Saturday, 13 May 2017

|| चंद्र ||

|| चंद्र ||
=====
जेव्हा
अंतराळातील आगडोंब
शिथिल करण्या
तिने
कोंड्या मांड्याचा
चंद्र
थापायला घेतला
तेव्हा
मलूल पडल्या चांदण्यांचा
चेहरा
आशेच्या प्रकाशात
लख्ख
उजळून निघाला..!!

तिने
लीलया थापला
सुंदर चंद्र
स्वः सामर्थ्याने
अवघा आसमंत पेलत..
चटक्यांचे
खाच खळगे
हसत
हातावर झेलत..
तिला काळजी
अवघ्या नभोमंडळाची
हे डोळ्यात तिच्या
होते दिसत..!!
तिने
रंगविला
खेळ कलेकलेचा
अर्ध चंद्र
चतकोर
प्रत्येक हातावर टेकवला..
नाही
स्वतःसाठी
किंचितसा राखला..
शांत झाला
आगडोंब सारा
प्रत्येक तारा
दिलखुलास टिमटीमला..
अन
तिच्या रित्या
रित्या ताटातील
प्रतिबिंबित चंद्र
समाधानाने हसला..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment