II धमाल साहित्य संमेलन II
स्थळ : चांदोबा गुरुजीची शाळा..
(शाळा सुटली चांदोबा गुरुजी घरी जाण्याच्या तयारीत..सर्व विद्यार्थी घरी निघून जातात चकोर मात्र विचारमग्न जागेवरच बसलेला असतो..)
चांदोबा मास्तर : अरे चिटोरा आपला काय तो हा...चकोरा आज घरी जायचा विचार नाही का..??
चकोर : (तंद्री भंग होवून) काय मास्तर..??
चांदोबा मास्तर : अरे मी म्हणालो घरी जायचं नाही का आणि कसला विचार करतोस बाबा तू..??
चकोर : मास्तर एक इचारू..??
चांदोबा मास्तर : (आता ह्याने काय नवीन खूळ काढलं कोणास ठाऊक..वाड्यावर जाणे बोंबलले बहुतेक) बर विचार काय विचारायचे आहे ते..
चकोर : मास्तर साहित्य संमेलन म्हंजी काय..??
चांदोबा मास्तर : अरे वा चकोरा आज साहित्य संमेलनाच खूळ कसं काय शिरलं..??
चकोर : काय मास्तर तुम्ही भी खेचताय..म्या भी पेपर वाचतो..त्यात लिवल होत साहित्य संमेलन.. डोस्क्यात काय भी शिरलं न्हाय म्हटल मास्तराला विचारू..जनरल नोलीज म्हणून..
चांदोबा मास्तर : म्हणजे माझी परीक्षा घ्यायला आला की काय तू..??
चकोर : तसं न्हाय मास्तर मला भी माहित असलेल बर नाय का..उद्या कोणी इचारलं साहित्य संमेलन म्हणजे काय..?? तर काय सांगणार मास्तर..?? अन मला न्हाय आल मग नाव कुणाच खराब हुणार तुमच नव्ह..आता तुमास्नी नाय सांगायचं तर राहील..माझ्या बा च काय जातंय म्हना..!!
चांदोबा मास्तर : अरे चकोरा कधी रे सुधारणार तू..?? अरे बाबा मला तसं म्हणायचं नव्हत..बर ऐक सांगतो..
चकोर : हा सांगा गुरजी..
चांदोबा मास्तर : अरे वा एकदम गुरुजी..!! चांगल आहे त्या निमित्ताने का होईना तुझ्या तोंडून गुरुजी शब्द आले भरून पावलो रे चकोरा...(कोपरापासून हात जोडतात)
चकोर : मास्तर आता सांगताय का नुसतेच फुटेज खाताय..??
चांदोबा मास्तर : (मास्तर सावरत)बर सांगतो ऐक..साहित्य संमेलन म्हणजे जिथे छोटे मोठे कवी लेखक एकत्र जमतात..आपल्या काव्य कथा लोकांपर्यंत पोहचवतात..नवीन कवी कथाकारांना व्यासपीठ निर्माण करून देतात..आपले विचार सर्वाना वाटतात..इतरांचे विचार घेतात त्याला संमेलन म्हणतात..
चकोर : बर मग मला सांगा तिथे सूप वाजवतात का हो..??
चांदोबा मास्तर : सूप कसल सूप..??
चकोर : मंग ते पेपर मन्धे छापल हुत ना साहित्य संमेलनाचे सूप वाजले..
चांदोबा मास्तर : अरे वेड्या सूप म्हणजे बिगुल वाजले..
चकोर : अरे वा बिगुल भी वाजवत्यात..??
चांदोबा मास्तर : अरे चकोरा बिगुल म्हणजे नांदी झाली संमेलनाची..
चकोर : पण मास्तर नांदी नाटकात हुते ना..??
चांदोबा मास्तर : (वैतागत) आता ह्याला कस समजावू..?? नांदी म्हणजे सुरवात झाली..
चांदोबा मास्तर : मग सपष्ट बोला ना मास्तर सुरवात झाली म्हनून..म्हनजे बघा अस..सूप म्हजे बिगुल..बिगुल म्हनजे नांदी..नांदी म्हनजे सुरवात...
चांदोबा मास्तर : (वैतागत) हा बरोबर सुरवात..
चकोर : मास्तर म्या भी कविता लिवली हाय..सुगंधाला दावली लई आवडली तिला..
चांदोबा मास्तर : काय म्हणालास..??
चकोर : म्हनल म्या सुदिक कविता लिवली हाये सगुणा साठी..
चांदोबा मास्तर :( तरीच म्हणतो इथे सुगंधा कुठून आली.) वा वा चकोरा तू कविता लिहिली.. क्या बात..वाच बघू काय लिहल आहे जरा मला पण कळू दे..
चकोर : ऐका हा मास्तर..
माझी गुणाची बाय सगुणा..
भेटशील ना मला पुन्हा पुन्हा..
बापाला लाव चुना अन..
फडात येउन भेट ना पुन्हा पुन्हा..!!
चांदोबा मास्तर : शी शी शी काय रे हे चकोरा काय तुझ लिखाण..ह्याला काय कविता म्हणायची..??
चकोर : मास्तर ह्याला चारोळी म्हणत्यात..लई फ़ेमस हाय..अन मास्तर ह्यात डोस्क लावायची गरज न्हाय..आपल्या जे बोलायच हाय ना ते फकस्त जोडायचं हाय..लई भारी वजन पडतय बघा..सामानिच्यावर..
चांदोबा मास्तर : धन्य रे तू आणि धन्य तुझे विचार...
चकोर : मग बेस्ट हाय ना म्या..विद्यार्थी कुणाचा आहे चांदोबा गुरजींचा..
चांदोबा मास्तर : अरे गधड्या त्या साहित्य संमेलनात जावून ये जरा.. पहा तिथे कविता कशां असतात लोक कसे बोलतात शिक जरा कसे भाषण करतात..डोक्यात काही तरी घे..नुसताच माजलाय वळू..
चकोर : काय घ्यायचे मास्तर.. तिकडूनच आलो ना मी..म्हणूनच शाळेत यायला उशीर झाला ना मास्तर..!! अन काल दांडी मारली ती काय उगाच..अन हा वळू बोलायचं काम न्हाय..सांगून ठेवतो..
चांदोबा मास्तर : म्हणजे तू गेला होता तिकडे तरीही कोरडाच..(डोक्यात काही गेलंच नाही बहुतेक)...बर मग काय शिकला तिथे तु.. आणि काय काय पाहिलेस ते तरी सांग...
चकोर : मास्तर त्या संमेलना परिस आपली चावडी बरी..
चांदोबा मास्तर : का रे बाबा अस का बोलतो..
चकोर नाय तर काय मास्तर..बघाव तवा वाद..राग अन रुसवे..निस्त्या तंगड्या घालत हुते जणू कबड्डीचा सामानाच रंगलाय.. राड्याशिवाय बात न्हाय..अन बोलल्या शिवाय रहात नाय..
चांदोबा मास्तर : अरे असं नाही बोलायच तो वैचारिक वाद असतो..विचारांची आदान प्रदान होत असते.. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते..
चकोर : काय सांगताय तुम्ही मास्तर..आम्ही आडाणी हाय व्हय..आम्हास्नी भी कळत की राजकारण..कोटी शिवाय बात न्हाय यांची अन वडापाव शिवाय खात न्हाय अस समद हाय..अध्यक्ष सुदिक ह्याना कोट्याधीश लागतोय म्हणे... आता बोला..??
चांदोबा मास्तर : अरे चकोरा कोट्याधीश म्हणजे पैश्याने नाही रे.. ते भाषणात कोटी करतात ना म्हणून त्यांना कोट्याधीश म्हणतात..तुझ आपल काही तरीच..
चकोर : बर राहील मास्तर पण आता मला सांगा संमेलन साहित्याच हाय नव्ह.. मग साहित्य कुठाय..?? जसं तुम्ही आमास्नी सांगता उद्या हस्तकलेचा तास हाय तवा समद साहित्य घेऊन या..पर इथ तर पुस्तका बिगर काय बी दिसलं नाय..
चांदोबा मास्तर : किती रे अज्ञान चकोरा साहित्य म्हणजे सामान नाही..साहित्य म्हणजे लिखाण.. त्यांनी जे काही लिहल आहे ना म्हणजे कविता.चारोळी कथा ह्याना साहित्य म्हणतात..
चकोर : अस होय मला वाटलं आपल...बर ते राहुदे मास्तर.. पण तिथे कुर्मुड्या ज्योतिषांच काय काम ते तरी सांगा बघू..??
चांदोबा मास्तर : ज्योतिषी..!! कोण ज्योतिषी..??
चकोर : आल हुत एक पेटकर म्हणून..देशाच भविष्य सांगून गेले..नुसता धुरळा उडून राहिलाय त्यांच्या भविष्याने..बर मला सांगा मास्तर नरेंद्र नावाचा ह्या ज्योतिषांना इतक वावडं का..??
चांदोबा मास्तर : अरे गधड्या तुला काहीच कसं कळत नाही..जेष्ठ पत्रकार आहेत ते..त्यांचा अनुभव दांडगा आहे..त्यामुळे ते जे काही म्हणतात त्याला आपोआप वजन येते..आणि प्रसिद्धीत राहण्यासाठी त्यांना असे बोलावे लागते..आणि हो असे अनुदगार काढू नये थोरा मोठ्यांच्या विषयी..
चकोर : वा मास्तर ते बोलले म्हणजे अनुभव..आम्ही बोललो म्हणजे अज्ञान..हे बेस हाय मास्तर...तुम्ही चार बुक जास्त शिकले म्हणून तुम्ही फकस्त श्याने अन आम्ही येडे होय..?? आम्हास्नी कळत न्हाय का राजकारण कसं असत्ये ते..?? म्या सांगतो मास्तर जिथ जिथ राजकारण शिरतंय तिथ तिथ गजकरण सुरु होतंय..ह्याची लस बरी हुतच नाय..कितीबी मलम चोळा काय सुदिक फरक नाय बघा..हा समदा खाजवून खरुज काढण्याचा परकार हाय..
चांदोबा मास्तर : अरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात कार्यक्रमात..आपण लक्ष द्यायचं नाही..
चकोर : अस कसं म्हनता मास्तर ह्याला संमेलन म्हनायचं काय..?? कविता दोन चार अन भाषणबाजी दमदार..ह्या कोण साहित्य संमेलन म्हणाल काय..?? अन मला सांगा सगळ आलबेल असलं तर मग नारेबाजी काश्यापाय झाली..?? तुकाराम ज्ञानेश्वरांपासून सुरवात करायची अन नुसतीच दंगामस्ती करायची हे तुम्हास्नी पटतंय का..?? त्या परिस आमच्या चावडी वरचा गोंधळ बरा म्हणावा अस म्हणायची येळ आली आता..खर हाय का नाय मास्तर..??
चांदोबा मास्तर : हो रे चकोरा हे बाकी मुद्द्यांच बोललास तु..चला संमेलनाला जावून काही तरी अक्कल आली हे काय कमी आहे...
चकोर : मग मास्तर विद्यार्थी कोणाचा हाय..नुसताच जाउन नाही आलो मास्तर..कमाई करून आलो...
चांदोबा मास्तर : काय म्हणतोस चकोरा..?? कशी काय केली रे कमाई..??
चकोर : त्याच अस झाल मास्तर..इतकी मोठी मोठी लोक येणार मंग म्हटलं वडा पावची गाडी टाकू.. लई जोरात चालल..अन काय सांगू मास्तर आपली तर लॉटरीच लागली ना..तुम्हास्नी म्हणून सांगतो मास्तर..भोजनाच्या कुपन आपल्याच गाडीवर मिळत हूत्या ना..!!
चांदोबा मास्तर : ते कस काय रे चकोरा..??
चकोर : त्याच काय हाय मास्तर फुकट वाले पास हुते ना जे जेवणाचे.. ते आले माझ्या गाडीवर कमिशन वर.. अन तिकडे समद्यास्नी सांगितलं पास संपले म्हणून..मग काय गाडीवर एकचं झुंबड उडाली..बक्कळ पैसा कामीवला..आता मास्तर रातच्याला वाड्यावर पार्टी आपल्या तर्फे बर का..संकोच करायचं काम न्हाय..चकोर आपलाच विद्यार्थी हाय..बरंय मी निघतोय आता..तुम्ही लागा तयारीला..भेटूच पुढ्या संमेलनाला..काय...??
*चकोर*
https://www.facebook.com/pages/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97/274730592665311