Wednesday, 8 November 2017

|| कोजागिरीची रात ||

|| कोजागिरीची रात ||
==============
टिपूर चांदण्यात
सचैल न्हात
आज
चंद्रमा अवतरतो
अंगणात..
आठवणींचे दुध
उकळीस येते
अन
मन रमते
नभमंडळात..
आज कोजागिरीची रात
सखे
आज कोजागिरीची रात..!!

टिपरीस टिपरी
खुणावते
नाद मधुर
घुमतो
आसमंतात..
पैंजणी पदन्यास
सुखावतो नयनास
आज
गरबा खेळण्यास
दे मज हात..
आज कोजागिरीची रात
सखे
आज कोजागिरीची रात..!!
केशर भाती
शुभ्र दुधाळ कांती
सजला
नक्षत्रांचा शृंगार साक्षात..
पुनवेचा चांद सखे
येऊ दे भरास
अन
उतरू दे
गोडवा दुधात..
आज कोजागिरीची रात
सखे
आज कोजागिरीची रात..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| बाय ||

|| बाय ||
=====
बाय,
तुझ्यावर भाळलेले तर
खूप दिसतील
पण
तुला नांदवणारा
एखाद दुसराचं असेल
जोपासणाऱ्या वृत्तीचा अंत
तुला तिथेच दिसेल..!!

इतरांप्रमाणे तुलाही
द्यावीच लागेल वधू परीक्षा
कारण
तू लुळी का लंगडी,
काणी की चकणी
देखणी का हेकणी
हे समीक्षक नजरेने
त्यांना पहावे लागेल
त्यांच्या प्रशस्तीपत्रावर
तुझे भवितव्य ठरेल..!!
इतके सोपस्कार करूनही
तुला वरण्याची हमी
कमीच आहे
पण तरीही
तू खिन्न होऊ नकोस बाय
धरू नकोस नाहक
कोणाचे पाय
कारण
तुझा हा बाप
मायेच्या ममतेने सांभाळण्यास
कायम सक्षम आहे..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| काळ्या आईचं लेणे ||

|| काळ्या आईचं लेणे ||
===============
माय माझी मृदुलाई
वसे शिवारी ढेकळी..
धूळ तिच्याच पायांची
रोज लावतो मी भाळी..!!

चरे तिच्या हृदयाचे
माझे काळीज फाडते..
निर नयनी दाटते
मन आभाळ गाठते..!!

पाखरांना झुलवित
रोज नटे हिरवाई..
पाना फुलांचा पाळणा
हलविते वनराई..!!

तिच्या कुशीत खेळता
ऊब आधाराची होते..
घाम जिरवून सारा
घास प्रेमे भरविते..!!

तुझ्याप्रति मन माझे
माये धन्य धन्य होते..
काळ्या आईचे हे लेणे
शब्दरुपी बहरते..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| रामायण ||

|| रामायण ||
=========
रावण नसलेल्या रावणाचे
दहन करून
राम नसलेला राम
आपल्या कुटीत परतला
आणि
सुरवात झाली रामायणाला
लक्ष्मण कुठे परागंदा झाला..
ऐकू येतंय
तो शूर्पणखेवर भाळला
त्याने वेगळा संसार मांडला..
आणि तसंही
रेषेची अडकाठी नको होती सीतेला..!!

मारीच
रामाच्या बाणाने मेला
ही केवळ अफवाच होती तर..?
ऐकण्यात आलंय
त्यानेच पसरवली होती
आता
अनेक रूपं घेऊन
सितेस मोहित करण्या
तोच गल्ली बोळात,
नाक्या नाक्यावर दिसतोय
इतकेच काय
अहो सोशल मीडियाच्या
खिडकीतून सुद्धा डोकावतोय
अन
सीता बिचारी
पुन्हा पुन्हा जाळ्यात फसतेय..!!
परीटाची पिल्लावळ
नित्य करते
बेछूट आरोपांची वळवळ
शिलावर घाव घालत
नसलेला राम
पुन्हा त्यांचीच री ओढतो
अग्नीपरीक्षेच्या कुंडात
सीता अजूनही धगधगते
आणि तो पहा रावण
किती विकट हसतोय
दग्ध झाल्या भावनांचाच
जणू सूड घेतोय
दंतकथा नाही हो ही
हे त्रिकाल सत्य आहे
रामायण अजूनही घडते आहे
वनवास रामाचा केव्हाच संपला
कदाचित तो नव्हताच
मात्र
सीतेचा संपता संपत नाही
आणि
त्यावर कुणी बोलतही नाही..
यासम दुसरी शोकांतिका नाही..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| ठळक बातमी ||

|| ठळक बातमी ||
===========
असंख्य स्वप्नांचे
अंतर
बुलेटच्या वेगाने
कापणारे
एकेक भुकेलं पोट
काळाच्या सिग्नलने
अकस्मात थांबवले
आणि कळले
किड्यामुंग्यांचीही
ठळक बातमी बनते
वाचून
जग हळहळते
पुढे
हीच ठळक बातमी
काहीजणांचे
उदर भरण करते..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| हतबलता ||

|| हतबलता ||
=========
पाखरांना
अंगाखांद्यावर खेळवण्याच्या
वयात
त्याच्या अकस्मात अत्याचाराने
आता
आडवं झालंय समस्त भात
अन
पुन्हा अंकुरतेय
हतबल बाईची जात..!!

वेलीच्या पदराआड
दडलेल्या
कोवळ्या,भरलेल्या काकड्या
माकडांपासून वाचताना
बापाची होतेय
दमछाक
म्हणून का तो
अकाली खुडतोय..?
हतबल मुलीची जात..!!
***सुनिल पवार...✍🏼
1

|| तारेवरची कसरत ||

|| तारेवरची कसरत ||
=============
भगवंताने दिली आहे
मज
कोणत्या पापाची सजा
जर जीवन हेच आहे
तर आहे ते नशा..
खाली
गाण्याचा भोंगा
कर्णकर्कश केकटत होता
आणि वर ती
टीचभर पोटासाठी
तारेवरची कसरत करत
आपल्या गरिबीला
पैलतीरी पोहचवण्याचा प्रयत्न
अगदी निकडीने करत होती..!!

काही वेळातच तिने पैलतीर गाठलं
मात्र
गरिबी तिला घट्ट बिलगली होती
कदाचित
पडण्याची भीती होती
म्हणूनच की काय
दोन पैशाचा तमाशा आवरून
तिने
गरिबीला पुन्हा गाठोड्यात बांधले
अन ती निघाली पुढच्या गावाला
गरिबीला पैलतीरी पोहोचवायला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| सांज किनारा ||

|| सांज किनारा ||
===========
केशर रंगी
रंगले रत्नाकर
किनाऱ्यावर..!!१!!

पक्षांचा थवा
लाटेवर खेळतो
मच्छ हेरतो..!!२!!
स्वप्न सुबक
वाळूत रेखाटली
लाटेने नेली..!!३!!
कातरवेळी
रंग भरून नभी
मिटली छबी..!!४!!
पाऊलखुणा
उरल्यात माघारी
हृदयावरी..!!५!!
***सुनिल पवार...✍🏼

|| भंगारवाला ||

|| भंगारवाला ||
==========
बस स्टॉपच्या कडेला
इवल्याशा खोपटात
तो भंगारवाला
काहीतरी ठोकत होता..
घण घण घण
घणाचे घाव घालता
विस्तीर्ण वस्तू छोटी
मात्र वजनदार करत होता..!!

मी माझ्यात होतो
तो त्यात कुठेच नव्हता
माझ्या नजरेत तुच्छता
तो मात्र
कामात मग्न होता
कारण
त्याच्या पोटाचा तो प्रश्न होता..!!
मला कळणार नव्हताच तो
कारण
माझा दृष्टिकोन वेगळा होता
मी म्हटलं मनात
काय वेडा माणूस हा
चांगल्या वस्तूंचा चोथा करतोय
पण मला कुठे ठाऊक होते.?
तो त्यावरच
आपलं उदर भरू पाहतोय..!!
काही वेळा नंतर
न जाणे का
त्याच्या घणाचे घाव
मनास बेचैन करू लागले
जणू सांगू लागले
बघ जरा सामावून त्याच्यात
मग कळेल त्याची मानसिकता
आणि
त्यामागील त्याची खरी भूमिका..!!
अरे
खरा भंगारवाला तर तूच आहेस
कारण
तो केवळ क्रियेरवर प्रकिया करतोय
तुझ्या लेखी
निरुपयोगी असणाऱ्या वस्तूतून
तो आपले पोट भरू पाहतोय
त्याला माहित आहे
त्याने पोट काही भरणार नाही
तरीही
त्यातीलच काही हिस्सा
त्याने आधीच तुला दिेला आहे
खरा भंगारवाला तर तूच आहेस..!!
अरे
खरा भंगारवाला तर तूच आहेस..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

|| चिंचा,कैऱ्या ||

|| चिंचा,कैऱ्या ||
==========
गाभूळल्या चिंचा
आंब्याच्या झाडावर
होत्या लगडल्या..
मी मारला एक दगड आधाशी
आणि
दोन चार कैऱ्या सहज पाडल्या..!!

चिंचेच्या झाडाखाली
दिसला
आंब्यांचा खच पडलेला..
मी मारली मधाळ नजर आधाशी
एक गाभूळला आंबा होता
माझ्या हाताशी..!!
आता
कैऱ्या, चिंचा,आंबा
मला चांगलेच उमजू लागले
कारण
मीच झालोय त्यांचं झाड
आता मात्र वाटते
त्या साऱ्या पाडाव्यात
सुयोग्य हातात..!!
**सुनिल पवार..✍🏼😊

|| ती मेहंदी ||

|| ती मेहंदी ||
=========
ती
मेहंदीचं असते
जी
शीतलता देत जाते
अन
दाहकता शोषून घेते
तिच्या मनातील हिरवळ
रंग आपला सोडून जाते
ती
मेहंदीचं असते..!!
**$p..✍🏼

|| प्रभाव ||

|| प्रभाव ||
=======
किती दखल देशील रे तू तिच्या संसारात..?
जरा ओळख ना जगाची तू रितभात..
ती व्यस्त दिसतेय तिच्या गोंडस पिल्लात
अन तुझा आवेग अगंतुक तिला छळतोय अतोनात..!!
तुझे वेळोवेळी येणे तसे सुखावह असते
पण तुला झेलणे कधी कधी भयावह होते..
तूच बघ ना! कशी थिजलीत तिची पिल्ले
त्यांच्या भिजलेल्या अंगाचे कंपन गतिमान झाले..!!
तिला हे कळतंय, तुझ्याशिवाय संवेदना नाही
वैराण झाल्या जीवनाचा तूच संजीवन प्रवाही..
आणि आम्हासही ते मान्य आहे यात कोणताच वाद नाही
पण हे ही तितकेच खरे तुझ्यासारखी वेदना नाही..!!
तू येताना प्रियकर असतोस तलम मोरपीस अलवार फिरवतोस
मग जाताना असा का धुसमुसळेपणा करतोस.?
हा तृप्ततेचा अभाव आहे की तसाच तुझा स्वभाव आहे..?
अधिकाराच्या मानवी भुताचा का तुझ्यावरही प्रभाव आहे..??
--सुनिल पवार...✍🏼
Image may contain: text
लईभारी सखी, भारत जगताप and 9 others
6 Comments
Like
Comment
Share

|| जागृत की निद्रिस्त ||

|| जागृत की निद्रिस्त ||
=============
लोक
भरभरून लिहितात तुझ्यावर
कळत नाही
त्यांना कसं काय जमते..?
माझ्याचं प्रश्नात माझं मन
उगाच का गुंतते..?
हे प्रेम असेल का ग
का असेल ही तपस्या..?
जरा निरसन कर ना समस्या
अखंड वाहणारा हा शब्दांचा झरा
असतो का ग तितकाच खरा..?

मी नेहमीच संभ्रमित राहिलो
तुझे बदलणारे रूप पाहून
कधी वाटतेस तू
सुडौल बांध्याची नैसर्गिक ठेवण
तर कधी
रंग पोतलेली वगातली गौळण..
तर कधी चक्क
नवस्वप्नांच्या भरारीस उत्सुक
वधू जशी
आमंत्रित घेण्या केळवण..
कधी उपरी समजून
दुर्लक्षित केलेली बोळवण..!!
लोक म्हणतात मला
तू हृदयाच्या गाभाऱ्यात वसते
महत्प्रयासाच्या उर्मीतून प्रकट होते
पण प्रश्न हा आहे
तुझे हे अस्तित्व
नेमके किती काळ टिकते..?
मग विविध आशय, विषयावर
तू सहज कशी प्रकटते..?
मी हलवून, हेलावून पाहिले हृदयास
परंतु
तू ना दिसलीस कुठे जागृत
मी टोचून पाहिले लेखणीने
तरीही तू तशीच का निद्रित..?
का मी समजावे आता
तू केला असावा इतरत्र
तुझ्या राहण्याचा बंदोबस्त..??
****सुनिल पवार....✍🏼