Thursday, 28 February 2019

कोडे..

कोडे..
कोड्यातले वागणे तुझे
नवनवे कोडे घालत जाते..
एक सुटले म्हणावे तर
दुसरे मनास सलत जाते..!!
नसते पडायचे मला त्यात
पण तरीही तेच पडत जाते..
कोडे हे असेच विचित्र
सोडवताना अडत जाते..!!
पहिल्या कडीला दुसरी कडी
आपोआप जोडत जाते..
जितके हाताळावे नाजूकपणे
तितके ओरखडे ओढत जाते..!!
करू पाहता दुर्लक्ष त्याकडे
मन त्यास खोडत जाते..
कोड्यातले वागणे तुझे
कोड्यात नित्य पाडत जाते..!!
***सुनिल पवार...✍️

साजणी...

साजणी..

दूर कुठे प्रेमाच्या गावात
मजसवे सखे तू येशील का..?
माझ्या स्वप्नांचे घर सजलेले
प्रेम कटाक्षे पाहशील का..!!

जरा उन्माद भरून श्वासात
तू मिठी आवगे मारशील का..?
माझ्या देहातल्या अचेत कुडीत
तू प्राण संचार करशील का..!!

तव ओठांच्या दोन पाकळ्या
उमलतील जर का स्वच्छंदी..
तर भ्रमराचेही गुज सजेल
अन् साज चढेल गं मकरंदी..!!

निल नभाच्या निल डोही
घे सामावून मज नयनी..
अखंड बुडून घेईन स्वतःस
जर स्वप्न साकारशील साजणी. !!
***सुनिल पवार...✍️

अडगळीतले प्रश्न...

अडगळीतले प्रश्न...
खरं तर ज्यांचे प्रश्न,
उत्तरेही त्यांचीच असतात..
सुकलेल्या फुलांची, अत्तरे कुठे बनतात
आपले प्रयत्न त्यापुढे, खुजे ठरतात..!!
तरीही नकोसे वाटणारे प्रश्न
उगाच मनास घेरत जातात..
अंधारलेल्या कोनाड्यात
प्रश्नांकित प्रकाश पेरत जातात..!!
पण काळोखी सरावलेले कोनाडे
उजेडात तग धरत नाही..
हे कळायला हवे उजेडासही
की अंधाराशिवाय अस्तित्व उरत नाही..!!
जगासाठी दुर्लक्षित असतील
पण कोनाड्यांचेही काही प्रश्न असतात..
अडगळीतले प्रश्न त्यांचे
कायम अडगळ बनून राहतात..!!
***सुनिल पवार...✍️

Wednesday, 27 February 2019

माझी मराठीची बोली..


|| माझी मराठीची बोली ||
==============
स्वर्गे अमृताची गोडी,माझी मराठीची बोली..
सामावून सकलांना तिने हृदय जिंकली..!!

किती सुंदर वलय,शोभे देवाचे आलय..
झुले सह्याद्री मलय,सुज्ञ ज्ञानाचा प्रलय..
तिची शीतल सावली जशी माय माऊली
स्वर्गे अमृताची गोडी,माझी मराठीची बोली..!!

नाही संकटाची भीती,राकट रांगडी माती..
आपुलकीची ही नाती,किती सांगावी महती..
विविधतेत नटली,खेड्यापाड्यात जपली..
स्वर्गे अमृताची गोडी,माझी मराठीची बोली..!!

जशी दुधावर साय तशी मराठी ही माय..
माझा गर्व माझा जय,तिचे वंदितो मी पाय..
नभी पताका झुलली,स्वाभिमानात रंगली
स्वर्गे अमृताची गोडी,माझी मराठीची बोली...!!
--सुनिल पवार..✍🏽

||मराठी भाषा दिनाच्या* *हार्दिक शुभेच्छा ||

Monday, 25 February 2019

मनी वसे ते..

मनी वसे ते..
लोक म्हणतात,
मनी वसे ते स्वप्नी दिसे..
पण 
झोपच उडाली असेल तर?
तर
स्वप्नांचेही होते हसे..!!
स्वप्न
तशी हजार असतात
उघड्या डोळ्यांनाही
ती पडत असतात
मृगजळा मागे धावता धावता
माणसे
नित्य धडपडत असतात..!!
***सुनिल पवार...✍️

प्रभाव...

प्रभाव...
सूर्य आग ओकतो
तरीही त्यास अनुराग मिळतो..
अन् शीतलता देणाऱ्या चंद्राला
उठून दिसणारा डाग छळतो.!!
सूर्य जाळत जातो देहास
तरीही प्रकाश त्याचा दास होतो..
अन् शीतलतेच्या वाट्याला
तिमिर हमखास येतो..!!
नकळे हा कोणता प्रकार
की नभोमंडळाचा प्रताप असतो..
पण चांदण्यांच्या नशिबात
ओघळण्याचा शाप दिसतो..!!
हा स्वभाव असेल माणसाचा
त्याच्या नजरेत तसा भाव वसतो..
म्हणूनच ग्रासलेल्या सूर्य चंद्रावर
ग्रहणाचा गडद प्रभाव दिसतो..!!
***सुनिल पवार...✍️

काय वाट्टेल ते....💞

काय वाट्टेल ते....💞
आज
पुन्हा नव्याने व्यक्त होतोय
भावनांचे गुज मी मुक्त करतोय..!!
तसं व्यक्त व्हायला,
एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज नाही
पण जगराहाटीच्या व्यापात
पुरेसा वेळ मिळत नाही
असेलच तर दोष इतकाच असतो
पण तुला ते कळत नाही..!!
म्हणूनच आज
साधून घेतलंय औचित्य
तू एकवटून घे तुझे चित्त
दिवस इंग्लिश असो वा मराठी
प्रेमाला त्याचे वावडे नाही
आणि भाषेविना
प्रेमाचे काही अडले नाही.!!
अगं
मौन समजून घेणारे प्रेम
कधी बसलेय का कोणत्या चौकटीत?
तू उघडून बघ ना हृदयाची ताटी
तुलाही दिसून येईल भावनांची दाटी
मग तुही म्हणशील, आणि करशीलही
काय वाट्टेल ते प्रेमासाठी
काय? समजले की नाही..!!😊
🌹Happy Prapose Day🌹
***सुनिल पवार...✍️

🍫Happy Chocolate Day🍫

🍫Happy Chocolate Day🍫
मुक्या भावनांना मिळे
सहज शब्दांची जोडी..
मऊ चॉकलेटची गोडी
सखे चाखून बघ थोडी..!!
दुधा साखरेसॊबतच
जरासे प्रेम मिसळलेले..
तलम रेशमी स्पर्शाने
जसे क्षण विरघळलेले..!!
***सुनिल पवार...✍️

Happy Promise Day....

🤝🏼Happy Promise Day🤝🏼
इतकेच
तुला सांगेन की
दिलेले वचन 
पाळायला हवे..
माझे मन तुला
अन् तुझे मन मला
कळायला हवे..!!
**सुनिल पवार...✍️

उमलत्या भावनांना...💞

उमलत्या भावनांना...💞
उमलत्या या भावनांना
तू बंदिस्त अशी करू नको..
उमलू दे पाकळी पाकळी
तू अढी मनाशी धरू नको..!!
ऋतू बोचरा पानझडीचा
पुन्हा एकदा सरून जाईल..
खेळ असतो दोन घडीचा
पुन्हा वसंत फुलून येईल..!!
तुझ्या गंधाचे वेड जगास
तू कुपीत त्यास भरू नको..
वाऱ्यावर मुक्त डोल फुला
तू राग ऋतूंवर धरू नको..!!
**सुनिल पवार...✍️

पण ना जाणे का...💞

पण ना जाणे का...💞
तू असताना
अर्थ जगण्याचा कळतो मला..
तू नसताना
भास तुझा छळतो मला..!!
पण ना जाणे का
सहवास तुझा टाळतो मला..
इतकेच सांग मला
किती प्रेमभाव कळतो तुला..!!

हॅप्पी व्हॅलेंटाईन डे...💞

हॅप्पी व्हॅलेंटाईन डे...💞
खरं तर
मला म्हणायचं नाही
बी माय व्हॅलेंटाईन
कारण
तू तर माझ्या हृदयात वसते
आणि तसंही
एका दिवसाची प्रेमाला गरज नसते..!!
पण
इतकं कारण पुरेसं नाही
केवळ हृदयात असूनही चालत नाही..
आणि
तहान पाण्याशिवाय भागात नाही
म्हणूनच
मी माझं प्रेम व्यक्त करतोय
कारण
जगाची तमा मी बाळगत नाही..!!

मन..

मन
वाऱ्याचे चंचल असते
पण
मन पानाचे तसे नसते..
तरीही 
नकळे का असे होते
पान
वाऱ्यासोबत फिरते..!!
प्रश्न
असेच असतात वेडे
कधी
न उलघडणारे कोडे..
रुक्मिणीच्या
अंगणात पडतात
गंधित
प्राजक्ताचे सडे..!!
**सुनिल पवार...✍️

घात....

घात....

खुपसून खंजीर पाठीत
केला किती गनिमाने घात..
विझणार नाही तरी कधीही
देशप्रेमाची ही प्रखर वात..!!
तू करतो भ्याड हल्ले लपून
नाही जोर तुझ्या मनगटात..
तू षंढ पाकड्या अतिरेकी
तुला दाखवून देऊ तुझी औकात..!!
घेऊ बदला तुझ्या कृतीचा
स्वस्थ आम्ही बसणार नाही..
तुझी विषारी हिरवी नांगी
ठेचल्याशिवाय राहणार नाही..!!
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
🙏
***सुनिल पवार...✍️

सावट...

सावट...

एकीकडे
आंधळ्या भक्तांना
दृष्टीचा साक्षात्कार झालेला दिसतोय
तर दुसरीकडे
स्वतःला डोळस म्हणवणारे
आंधळ्या सारखे वागताना दिसताहेत
कोणीच कोणाला ओळखेनासं झालंय
सर्वांचंच ताळतंत्र सुटलेलं दिसतंय..!!
ज्याचा त्याचा
केवळ कानावर भरवसा
न जाणे कुठून सुचते अवदसा
नक्राश्रूंच्या आडून
काही, भरू पाहताहेत आपला पसा
साले गल्लाभरू लोक
मृतांच्या टाळूवरचं
लोणी खाताना दिसतंय..!!
ज्यांच्यावर बेतलं
त्यांनी आपली हयात घालवली
ह्या नालायकांच्या रक्षणासाठी
आणि हे साले
राजकारण खेळताना दिसतंय
व्हाट्सअप फेसबुकच्या
मुलायम बिछान्यात लोळत
अकलेचे तारे तोडताना दिसतंय..!!
ज्यांना ठेचता येत नाही
स्वतःच्याच मनातील आंधळी कीड
असे हे कागदी वीर
दुश्मनांना ठेचून काढण्याची
भाषा बोलताना दिसतंय
हे फारच भयंकर चित्र आहे
वरवर एकवटलेला आपला देश
खरं तर,
दुफळीच्या सावटाखाली
वावरत असलेला दिसतोय..!!
***सुनिल पवार....✍️

कारण ते कवी असतात...

कारण ते कवी असतात...

तू सरळ बोलू नको
ते विपरीत समजतात
तू बर्फाला आग म्हण
पाण्याला धग म्हण
त्यांना याचेच अर्थ
नेमके कळतात
कारण ते कवी असतात..!!
तू उलटे चालत राहा
म्हणजे लागेल त्यांना धाप
वड्याचं वांग्यावर
अन् वांग्याचा वड्यावर
बसवून टाक चाप
तेव्हाच मानतील तुला बाप
त्यांना तसेच शब्द कळतात
कारण ते कवी असतात..!!
पण तरीही तुला
ते आपला मानणार नाहीत
तू दुर्लक्ष कर त्यांच्याकडे
अन् घालत राहा शब्दांना कोडे
उतर खोल तळ्यात
अन् फुलव ज्वालामुखी हृदयात
तेव्हा रुजशील तू जनमाणसात
तेच करतील तुला आपलेसे
जरी नसले ते कवी
तरी खरे दर्दी तेच असतात..!!
***सुनिल पवार....✍️