Saturday, 13 May 2017

|| गावाकडच्या गोष्टी ||

|| गावाकडच्या गोष्टी ||
===============
बालपण घेऊन सोबतीला
पकडला एसटीचा लाल डबा
अन पोहचलो गावाला..
पोहचतो न पोहचतो तोच
हापूस आला दिमतीला
मी विचारले त्याला
काय रे बाबा
तुझा जात भाई
तो रायवळ कुठे गेला..?
तो पडेल चेहऱ्याने उत्तरला,
कुठेतरी असेल एखादं दुसरा
पण बहुतेक
काळाच्या ओघात नामशेष झाला..
हल्ली मोल आलंय ना पैशाला.?
म्हणूनच,
बिन भावाचा माझा भाऊ बिचारा
हकनाक मेला..
पण खरं सांगू..?
तोड नव्हती त्याच्या पौष्टिकतेला..!!

इतक्यात कुठुनसा फणस उगवला
मी सहज विचारले त्याला
कसं काय
बरं(हाय) का..?
तर तो उत्तरला
मी मोठा भाऊ कापा
बरका आता बराच रोडावलाय..
तुमच्या पिढीने बहुतेक तोडलाय..
हापूस, काजूच्या मोहात
रानाचा रानमेवा उध्वस्त झालाय..
जांभूळ,चिंचा, करवंद
कोणी कोणीच सुटलं नाय..
अळू,तोरण
कुठे औषधाला सुद्धा नाय..!!
ऐकून त्यांचे बोल
मन अगदी सुन्न झाले
सोबत आलेलं बालपण
ते ही खिन्न झाले..
सवंगडीच नाही खेळायला
खेळ रंगणार तरी कसा..?
रित्या मनाचा पसा
मग भरणार तरी कसा..?
आज सोबत
निदान आठवणी तरी आहेत
उद्या त्या सुद्धा नसतील
गावाकडच्या या गोष्टी
कोणत्या पुस्तकातही नसतील..!!
***सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment