Thursday, 21 March 2019

रंगात रंगाच्या...

रंगात रंगाच्या...
तिला
रंगाचा तिटकारा होता
म्हणून
ती घरात बसून राहिली
आणि
सर्व संपल्यावर
बऱ्याच वेळाने बाहेर पडली..!!
रस्ते सुनसान होते
पण जागोजागी रंगांचे अस्तित्व
ठळकपणे दिसून येत होते
लाल,निळा,पिवळा,हिरवा,गुलाबी
काही सुकलेले
तर काही अजूनही ओले होते..!!
ती
दबकत सावरत चालत राहिली
रंगहीन रस्ता शोधत राहिली
पण तिच्या लक्षात आले नाही
की त्याच रंगाने
तिची पावले नकळत रंगत गेली..!!
***सुनिल पवार...✍🏽

होळी रे होळी...

होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
होळी रे होळी
पुरणाची पोळी..
आटून गेली तळी
खेळा कोरडी होळी..!!
होळी रे होळी
एकोप्याची हाळी..
रंग वर्ण भेदाची
तोडू या साखळी..!!
**सुनिल पवार...✍️

शृंगार..

शृंगार..
लिपस्टिक हास्याची
जरा ओठांना लाव..
रंगलेल्या ओठांनी 
घे हृदयाचा ठाव..!!
मार्दवाचे काजळ
जरा डोळ्यांना लाव..
मी पाहतोय तयात
माझ्या स्वप्नांचा गाव..!!
लेवून घे तू सखे
नव्या प्रेमाचा पेहराव..
समजून तर घे
माझ्या मौनाचा भाव..!!
सहमतीच्या अत्तराचा
जरा वाढू दे प्रभाव..
संभ्रमित दुराव्याचा
उगा रचू नको बनाव..!!
***सुनिल पवार...✍️

बदलावेसे वाटते...

बदलावेसे वाटते...
तुला
वाट पाहणे
आवडत नाही
पण
वाट पाहायला
लावते मात्र..
दिवस म्हणू नको
की म्हणू नको रात्र
पण खरंच
आता
बदलावेसे वाटते
हे
जीर्ण झालेले
चित्र..!!
**सुनिल पवार..✍🏽

Monday, 18 March 2019

भेट...

भेट...
तुझी भेट होते तेव्हा
क्षणाची तृप्तता होते..
तू नजरेआड होता
मनाची सुप्तता जागते..!!
तुझ्या आठवणीत सखे
मन रात्रीचेही जागते..
दुसरं काही नाही गं
मन क्षणाची भेट मागते..!!
**सुनिल पवार...✍🏽

Saturday, 16 March 2019

आठवण...

आठवण...
आठवण आभास देते
स्पर्श नाही..
आठवण आसवं गाळते
हर्ष नाही..!!
आठवण भूत असते
भविष्य नाही..
आठवण मौन दिसते
भाष्य नाही..!!
आठवण एकांत होते
सानिध्य नाही..
आठवण बाध्य करते
साध्य नाही..!!
आठवण स्वाभाविक असते
खंत नाही..
आठवण आरंभ असते
अंत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

अस्तित्व...

अस्तित्व...

सागरात विलीन होऊनही
नदीने आपले अस्तित्व जपायला हवे..
तिच्या दृढ संकल्पाचे पाणी
बारा महिने कायम टिकायला हवे..!!
पण दुर्दैव असे की,
फार मोजक्या नदीच्या नशिबी
असे भाग्य लिहिलेले दिसते..
बाकी चार दिवसाचा पावसाळा वाहतो
नंतर पात्र कोरडे रुक्ष होते..!!
आधार घ्यायचाच झाला तर
नदीने तो हिमालयाचा घ्यावा..
पाऊस तसा लहरीच असतो
त्याचा भरवसा कोणी द्यावा..!!
शेवटी इतकेच सांगेन
की भावनेत वाहत जाऊन
रिते होण्यापेक्षा
संयत वाहून आपले अस्तित्व
टिकवून ठेव..
ते नाही, तर तू जीवन आहेस
इतके मात्र तू कायम स्मरणात ठेव..!!
***सुनिल पवार...✍️

ओलावा...

ओलावा...
लाट
ओहोटीला लागलेली दिसतेय
न जाणे
किनाऱ्याकडे कधी वळणार..?
लाटेचा हाच रुक्षपणा
स्वयं तिला
अन् सुक्ष वाळूला छळणार..!!
नाव
सहज पुसून गेली लाट,
मी वाळूत पुन्हा तसेच गिरवले..
पण जरासा सुटला वारा
अन् वाळुसह तेही उडवले..!!
मन
जडलेले असून उपयोग नाही
त्यात
ओलावासुद्धा आवश्यक आहे..
वाळू भासली जरी कोरडी लाटे
तरी अंतरी पाणी मुबलक आहे..!!
वेळ
निघून जाण्याआधी ये परतून
किनारा लुप्त होण्याच्या आत..
अन्यथा
तू मारत राहशील सुप्त धडका
पण देणारा नसेल कोणी साथ..!!
***सुनिल पवार...✍️

सर्वार्थम् साधनम्...

सर्वार्थम् साधनम्...

किती करावे उगाच
शब्द असे आत्मसात..
शब्दांनीच होत असे
मन उगा भस्मसात..??

किती बसावे तरीही
शब्द शब्द जोपासत..
मात्र शब्दांनी चालावे
का सत्यार्थास टाळत..??

किती तासावे त्रागाने
शब्दांना सहाणेवर..
धार धार सूरी जशी
फिरतेय मानेवर..!!

किती निरखावे असे
शब्दमुख आरशात..
प्रतिबिंबित प्रतिमा
उमटतेय पाण्यात..!!

ना घेतला ना सोडला
नाही शब्द मी खोडला..
सर्वार्थम् साधनम्
मी मौन त्यास जोडला..!!
--सुनिल पवार..✍🏼

जवाब....

अलीकडे,
ठेकेदारीची बांडगुळं
नीतिमत्ता फस्त करत
जोमाने फोफावलेली दिसत आहेत..
संस्कृतीच्या पाळामुळातील रस पिळून
मस्तवाल झालेली त्यांची पिल्लावळ
हिरव्या रानाला
उजाड करताना दिसत आहेत..!!
वैराण उंट,
तंबू फाडून
हातपाय पसरू लागलाय
अन् हिरवळ
दिसेनाशी होत चाललीय
दिवसेंदिवस
दृष्ट प्रवृत्ती आवाक्याबाहेर होतेय
तिला आळा घालणे
आता कठीण होऊन बसलंय..!!
सूर्यावर थुंकण्याचे प्रकार
वरचेवर घडत आहेत
चिखलफेक तर आता
नित्यनेमाची झालीय
बरबटलेली गटारांची तोंडं
सताड उघडी दिसताहेत
त्यांच्या दुर्गंधीने
जीव मात्र नकोसा झालाय..!!
आता
संभ्रम असा आहे
की कळत नाही
कोणता फवारा मारावा
मुळापासून उखडावा
की तंबू गुंडाळून घ्यावा
की सुर्यालाच झाकावा?
अंधाराचे साम्राज्य
तसेही फैलावत आहे
की आता विटेचा जवाब
पत्थराने द्यावा..??
***सुनिल पवार...✍🏽

तलाश में..

तलाश में..

कभी
निकला था
मै
तेरी तलाश में
और तुमसे
मुलाकात हो गयी..
लगा था
तब
के खत्म हो गयी
तलाश मेरी
मगर
तुम तो दिखती हो
हररोज नयी..!!
**सुनिल पवार..✍️

Saturday, 9 March 2019

सबब....

सबब....

दिला शब्द
पाळायला हवा
पण नेमकं 
तुला
हेच कळत नाही..
व्यस्ततेची सबब
माझ्याकडेही आहे
पण तरीही
तुला
मी टाळत नाही..!!
**सुनिल पवार..✍️

सुगी..

सुगी..

उजेड पेरत
पहाट अवतरते..
किरणांच्या पिकातून
सूर्यफळ डोकावते..!!
पाखरांची किलबिल
नभात झेपावते..
चराचरात प्रकाशित
सुगी अवतरते..!!
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺

निरव..

निरव..

शांतता सांगू पाहतेय
पण ऐकू काहीच येत नाही..
नुसताच मनाचा गोंधळ
सांग उपाय आहे का काही..!!
वाराही निरव वाहतोय
पानांचीही सळसळ नाही..
पण मनातल्या वादळाचे
निवारण आहे का काही..!!
हे कसले मूक रुदन आहे
टिपूस एक डोळ्यात नाही..
पाणी मुरतेय तरी कुठे
मागमूस आहे का काही..!!
चल सोडून दे विषय
तुला तो झेपणार नाही..
सुखनैव तुझ्या निद्रेला
सांग भ्रांत आहे का काही..!!
***सुनिल पवार...✍️

रंग रसभंग..

रंग
रसभंग..

माझ्या
भावनेच्या चौकटीत
मला
राहू दे ना दंग..
आठवणींच्या भिंतीवर
मी पोतलाय
काळा रंग..!!
तसा
मिसळणार नाही
आता
त्यात कोणताच रंग..
तू करशील
जर वृथा प्रयत्न
तर होईल
तुझाच रसभंग..!!
**सुनिल पवार...✍️

जावईशोध...

जावईशोध...

आता नदीने
माघारी फिरायचे ठरवले
म्हणून सागर 
चार पावलं सोडायला निघाला
आणि गहजब झाला..!!
काठावरच्या संधीसाधूंना
चघळायला विषय मिळाला
कोणी म्हणाले
नदी बदफैली झाली
तर कोणी म्हणाले
सागर बाईलवेडा निघाला..!!
बिचाऱ्या
खडकांनी आडोसा घेतला
वाऱ्याने कानोसा घेतला
काही वेळ
विषयाचे थवेच्या थवे उठले
अन् तसेच माघारी फिरले..!!
उद्या
पुन्हा जमतील ते तिथे
नवीन खाद्य शोधायला
किनाऱ्यावर
उमटलेली पावलं खोदायला
आणखी एक नवा
जावईशोध लावायला..!!
***सुनिल पवार...✍️

उत्तर हवे..

उत्तर हवे..

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर
मन स्थिर तरी कसे व्हावे..
स्वप्नांच्या उजाड बागेवर
फुल तरी कसे फुलावे..??
नभ धरेच्या मिलनास
का सागराने साक्षी राहावे..
क्षितीजातले आभासी रंग
का नभाच्या अक्षी सजावे..??
सागराच्या विशाल खोलीत
का लाटांनी नित्य मग्न राहावे..
मदमस्त लाटांच्या तडाख्यात
का किनाऱ्यानेच भग्न व्हावे..!!
माझ्या मनाच्या प्रश्नापुढे
का उत्तराने निरुत्तर व्हावे..
प्रश्न अनाठायी उठत नाहीत
त्यांनाही त्यांचे ऊत्तर हवे..!!
**सुनिल पवार..✍️