||| पोळा माझ्या मनाचा सोहळा ||
====================
बैल नाहीत गोठ्यात
कसा व्हावा बरे पोळा।
पिकपाणी ना शेताला
नेत्री लागतात झळा..!!
बैल जोड़ होती छान
होते फुलत शिवार।
त्यांच्या जीवावर होती
आम्हा सर्वांची मदार..!!
राब राबले इमाने
परी आभाळ फाटले।
पीक वाहिले जे होते
पाणी डोळ्यात दाटले..!!
काय घालावे मुक्यांना
घरी नाही दाणागोटा।
शेत शिवार गहाण
आणू कुठून मी नोटा..!!
नाही पटले मनास
तरी निर्णय घेतला
कुटुंबाच्या पोटासाठी
बैल एकेक विकला..!!
कसा पुरेल तो पैसा
18 विश्व दारिद्र्याला।
अश्रु पिऊन पिऊन
पोट आलं खपाटीला..!!
आठवून आता पोळा
साठवतो त्यांस डोळा
सण साजरा करतो
माझ्या मनाचा सोहळा..!!
--सुनिल पवार..

No comments:
Post a Comment