Friday, 15 September 2017

|| धवल प्रकाशात ||

|| धवल प्रकाशात ||
============
काल ती
चिडून म्हणाली
ही दुनिया आहे एक मोहमाया
इथे
कोणी समजून घेत नाही कोणाला
मग
तुला दोष देण्यात काय हशील..?
फार तर
तू त्या साखळीचा एक घटक होशील..!!

मी म्हणालो
सगळेच नसतात ग तसे
समजून घेणारेही आहेत खासे
ही समाजदारीच त्यांना नि:शब्द करते
सांगायचं असते पण मन अडवते
आणि मग
तू त्याला एकाच साखळीत गुंफते..!!
ती पुन्हा चिडली
म्हणाली
कळत नाही रे
ह्याला छळ म्हणू का खेळ म्हणू
छळच असावा हा माझा
खेळ तर तुझा होतोय..
तुझ्या ह्या निःशब्द खेळात
माझ्या धैयाचा बळी जातोय..!!
मी हसलो, म्हणालो
असा धीर सोडू नको
घेतला वसा मोडू नको
तुला अपेक्षित असणारा
तो दिवस
नक्की उगवेल केव्हातरी
आणि समज
नाहीच उगवला जरी कधी
तरी
तू अवस मात्र होऊ नको
उजळून टाक आसमंत सारा
तू पूर्ण चंद्र होऊन..
तृप्त होतील ग चांदण्या मग
तुझ्या
धवल प्रकाशात न्हाऊन..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| माय मरो मावशी जगो ||

|| *माय मरो मावशी जगो* ||
===================
आज
हिंदी दिनानिमित्त
मला आठवली
मराठीतील
ती समर्पक म्हण
*"माय मरो अन मावशी जगो"*
खरंच असावं ते
तसं दोघीत फारसं अंतर नाही
मिसळल्यात दोघी एकमेकात
इतक्या बेमालूम की
एक झाकावी दुसरी दाखवावी
पण
अलीकडे बदलत चाललीय
परिस्थिती
दोघींची दिसतेय दयनीय स्थिती
कुठे
अस्मितेची कुरघोडी
तर कुठे
त्या आंटीची शिरजोरी..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

|| कावळा ||

|| कावळा ||
========
एरव्ही तू
उकिरडे फुंकत फिरत असतोस
तेव्हा मी घृणीत नजरेने तुला पाहतो..
तुझा कर्णकर्कश आवाज
अगदी नको नकोसा वाटतो
म्हणूनच मी तुला
खिडकीवरून पिटाळून लावतो..!!
पण म्हणतात ना!
प्रत्येकाचा दिवस येत असतो
तसाच आता तुझाही आलाय
प्रत्येक नजरेत तुझीच आतुरता
जणू पूर्वापार चालत आलेला लळा
अगदी तसाच दिसतोय कळवळा..!!
आता म्हणावेसे वाटतेय
की झाले गेले विसरून जा
ठेवले पक्वान्न चोच मारून जा
तुला बोलावून सुकला माझा गळा
अन् पेटू लागल्यात भुकेच्या ज्वाळा
आता विचारू नको आणि म्हणूही नको
का-वळा..!!
--सुनिल पवार...✍🏼

|| लढाई ||

लढाई..
अनादी काळापासून चालत आल्या आहेत
रक्तरंजित लढाया
त्या कुठे थांबण्याचे चिन्ह दिसत नाही
तो काळ आणि आताचा काळ
यांचं स्वरूपही फारसं भिन्न नाही।
सीमेवरची लढाई समजून येते
पण अंतर्गत लढाईचे काय..?
तिचाही कुठे अंत दिसत नाही
जातीयतेचा भस्मासुर
सर्वत्र पसरू पाहतोय हातपाय
पण त्यालाही कुठे अटकाव नाही।
विचारांची वैचारिक लढाई सुद्धा
आता रक्तरंजित होते आहे
श्वेत पताका रंगात भिजते आहे
जणू शांती सलोखा अशी गोष्टच नसावी
बहुतेक ती कालबाह्य झाली असावी।
त्या काळापासून ह्या काळापर्यंत
म्हणतात माणसाने बरीच प्रगती केली
त्याची पावलं चंद्रावरही पडली
आपल्या बुद्धीच्या बळावर
त्याने विविध शिखरे पदाक्रांत केली।
असेही म्हणतात,
की शिकला सवरलेला माणूस
प्रगत आणि सुसंस्कृत झाला
पण मला कळत नाही
तो कितीसा अन् कोणत्या अंगाने झाला?
का नुसताच वाचण्यास भार होतोय
छापील पुस्तकाचा..!!
--सुनिल पवार...✍🏼

|| प्राजक्त ||

|| प्राजक्त ||
========
ओघळणारा हा प्राजक्त
जातो सांगून मज काही..
रितेपणाच शल्य उरी
जाणणारे कुणी नाही..!!

वेड गंधाचे साऱ्यांना
संवेदनेचा गंध नाही..
दुःचक्र हे ओघळण्याचे
भेदणारे कोणी नाही..!!
***सुनिल पवार...✍🏼✍🏼

|| आई ||

|| आई ||
======
तिच्यावर नेहमी कुरबुरणारी ती
त्याच्याजवळ
तिची कागाळी करणारी ती
त्याच्या गळ्यातला
ताईत असणारी ती
जेव्हा काही दुखतं खुपतं
तेव्हा
तिच्याच कुशीत शिरते ती
शेवटी
तिलाही ठाऊक आहे
तिच्यासारखी तीच
तिची सर कोणास येणार नाही
आणि
बापाला काही
आई होणे जमणार नाही..!!
***सुनिल पवार..✍🏼😊

Sunday, 10 September 2017

|| आधार ||

|| आधार ||
=======
तिला
सवय झालीय का.?
आधार घेण्याची..
कारण
ती अजूनही तशीच
विश्वासे विसंबून
घट्ट बिलगुन आहे त्यास..
पण किती काळ..?
हे सत्य म्हणावे का भास.?
भासच तो निखालस
कारण
असंख्य सुकलेल्या वेलींचं जंजाळ
त्याच्या बुंध्याशी
न जाणे केव्हापासून
कसला टाहो फोडताहेत..?
अन ती नवहिरवाई
ती ही
तितकीच आतुर भासतेय
त्याचाच घेण्या आधार..
हे चक्र का दुःचक्र
न जाणे
किती काळ चालणार..?
****सुनिल पवार..✍🏼

|| कोणी विचारावं ||

|| कोणी विचारावं ||
=============
मी वाचू पाहतो
पण समजत नाही..
शब्दंशब्द अवघड
अर्थ उमजत नाही..!!

मी चाळतो शब्दकोष
तर तो ही सदोष..
हे अज्ञान का माझे.?
जो व्यक्त होतो रोष..!!
मी बोलू पाहतो
पण जिव्हा अडखळते..?
कळेना हे घोडं
नेमकं कुठे अडते..??
ते मात्र लिहतात
त्यांना वाचता येते..?
कोणी विचारावं मोरास
तुला नाचता येते.??
***सुनिल पवार..✍🏼

|| ते म्हणाले ||

|| ते म्हणाले ||
=========
ते म्हणाले,
बोलायला हवं
मन आपलं खोलायला हवं
मी म्हटलं,
कुणाकडे..?
या बहिऱ्यांच्या दुनियेत
ऐकण्यास वेळ कोणाकडे..??
ते म्हणाले,
ऐकायला हवं
त्याने शिकायला मिळतं नवं नवं
मी म्हटलं,
कोणाचं..?
या मुक्यांच्या मौनी दुनियेत
शब्दांचंच होतंय हसं..!!
ते म्हणाले,
मग हसायला हवं
निदान बघणाऱ्यास वाटतं बरं
मी म्हटलं,
कोणावर..?
इथं आपलंच प्रतिबिंब
दिसतंय आरशावर..!!
ते म्हणाले,
अरे मग आरसा तरी दाखव
उगाच काळास नको सोकव
मी म्हटलं,
कोणाला..??
निदान दिसायला तरी हवं ना
आंधळ्या माणसाला..!!
--सुनिल पवार...✍🏼

|| आभाळ माया ||

|| आभाळ माया ||
===========
आभाळ माया
फोडतसे पाझर
झरे डोंगर..!! १!!

थेंबा थेंबात
मोतीयांची आरास
क्षणाचा भास..!!२!!

फुलांचे रंग
पठारास लाभले
दुःख झाकले..!!३!!

हिरव्या रानी
उंडरतात गवे
मानवी थवे..!!४!!

कळ्या फुलल्या
इंद्रधनुष्य झाल्या
देवा वाहिल्या..!!५!!

तपस्वी बक
गवतावर दक्ष
भक्षिण्या भक्ष..!!६!!

गुरांशी दोस्ती
कावळ्याने ही केली.?
भूक मिटली..!!७!!
***सुनिल पवार..✍🏼

|| ईद का चाँद ||

ईद का चाँद..
बिस्तर पर लेटा हुआ था
सुबह सुबह उसने आवाज़ लगाई
मानो किसी मस्जिद में अज़ान हुई
कहने लगी,
अजी उठो आज ईद है
सुना है चाँद के भी दीदार हो गए
और आप है के अब तक हो सोये हुए..!!
हम हँस के बोले
बेगम, हमारा चाँद तो रोज निकलता है
हा यह अलग बात है के
कभी कभी अमावस आ जाती है
फिर भी हमारा चाँद तो
हमारे नजरो के सामने होता है
हम क्यों जाए
किसी और चाँद के दीदार करने.?
नादान है वह सब
जो उसे गली मौहल्ले में ढूंढने है।
बस कहने की थी देरी
चाँद शर्मा के मुस्कुराया
मानो अपनी पलकों पे बिठाया
सच कहु तो
हमारे ईद को भी चार चाँद लग गए
जब चाँद हँसकर बाहों मे समाया।
***सुनिल पवार..✍🏼

|| तेच प्रश्न ||

|| तेच प्रश्न ||
========
सापडत नाहीत काही प्रश्नांची उत्तरे
शब्दांचे धांडोळे चाळून..
वरवरचीच ठरते मलमपट्टी
मात्र हात जातात पूर्ण पोळून..!!

किती प्यावे हे जहरिले अनुभव
कोळून साखरेत घोळून..?
हृदय तरी छिन्न विछिन्न
स्वप्न जाते क्षणात जळून..!!
गुलाबांच्या काट्याची सल
हल्ली बाभळीस अधिक सलते..
गल्लो गल्ली तोच खल
ही वेदना अधिक मनास खलते..!!
नव्या युगाचा डंका पिटत
येतात तेच प्रश्न,तीच उत्तरे,
अन अंतपुरात ही दरवळणारी
नकोशी वाटतात सुवासिक अत्तरे..!!
***सुनिल पवार..✍🏼