Monday, 28 September 2015

पोलिसवाले काका

(बालकाव्य)
पोलिसवाले काका..

पोलिस काका पोलिस काका 
धन्यवाद देतो तुम्हाला..
उत्सवाचा बंदोबस्त
तुम्ही अगदी चोख ठेवला..!!

तुमच्याच निगराणीत
आमचं बाप्पा जोशात निघाला..
म्हणूनच आशीर्वाद बाप्पाचा
लाभो प्रथम तुम्हाला..!!

तुम्ही तुमच्या कुटुंबास 
आमच्यामधे पाहता..
उन्हातान्हात भर पावसात
तुम्ही कायम उभे राहता..!!

मी पाहिलयं तुम्हाला
तुमच्याकडे वेळ नसते जेवणाला..
तरीही केली नाही तुम्ही 
तक्रार कधीच कोणाला..!!

कोणी विचारत नाही तुम्हास
कधी वडापाव तो साधा..
तरीही जोशात उभे असतात 
आमचे पोलिसवाले काका..!!
--सुनिल पवार..


Sunday, 27 September 2015

|| निघालोय मी ||

|| निरोप घेतो ||
==========
निघालोय मी
आता निरोप तुमचा घेतो
पुढच्या वर्षी येईन
असं नाईलाजाने म्हणतो..!!

डीजेचा डेसिबल
फारच कानास छळतो
उंदीर वाहन माझा
मग घाबरून दूर पाळतो..!!

हिडीस नृत्याचा प्रकार
डोळ्यास नाही रुचत..
झाकून घेतो डोळे
बाकी काहीच नाही सुचत..!!

विसर्जनास तुमच्या
कसले तारतम्य नसते..
रात्र होते फार
अन विमान माझे चुकते..!!

मन तुमचे कोते
नाहक ऊंची माझी वाढवता..
रस्त्यात मंडप घालून
उगाच वाहतूक का अडवता..!!

चुका तुम्ही करता
लोकं मला नावे ठेवतात
माझ्या अस्तित्वावर मग
नाहक प्रश्न उठवतात..!!

भावभोळ्या भक्तासाठी
तरी यावे लागेल मला..
तुम्ही कधी सुधारताय
हे ही पहावे लागेल मला..!!
*****सुनिल पवार...

|| पुढच्या वर्षी लवकर या ||

|| पुढच्या वर्षी लवकर या ||
=================
थडकल्या भव्य लाटा
तीरी सागर किनारी..
मन सिंधु उधणला..
बाप्पा निघाले माघारी..!!

11 दिसांचा सहवास
वेड लावितो जीवास
घेता निरोप बाप्पाचा
मन होते हे उदास..!!

करा आश्वस्त आम्हास
लवकर परताल..
पाहुणचार आमचा
तुम्ही आनंदाने घ्याल..!!

काही चुकले माखले 
त्याची क्षमा मी मागतो
घावे अपराध पोटी
नित्य तुम्हास स्मरतो..!!

साश्रु नयनांनी देवा
आलो निरोप मी द्याया..
पुन्हा पुढच्या वर्षी या
बा गणपती मोरया..!!
*****सुनिल पवार.....

Friday, 25 September 2015

|| बाजार ||

|| बाजार ||
=======
चहुओर बाजार भावनेचा
अंत नाही त्या मायेला..
भुलतात का सारे जण
वरवरच्या त्या कायेला..!!

झुंबड़ उड़े दुकानी त्यांच्या
भूलवी चमक ती डोळ्याला..
दौड़ती अंध एकजात सारे
अंत नसे त्या सोहळ्याला..!!

तु ही उभा का राहिलास देवा
त्यांच्या त्या लालची सायेला..
भक्ती भुकेला तू राहशील उपाशी
न ठरणार पात्र त्यांच्या दयेला..!!
******सुनिल पवार.....

Wednesday, 23 September 2015

|| सीता ||

|| सीता ||
=======
होती ती रामाची सीता
अबला का हो म्हणता..
असुरांची काळ झाली
ती जाणता अजाणता..!!


राजकन्या जरी एक
दुःख अपार सोसले
पतिव्रता ती अनोखी
श्रीरामास बळ दिले..!!

अग्नि परीक्षेच्या क्षणाला
न जाळी अग्नि सीतेला
कर जोडून उभा राही
तोच अग्नि त्या मातेला..!!

