असावे..!!

विस्फारले डोळे बघ
सांशक सकल जणांनी..
माझिया बोलण्याने तेही
तसेच चकित असावे..!!
बरसतो का धुंद पाऊस
असा बेधुंद होऊन..
भूमीवरी प्रेम त्याचे
तसेच खचित असावे..!!
कोण चित्रकार उधळीतो
सप्तरंग क्षिताजात असे..
त्याचेही मन रंगले
तसेच सखीत असावे..!!
*****सुनील पवार.....

Tuesday, 5 January 2016

|| खंत ||

|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
=◆=◆===◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
खंत..
नेहमीच सतावते मला
खंत माझ्या जीवनाची..
का कदर नाही कोणास
माझ्या मृदू स्त्री मनाची...!!
नित्य फुलांच्या ममतेने
मी जपत आले काट्याला..
सर्वस्व अर्पण केले तरी
का उपेक्षा माझ्या वाट्याला..!!
भासले जरी मुक्त तुम्हास
बेडी अजून तीच पायात..
किती सहज बदलते नजर
का येता कळी यौवनात..!!
सावित्री, दुर्गा, शक्ती बनुन
मी व्यर्थच देव्हाऱ्यात बसते..
तुमच्या क्रूर वासनेची
का बळी मग मीच असते..!!
कैक प्रश्न दडले आहेत
अजूनही माझ्या मनात..
आज उदो उदो कराल मात्र
उद्या फिराल तुम्हीच क्षणात..!!
कसली आलीय स्त्री मुक्ती
अन् कुठे आहे महिला दिन..
कालही होते अन् आजही आहे
तुमच्या जगात महिला दीन...!!
***सुनिल पवार...✍️

|| वल्गना ||

|| वल्गना ||
=●=●=●=
बेंबिच्या देठातुन कोकलतोय पुरुष
स्त्री मुक्तीच्या मुक्त गप्पा ठोकतोय..
सरसावुन बाह्या सज्ज जो तो
पाढा तोच मी ही घोकतोय..!!

मांडतोय तिच्याच अब्रूची लक्तरे
प्रसिद्धिच्या त्याच सवंग वेशीवर..
गाठून निर्लज्ज कळस प्रतिभेचा
सजवतो शब्दफुल अभिव्यक्तीच्या सेजीवर..!!
उपभोगतोय तिला रात्रीच्या अंधारात
माझ्या मनाच्या मालकी हक्काने..
चुरगळून तीच्या भावनांची चादर
पांघरुण ओढून पहुडतो सुखाने..!!
गाजतोय तीच हुकूमत शब्दातून
फुंकरीत हळुवार सांत्वनाची शाई..
पेटवून लेखणीस देतोय उबारा
कोरीच राखून मनाची वही..!!
*****सुनिल पवार......

II नववर्षाच्या शुभेच्छा II

|| नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||
===================
सकलांस लाभो
नूतन वर्षाचा
परम हर्ष
परम हर्षाचा
प्रेमळ स्पर्श..!!

जीवनात यावी
प्रसन्न पहाट
प्रसन्न पहाटेची
सुखद वाट..!!
निरंतर लाभों
सुख आणि समृद्धी
सुखात व्हावी
समृद्ध वृद्धी..!!
***सुनिल पवार..✍🏼