यशोदे तुझा कान्हा..
दह्या दुधाचे माठ फोडीतो
नजर चुकवून घरात शिरतो
सवंगड्याना तोच फितवितो..
थरावर थर रचुन करतो चोरी..
यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी..!!
जाता मथुरेस वाट अडवितो
देता नकार मटकी फोडीतो
लोण्यावीणा ना कोणा सोडीतो..
अवखळ भारी करे शिरजोरी..
यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी..!!
वाजवुन मुरली आम्हास भुलवी
गोड बोलून साऱ्यांस झुलवी
जाता स्नाना चोळी पळवी..
विनवु किती ग कृष्ण मुरारी..
यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी..!!
नको गं बांधू उखळीस त्याला
चित्तचोर आहे तुझा नंदलाला
वेड लाविले त्याने साऱ्या गोकुळाला..
निवास त्याचा असो घरोघरी..
यशोदे तुझा कान्हा गं लोभस भारी..!!
--सुनिल पवार..

134
People Reached
3
Engagements
No comments:
Post a Comment