पित्याहुन बलवान
पुत्रांस त्या बनवले
नारी शक्तीनेच खरे
नरास त्या घडवले..!!

उदरी घेई भू माता
जननी तीच, ती पिता..
जनक नामास मात्र
अशी तेजस्वी ती सीता..!!

सीतेविणा राम कधी
राम नाही तो राहिला
जाताच ती पतिव्रता
अवतार पूर्ण झाला..!!
******सुनिल पवार.....

Tuesday, 22 September 2015

|| आधी जाणा ||

|| आधी जाणा ||
===========
जो क्षण मला आनंद देतो
देव मला तेथेच दिसतो
म्हणा तुम्ही काहीही मला
तो फोटीतला देव  मज आशीर्वाद देतो..!!

तसबीर माझ्या आई वडिलांची
मी आशीर्वाद तिचाही रोज घेतो
असेल जर का ही अंधश्रद्धा
तर तिचा मी उदोउदो करतो..!!

बुवाबाजीस विरोध माझा
तुम्ही हे ही पक्के जाणा..
श्रद्धा अंधश्रद्धा आधी जाणा
मग खुशाल तुम्ही डोळे ताणा..!!

******सुनिल पवार......

|| तुझ्या दर्शनाला ||



|| तुझ्या दर्शनाला ||
============
तुझ्या दर्शनाला आलो
मी भक्ती भाव घेवून
पण बाप्पा तुझे कार्यकर्ते
जातात भाव खाऊन..!!

तासंतास मी लाईनीत उभा
जातो जीव कातावुन
माजोरांना तो सोडतो
बघ मागल्या दारातून..!!

चढाव्याचा देवा तुला
सोस मुळीच काही
पण कार्यकर्त्याच्या वागण्याला
मुळी पायपोस नाही..!!

जीवघेणी हि रेटारेटी
मी करू कशापायी
भरून तू आहेस देवा
सृष्टीत ठाई ठाई..!!

उत्सव झाले गल्लाभरु
तुम्ही विचार साधा करा
भुलु नका हो गर्दीला
मनी पूजन करा..!!
***सुनिल पवार....

|| पूजन ||

|| पूजन ||
🍁🌺🍁
जेव्हा जेव्हा मी पूजा करतो
तू अस्तित्वाच तुनतुनं वाजवतो..
टाळाला चिपळीची साथ जशी
मीही तुला तसच भासवतो..!!

मग तू आणखी चेकाळतोस
ढोल जोर जोराने बडवतोस..
मी माझ्या पुजेत मग्न असतो
तू तुझे का देव दडवतोस..!!

माझं आस्तिकपण मी मान्य केलय
पण तुझ्या नास्तिकपणाचे काय..?
दूध नुसतच उकळतय रे
त्यास धरतेय कुठे साय..!!

मनात जिथे आस्था असते
श्रद्धा खरी ती तिथेच रुजते..
तू बोलणार नाहीस पण मला ठाऊक आहे
तुझंही मन कोणास तरी पूजते..!
तुझंही मन कोणास तरी पूजते..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार..!!

Sunday, 20 September 2015

|| प्रभात समयी ||

|| प्रभात समयी ||
===========
प्रभात समयी
नमितो गणपती
स्वीकारा आरती..
दिशा उजळली,
सुवर्ण कांती
उठा उठा गणपती..!!

पूर्व दिशेला,
रवी उगवला
उजळीत डोंगर माथी..
गाय हंबरे
गोठ्यातून ती
उठा उठा गणपती..!!

वारा वाहतसे
वाजवीत पावा
पाने फुले डोलती..
किलबिलबिल पक्षी
सुस्वर गाती
उठा उठा गणपती..!!

दीप आशेचा
मन मंदिरात
तेवतो दिन राती..
मनोभावे मी
लिन चरणाती
उठा उठा गणपती..!!
*****सुनिल पवार....

Friday, 18 September 2015

II बाप्पा II

हे गणराया..

मन प्रसन्न होते रे बाप्पा
तुला घरात पुन्हा पाहुन।
दुखः माझ्या पाचवीला
तरी जातो आनंदात न्हाऊन।

उंदीर मामा रोजच फिरतो
रात्री बेरात्री संचार करतो।
तू मात्र वर्षातून एकदा येतो
म्हणूनच उर भरून येतो।

उकडीचे मोदक नाही जरी
पण गव्हाचे जरा पाहा चाखुन।
संपलय रेशन कळेलच तुला
मी ठेवलं नाही काहीच राखून।

सोसत नाही विजेचा भार
म्हणून तू भागवून घे सूर्यावर।
चंद्राचा उजेड कमीच भासेल
म्हणून हसु नको माझ्या औंदर्यावर।

पाहुन घे माझा राजमहल
पुढच्या वर्षी असेल नसेल।
पण माझ्या मनात मात्र बाप्पा
तुझं स्थान अढळ असेल।
--सुनील पवार..✍️

।। मी येतोय ।।

मी येतोय..

झाली का तयारी
आता येतोय मी घरी..
उंदीर मामा प्रवासात
थकले आहेत भारी..!!


प्रत्येक घरो घरी
जोश दिसतोय भारी..
आरास करा खरी
पर्यावरणास उपकारी..!!

सुरेल सुर धरा
कर्कशता नाही बरी..
मनोभावे पूजन करा 
हीच भक्ती खरी..!!

आशीर्वाद मी देईन
प्रत्येक इच्छेपरी..
नुसताच काय दाखवता 
एक मोदक द्या तरी..!!
--सुनिल पवार..

Wednesday, 16 September 2015

|| तपस्वी मी निशेचा ||

|| तपस्वी मी निशेचा ||
=============
माळुन चंद्र तारे तू
वाऱ्यावर अशी लहरु नको
ह्या रात्रीच्या धुंद प्रहरी
रातराणी तू बहरू नको..!!


वेडावतो मज दरवळ तुझा
तू सुहासे मज मोहवू नको
मोहक तुझ्या गंधास्त्राने
तू नादास मजला लावू नको..!!

निशब्द नीरव शांत चहुओर
तू भंग तिचा करू नको
मिसळून श्वास श्वासात असा
तू रंग लीला स्मरु नको..!!

एक तपस्वी मी निशेचा
तू साधना माझी तोडू नको
मिटल्या तुझ्या नेत्र फुलांनी
तू स्वप्नी नाते जोडू नको..!!
******सुनिल पवार......

Monday, 14 September 2015

|| मेघ प्रेमाचा ||

|| मेघ प्रेमाचा ||
==========
एक मेघ तो प्रेमाचा
मन अंबरी दाटला..
ना कळले माझे मला
कसा वारा वेडावला..!!

बरसेल का ती धारा
वाटे शंका त्या क्षणाला..
कसा लाभावा किनारा
उधाणल्या त्या मनाला..!!

काय करावा इशारा
कसे समजावे तीला..
घालमेल ती मनाला
कोणा घ्यावे मदतीला..!!

दूत तोच एक आला
भिडले अक्ष अक्षाला
मन सांगे ते मनाला
जाण माझिया प्रेमाला..!!

हर्ष वाटे तो मनाला
बांध तिचाही तुटला
नाही म्हणता म्हणता
प्रेमा पाझर फुटला..!!
******सुनिल पवार......

::II तो क्या गम II:::

::II तो क्या गम II:::
============
सपनो को हम..
सदा संजोगते गये..
तो क्या गम,
किसीने बिखरा दिये..!!

हर पल आसपास
उनको रखते गये
तो क्या गम,
हमसे दूर हो गये..!!

कितने मौसम आये
कितने चले गये..
तो क्या गम,
वोह ना आये..!!

नही गम कोई
वोह आये या ना आये..
यादोमें रहेंगे मगर
हमेशा के लीये..!!
******सुनिल पवार...

Saturday, 12 September 2015

|| पोळा माझ्या मनाचा सोहळा ||

||| पोळा माझ्या मनाचा सोहळा ||
====================
बैल नाहीत गोठ्यात
कसा व्हावा बरे पोळा।
पिकपाणी ना शेताला
नेत्री लागतात झळा..!!
बैल जोड़ होती छान
होते फुलत शिवार।
त्यांच्या जीवावर होती
आम्हा सर्वांची मदार..!!
राब राबले इमाने
परी आभाळ फाटले।
पीक वाहिले जे होते
पाणी डोळ्यात दाटले..!!
काय घालावे मुक्यांना
घरी नाही दाणागोटा।
शेत शिवार गहाण
आणू कुठून मी नोटा..!!
नाही पटले मनास
तरी निर्णय घेतला
कुटुंबाच्या पोटासाठी
बैल एकेक विकला..!!
कसा पुरेल तो पैसा
18 विश्व दारिद्र्याला।
अश्रु पिऊन पिऊन
पोट आलं खपाटीला..!!
आठवून आता पोळा
साठवतो त्यांस डोळा
सण साजरा करतो
माझ्या मनाचा सोहळा..!!
--सुनिल पवार..✍️
Image may contain: text that says 'Your uote.in बैल पोळा... बैल नाहीत गोठ्यात, कसा व्हावा बरे पोळा| पिकपाणी ना शेताला, नेत्री लागतात झळा..!! बैल जोड़ होती छान, होते फुलत शिवार| त्यांच्या जीवावर होती, आम्हा सर्वांची मदार..!! राब राबले इमाने, परी आभाळ फाटले| पीक वाहिले जे होते, पाणी डोळ्यात दाटले..!! काय घालावे मुक्यांना, घरी नाही दाणागोटा| शेत शिवार गहाण, आणू कुठून मी नोटा..!! नाही पटले मनास, तरी निर्णय घेतला कुटुंबाच्या पोटासाठी, बैल एकेक विकला..!! कसा पुरेल तो पैसा, 18 विश्व दारिद्रयाला| अश्रु पिऊन पिऊन, पोट आलं खपाटीला..!! आठवून आता पोळा, साठवतो त्यांस डोळा सण साजरा करतो, माझ्या मनाचा सोहळा..!! -सुनिल वार..(काव्यचकोर)'
लईभारी सखी, भारत जगताप and 28 others
24 Comments
Like
Comment
Share

|| प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा ||

हल्ली व्हाट्सअपवर मयताचे फोटो टाकण्याचे नवीन खूळ आले आहे..लोक मृताचे सोपास्कार पार पाडायचे सोडून आधी स्टेटस टाकून आपल्या आपल्या अल्पबुद्धीची जाणीव करून देतात..तेव्हा खरच त्यांची कीव येते...स्वतःला विज्ञान युगी म्हणवणारा माणूस किती खालच्या पातळीवर घसरला आहे ह्याची प्रचीती त्यांच्या कृत्यातून येते..असा कर्तव्यहीन कृतीवर प्रकाश झोत टाकणारी खालील कविता अवश्य वाचा आणि आपला अभिप्राय कळवा...
धन्यवाद...
=====================
|| प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा ||
=====================
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..
पाडले स्टेटस सोपस्कार
बांधले कमेंट्स चार गठीला..!!


अवघा जनसमुदाय खोळंबला
देह अग्निसाठी तो तिष्ठला..
पहिला मान व्हाट्सअपला
पाहुन उर माझा फाटला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!

झाली तिरडी बांधून
व्हाट्सअपची कमेंट सांधुन
हार फुलात सजला
फ़ोटो झकास काढीला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!

दिला अग्नी पेटली चिता
पुन्हा सतावे स्टेटस चिंता..
शोकसभेचा संदेश धाडीला
वाचकास असे धरले वेठीला..
प्रणाम तुझ व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!

म्हणती जन मोक्ष मिळाला
देह सदेह स्वर्गी वळला..
व्हाट्सअप बाबा कृपा तुझी
सोहळा याची देही देखिला..
प्रणाम तुज व्हाट्सअप बाबा
मयत आला तुझ्या भेटीला..!!
*****सुनिल पवार......

Wednesday, 9 September 2015

II स्पर्श II

II स्पर्श II
======
एक स्पर्श स्पर्शातला..
हळुवार स्पर्शुन गेला..
माझ्या तिच्या मनाला
नकळत हर्षून गेला..!!

बावरले मन जरासे
चेहरा सांगून गेला..
हृदयाचा ठोका माझ्या
सीमा लांघून गेला..!!

वळता कटाक्ष माघारी..
सवाल करून गेला..
मन मनाचा होकार
नजरेत भरून गेला..!!

निश्चल उभा एकाकी
तो चेहरा दूर गेला..
माझ्या मनाचा तोच
घेऊन सूर गेला..!!

काय होते स्पर्शात
ते सांगुन हूर गेला..
हृदयास बिलगून माझ्या
लावून हुरहूर गेला..!!
*******सुनील पवार.....

