Friday, 15 September 2017

|| लढाई ||

लढाई..
अनादी काळापासून चालत आल्या आहेत
रक्तरंजित लढाया
त्या कुठे थांबण्याचे चिन्ह दिसत नाही
तो काळ आणि आताचा काळ
यांचं स्वरूपही फारसं भिन्न नाही।
सीमेवरची लढाई समजून येते
पण अंतर्गत लढाईचे काय..?
तिचाही कुठे अंत दिसत नाही
जातीयतेचा भस्मासुर
सर्वत्र पसरू पाहतोय हातपाय
पण त्यालाही कुठे अटकाव नाही।
विचारांची वैचारिक लढाई सुद्धा
आता रक्तरंजित होते आहे
श्वेत पताका रंगात भिजते आहे
जणू शांती सलोखा अशी गोष्टच नसावी
बहुतेक ती कालबाह्य झाली असावी।
त्या काळापासून ह्या काळापर्यंत
म्हणतात माणसाने बरीच प्रगती केली
त्याची पावलं चंद्रावरही पडली
आपल्या बुद्धीच्या बळावर
त्याने विविध शिखरे पदाक्रांत केली।
असेही म्हणतात,
की शिकला सवरलेला माणूस
प्रगत आणि सुसंस्कृत झाला
पण मला कळत नाही
तो कितीसा अन् कोणत्या अंगाने झाला?
का नुसताच वाचण्यास भार होतोय
छापील पुस्तकाचा..!!
--सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment