Wednesday, 17 May 2017

|| मूल्यमापन ||

|| मूल्यमापन ||
==========
पाळू नकोस तू
उगाच संकेत त्यांचे
तू चाल
केवळ तुझ्याच चालीने..
पाळले
तरी ऐकावे लागेल
न पाळले
तरीही ऐकावे लागेल
ते दोन्ही कडून बोलतील
कारण
ढोलकीचा ताल असतो गं
दोन्ही बाजूने..!!

ते प्रयत्न करतील
तुझी ओळख पुसण्याची
नावं ठेवतील येता जाता
म्हणतील,
तुला गंध नाही मातीचा
अथवा
रंग देतील तेच
नासलेल्या जातीचा
तुला बसवतील
विविध पारड्यात
मग्न होतील तोलण्यात
नाकाने कांदे सोलण्यात
पण तू झुकू नको कोणापुढे
नाही श्रेष्ठ कोणी तुझ्यापुढे
कारण तूच आहेस केवळ
या विश्वाचे
न उलघडणारे कोडे..!!
तू नेस
कोणताही साज
तरल भावाचा,
कोणत्याही प्रवाहाचा
मिलनाचा असो
वा असो विरहाचा
तू शोभून दिसशील
कोणत्याही रंगात,
प्रत्येक ढंगात
कारण
तुझे स्थान असते ग
थेट काळजात..!!
म्हणून
तू बोल उघड, बेधडक,
दे उत्तर त्यांस सडेतोड
पण
ठेव वास्तवाचे भान
नको बटबटीत, भडक..
नको कुठलाच आकस,
वा स्वार्थी आगपाखड
तू सोड वृत्ती धरसोड
दे समांतर वैचारिक जोड
तेव्हाच ठरशील तू
निःसंशय
अद्वितीय आणि अजोड..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

No comments:

Post a Comment