|| प्रभाव ||
=======
किती दखल देशील रे तू तिच्या संसारात..?
जरा ओळख ना जगाची तू रितभात..
ती व्यस्त दिसतेय तिच्या गोंडस पिल्लात
अन तुझा आवेग अगंतुक तिला छळतोय अतोनात..!!
तुझे वेळोवेळी येणे तसे सुखावह असते
पण तुला झेलणे कधी कधी भयावह होते..
तूच बघ ना! कशी थिजलीत तिची पिल्ले
त्यांच्या भिजलेल्या अंगाचे कंपन गतिमान झाले..!!
तिला हे कळतंय, तुझ्याशिवाय संवेदना नाही
वैराण झाल्या जीवनाचा तूच संजीवन प्रवाही..
आणि आम्हासही ते मान्य आहे यात कोणताच वाद नाही
पण हे ही तितकेच खरे तुझ्यासारखी वेदना नाही..!!
तू येताना प्रियकर असतोस तलम मोरपीस अलवार फिरवतोस
मग जाताना असा का धुसमुसळेपणा करतोस.?
हा तृप्ततेचा अभाव आहे की तसाच तुझा स्वभाव आहे..?
अधिकाराच्या मानवी भुताचा का तुझ्यावरही प्रभाव आहे..??
--सुनिल पवार...

No comments:
Post a Comment