|| हे ठाऊक नसावे त्याला ||
================
तो घेऊन आला पुन्हा
जुन्या ओल्या आठवणीला..
आतासा रोजच मी भिजतोय
हे ठाऊक नसावे त्याला..!!
कधी रिमझिम तर कधी बेधुंद
तो खेळवतो अवखळ वाऱ्याला..
आतासा जीवनाचाच खेळ झालाय
हे ठाऊक नसावे त्याला..!!
इंद्रधनू फुलवतो सप्तरंगाचे
तो नटवतो साऱ्या सृष्टीला..
आतासा रंगहीन जगतोय माणूस
हे ठाऊक नसावे त्याला..!!
कधी गरजतो तर कधी बरसतो
तो कधी पाचारितो सौदामिनीला..
आतासा सुनासुना वाटतोय पाऊस
हे ठाऊक नसावे त्याला..!!
--सुनिल पवार..

No comments:
Post a Comment