Friday, 15 January 2016

|| सांग कधी ||

|| सांग कधी ||
=●=●=●=●=
वृक्षासही वाटतो घ्यावा
कोमल लतेचा आधार..
आवेगाचे तरल भाव
सांग कधी तुज कळणार..!!

सागरही सरकतो मागे
झेलण्यास नदीची धार..
पावले तशीच अल्लड
सांग कधी मजकडे वळणार..!!
नभासही सुखावतो रात्री
पूर्ण चंद्राचा संचार..
रातराणीच्या त्या चांदण्या
सांग कधी तू माळणार..!!
वाऱ्यासही नादावते नित्य
वर्षाराणी पाणीदार..
टवटवी गंधीत धरेची
सांग कधी तू लेवणार..!!
क्षितिजही मिरवते भाळी
लाल रंगाचा श्रृंगार..
संकेत तसेच मिलनाचे
सांग कधी तू पाळणार..!!
*****सुनिल पवार....

|| माझी आजी ||

|| माझी आजी ||
=●=●=●=●=●=
सुरकुतल्या हातांनी
किलकिल्या डोळ्यांनी
तू डोईवर हात फिरवते
आजी तुझ्या प्रेमाने
मन अजूनही गहिवरते..!!

आईविना होतो पोरका
दिली तू त्यास ममता
पित्याची तू माता
झाली तशीच माऊली
मज सांभाळता..!!
हयात गेली गावात
ना कसली खबरबात
परी आली तू शहरात
लेकराच्या लेकरासाठी
तू राबली दिनरात..!!
केलेस बहु लाड माझे
तू वाढविले कौतुकात
आहे मज सारेच ज्ञात
जपले मज फुलापरी
तू ठेविलें सुखात..!!
अडानी तू होतीस परी
शिकवलीस रीत भात
आजी तुझ्या आठवणीस
मी जपलय हृदयात..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.....

Friday, 8 January 2016

|| घे भरारी ||

|| घे भरारी ||
=●=●=●=●=
किती वाढशील
जोमात रोपा
त्या विशाल वृक्षाच्या
गर्द छायेत..
सुरक्षिततेचे भास
असतील क्षणिक
लुप्त होशील खचित
दुनयेच्या मायेत..!!

वेष्टणाची चमक
डोळ्यांना लुभावणारी जरी,
मोल अनमोल
त्यातील वस्तुस असते..
नजर पड़ताच
लोकांची त्यावर
वेष्टन ते आपसूक
कचऱ्यात जाते..!!
त्या सूर्याच्या
दिव्य प्रकाशात
मोहक चंद्रही
नित्य फीका पडतो..
स्वयंप्रकाशीत
जरी काजावा
तिमिरातही मग
मस्त टिमटिमतो..!!
यथेच्छ वापरा
आणि फेकून दया
बदलत्या जगाची
हीच रीत न्यारी..
सांभाळून ठेव
तुझ्या अस्तित्वाला
घे स्वःकर्तुत्वात
गगनी भरारी ..!!
*****सुनिल पवार.....

Wednesday, 6 January 2016

II मन रंगले II

II मन रंगले II
=========
भेट तुझी माझी व्हावी
हे विधिलिखित असावे..
गत जन्माचे कर्ज काही
तसेच थकित असावे..!!

विस्फारले डोळे बघ
सांशक सकल जणांनी..
माझिया बोलण्याने तेही
तसेच चकित असावे..!!
बरसतो का धुंद पाऊस
असा बेधुंद होऊन..
भूमीवरी प्रेम त्याचे
तसेच खचित असावे..!!
कोण चित्रकार उधळीतो
सप्तरंग क्षिताजात असे..
त्याचेही मन रंगले
तसेच सखीत असावे..!!
*****सुनील पवार.....

Tuesday, 5 January 2016

|| खंत ||

|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
=◆=◆===◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
खंत..
नेहमीच सतावते मला
खंत माझ्या जीवनाची..
का कदर नाही कोणास
माझ्या मृदू स्त्री मनाची...!!
नित्य फुलांच्या ममतेने
मी जपत आले काट्याला..
सर्वस्व अर्पण केले तरी
का उपेक्षा माझ्या वाट्याला..!!
भासले जरी मुक्त तुम्हास
बेडी अजून तीच पायात..
किती सहज बदलते नजर
का येता कळी यौवनात..!!
सावित्री, दुर्गा, शक्ती बनुन
मी व्यर्थच देव्हाऱ्यात बसते..
तुमच्या क्रूर वासनेची
का बळी मग मीच असते..!!
कैक प्रश्न दडले आहेत
अजूनही माझ्या मनात..
आज उदो उदो कराल मात्र
उद्या फिराल तुम्हीच क्षणात..!!
कसली आलीय स्त्री मुक्ती
अन् कुठे आहे महिला दिन..
कालही होते अन् आजही आहे
तुमच्या जगात महिला दीन...!!
***सुनिल पवार...✍️

|| वल्गना ||

|| वल्गना ||
=●=●=●=
बेंबिच्या देठातुन कोकलतोय पुरुष
स्त्री मुक्तीच्या मुक्त गप्पा ठोकतोय..
सरसावुन बाह्या सज्ज जो तो
पाढा तोच मी ही घोकतोय..!!

मांडतोय तिच्याच अब्रूची लक्तरे
प्रसिद्धिच्या त्याच सवंग वेशीवर..
गाठून निर्लज्ज कळस प्रतिभेचा
सजवतो शब्दफुल अभिव्यक्तीच्या सेजीवर..!!
उपभोगतोय तिला रात्रीच्या अंधारात
माझ्या मनाच्या मालकी हक्काने..
चुरगळून तीच्या भावनांची चादर
पांघरुण ओढून पहुडतो सुखाने..!!
गाजतोय तीच हुकूमत शब्दातून
फुंकरीत हळुवार सांत्वनाची शाई..
पेटवून लेखणीस देतोय उबारा
कोरीच राखून मनाची वही..!!
*****सुनिल पवार......

II नववर्षाच्या शुभेच्छा II

|| नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||
===================
सकलांस लाभो
नूतन वर्षाचा
परम हर्ष
परम हर्षाचा
प्रेमळ स्पर्श..!!

जीवनात यावी
प्रसन्न पहाट
प्रसन्न पहाटेची
सुखद वाट..!!
निरंतर लाभों
सुख आणि समृद्धी
सुखात व्हावी
समृद्ध वृद्धी..!!
***सुनिल पवार..✍🏼