Tuesday, 8 September 2015

।। तैसे प्रेम ।।

।। तैसे प्रेम ।।
=========
सूर्याच्या प्रेमात
धारित्रीचे सजणे..!!
धारित्रीच्या प्रेमात
चंद्राचे फिरणे.!!
चंद्राच्या प्रेमात
चांदणे देखणे..!!
चांदण्यांच्या प्रेमात
निशेचे सजणे..!!
निशेच्या प्रेमात
काजव्याचे लुकलुकणे..!!
तैसे प्रेम माझे
:
मौनात बोलणे
पापण्यात भिजणे..!!
=★★=★★=★★=
*****सुनिल पवार....

|| शिक्षण प्रणाली ||

|| शिक्षण प्रणाली ||
============
आदर्श शिक्षक आता, मुठभर राहिले
शिक्षणाचे आता मी व्यापार पाहिले..!!

काय घडेल तो विद्यार्थी नागरिक सच्चा
डिग्रीस ज्याने धन असे, अपार वाहीले..!!

वंचित गरीबी मूलभूत शिक्षाणाला
श्रीमंतीतले असे, मी नादार पाहिले..!!

स्पर्धेचा तो एक बागुलबुवा असावा
कशाचेच ना त्यास, मी आधार पाहिले..!!

दृष्टिदोष जगात भरून तसाच असावा
प्रत्येकास तसेच मी आजार पाहिले..!!

भरडले विद्यार्थी, वाकले असेच काही
दप्तर एक असेच, मी वजनदार पाहिले..!!

उपाय योजनांचा वारु दौड़तच आला
वल्गनेचे स्वार असे दमदार पाहिले..!!

आदर्श शिक्षक आता मुठभर राहिले
शिक्षणाचे आता मी व्यापार पाहिले..!!
******सुनिल पवार.....

Sunday, 6 September 2015

|| यशोदे तुझा कान्हा ||

यशोदे तुझा कान्हा..


दह्या दुधाचे माठ फोडीतो
नजर चुकवून घरात शिरतो
सवंगड्याना तोच फितवितो..
थरावर थर रचुन करतो चोरी..
यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी..!!

जाता मथुरेस वाट अडवितो
देता नकार मटकी फोडीतो
लोण्यावीणा ना कोणा सोडीतो..
अवखळ भारी करे शिरजोरी..
यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी..!!

वाजवुन मुरली आम्हास भुलवी
गोड बोलून साऱ्यांस झुलवी
जाता स्नाना चोळी पळवी..
विनवु किती ग कृष्ण मुरारी..
यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी..!!

नको गं बांधू उखळीस त्याला
चित्तचोर आहे तुझा नंदलाला
वेड लाविले त्याने साऱ्या गोकुळाला..
निवास त्याचा असो घरोघरी..
यशोदे तुझा कान्हा गं लोभस भारी..!!
--सुनिल पवार..✍️
Image may contain: 1 person, text that says '880 यशोदे तुझा कान्हा.. दह्या दुधाचे माठ फोडीतो नजर चुकवून घरात शिरतो सवंगड्याना तोच फितवितो थरावर थर रचुन करतो चोरी.. यशोदे तुझा कान्हा गं नटखट भारी| जाता मथुरेस वाट अडवितो देता नकार मटकी लोण्यावीणा ना कोणा सोडीतो| अवखळ भारी करे शिरजोरी.. यशोदे तुझा कान्हा नटखट भारी| वाजवुन मुरली आम्हास भुलवी गोड बोलून साऱ्यांस झुलवी स्नाना चोळी पळवी। विनवु किती कृष्ण मुरारी.. यशोदे तुझा कान्हा नटखट भारी| bn नको गं बांधू उखळीस त्याला चित्तचोर आहे तुझा नंदलाला वेड गोकुळाला| निवास त्याचा घरोघरी.. यशोदे तुझा कान्हा लोभस भारी| सुनिल पवार..'
134
People Reached
3
Engagements
2

Thursday, 3 September 2015

|| पुसता काय हो ||

|| पुसता काय हो ||
============
पुसता काय हो,
कविता काय असते..
मनाच्या दुधावरची
कविता साय असते..!!


पुसता काय हो,
कविता कशी बनते..
विचारांच्या टाकसाळीतले
ते नाणे खणखणते..!!

पुसता काय हो,
कविता कशी सजते..
रूपक अलंकारातून
ती भावनेत गजबजते..!!

पुसता काय हो,
कविता कशी असावी..
हृदयाचा वेध घेत
अलगद रुतून बसावी..!!

पुसता काय हो,
कविता कशी लिहावी..
अतरात्म्याच्या गाभ्यातून
ती उत्स्पुर्त प्रकट व्हावी..!!
****सुनिल पवार.....