सांता....☃
पांढऱ्या शुभ्र दाढीतला सांता
आज आमच्या कॉलनीत आला..
आयाबायांचा अन् पोराटोरांचा
त्याच्या भोवती गराडा पडला..!!
मला दे, मला दे धोशा लावत
पोरांनी एकच गलका केला..
अन् प्रत्येक हातावर देता देता
सांता त्यांच्यात रंगून गेला..!!
मीही शिरलो नकळत गर्दीत
सांतासमोर हात पसरला..
मंद हसला सांता अन् म्हणाला
बेटा, बोल काय हवं तुला..??
मी सहज बोलून गेलो म्हटलं
सुख हरवलंय, मी शोधतोय त्याला..
माणुसकीशी नाळ जोडशील का पुन्हा?
निरागस बाल्य देशील का रे मला..!!
पुन्हा मंद हसला सांता म्हणाला
हे बघ मी शोधलंय माझ्या सुखाला..
आता वेळ नको घालवू,चढव तो पेहराव
उचल ती पोटली अन् लाग कामाला..!!
***सुनिल पवार..✍🏼
No comments:
Post a Comment