Monday, 29 February 2016

|| सैल करतो गांठ ही जराशी ||

|| सैल करतो गांठ ही जराशी ||
■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■
सैल करतो गाठ ही जराशी
बांधली वेदना मी उराशी..!!
खोलले द्वार पिंजऱ्याचे..
पाखरू अडले ज़रा दाराशी..!!
बरसतो पाऊस असा अवकाळी..
अश्रुंची लगट तीच धारांशी..!!
दरवळ की गहिवर सुमनाचा
निर्माल्याची गाठ कचऱ्याशी..!!
अंधार भरून देह गाभारा
भिड़े काळीज थेट अंबराशी..!!
चितेस भार होतसे देहाचा
केली हातमिळवणी वाऱ्याशी..!!
🏼🏼🏼🏼
*****सुनिल पवार......

II पाखरू नादान II

II पाखरू नादान II
============
बंदिस्त जरी तिच्या पिंजऱ्यात
पाखरू नादान होते आनंदात..
घेऊन उरात स्वप्न उद्याचे
विहंगत होते मन अंबरात..!!

अवचित खुलले द्वार पिंजऱ्याचे
वदली ती जा उडून पाखरा..
केले रे तुज मुक्त जिवलगा
येऊ नकोस फिरून माघारा.!!
ऐकून बोल पाखरू अचंबित
ना अर्थ उरला त्या जगण्याला..
ना रुचले बोल तिचे त्याला
काय म्हणावे त्या वागण्याला..!!
नव्हता परी उपाय काहीच
पंख बळेच हवेत पसरले..
न उरले परी प्राण पंखात
पाखरू बिचारे उडणे विसरले..!!
चित्कारले वेदनेने कळवळले
द्वारात पुन्हा पुन्हा घुटमळले..
ना पाहिले पुन्हा तिने प्रेमाने
प्रातारणेने पाखरास छळले..!!
का येशी रे तू पुन्हा पुन्हा?
वदली ती जरा रागाने..
भरले मन ते तुझे कशाने?
पाखरू उत्तरले मग त्रागाने..!!
होतो मी स्वच्छंद आनंदी
कैद मजला कशास केले..
न बोल तुजला परी लावले
वाऱ्यावर मज का असे सोडले..!!
जीव जडला म्हणत खेळलीस
खेळ जरी का तुझा जाहला..
पिंजऱ्यास समजलो घर माझे
तो पिंजराच आता न माझा राहिला..!!
:
तो पिंजराच आता न माझा राहिला..!!
************सुनिल पवार.....

Wednesday, 24 February 2016

|| दुरावा ||

दुरावा..

चंद्र तो नभीचा
कलेकलेने लुप्त होतो..
दुरावा रिक्त पोकळीचा
नित्य मनास छळतो..!!

आशेच्या चांदण्यांनी
व्यर्थ आकाश उजळतो..
अवसेचा तिमीर सारा
ऊरी भरून दरवळतो..!!

काहूरांच्या थैमानात
वादळाचा जन्म होतो..
भावनांचा कल्लोळ तोच
उभ्या देहास जळतो..!!

गर्जुन क्षीण होतो
मेघ आशंकी कळवंडतो..
पाणावल्या कडांतून मग
हलकेच टिपुस गळतो..!!
--सुनिल पवार...

।। एकांत ।।

।। एकांत ।।
◆=◆=◆=◆=◆
माणसांच्या गर्दीतला,
मी एकटाच पांथस्त..
मनात विचारांच काहुर,
नसतो त्यास अंत..!!

फाटलेल्या ओंजळीत,
शोधतो निसटलेले क्षण..
गुंतत जातो अंतात,
मी आणि माझा एकांत..!!
🏼🏼🏼🏼
*****सुनिल पवार......

Monday, 22 February 2016

|| स.न.वि.वि. ||

|| स.न.वि.वि. ||
◆=◆=◆=◆=◆=◆
माय बाप सरकार,
सप्रेम नमस्कार,
विनंती विशेष..
तसं लिहण्यास काही
कारण नाही ख़ास
काही क्षण उरलेत मात्र शेष..!!

पर्याय नाही उरला काहीच
म्हणूनच टोकाचा निर्णय घेतला..
बुजगावण्याच्या ह्या वस्तीत
माणूस कुठेच नाही भेटला..!!
दयाळुपणे देणारा तो ही
सर्वस्वःच ओरबाडून घेतो..
सावकार तो सावकार
निसर्गही आतासा तसाच वागतो..!!
पसरावे तरी कोणाकडे अन कितिदा
असे दिनवाणे लाचारीचे हात..
भावनाशून्य काळोख गाभाऱ्यात
नाही उरला देव पाषाणात..!!
सोकावलाय निर्दयी काळ
झाली लेकरांची अबाळ..
चिंता भरून एकच ऊरात
पश्चात माझ्या..
कसा व्हावा त्यांचा सांभाळ..!!
शेवटची इच्छा म्हणून सांगतो
केलत तर इतकेच करा
आमचे माय बाप सरकार..
मदतीचे तुमचे पॅकेज
न व्हावे कधी निराधार..!!
न फुटावे कधी त्यास
अर्ध्या वाटेवरती पाय..
कसायाच्या हाती नाहीतर,
बाप्पा बळी जाईल गाय..!!
ज्याचा नावे मोबादला
हां त्यांचा त्यानांच मिळू दे..
माझे नाही आले कधीच,
ते अच्छे दिन..
निदान लेकराचे तरी येऊ दे..!!
🏼🏼🏼🏼
******सुनिल पवार.....

|| उत्तर ||

|| उत्तर ||
=◆=◆=◆=
तुझ्या उत्तराने सखे
मी नित्य संभ्रमात पडतो..
हे खरे का ते खरे
प्रश्न पुन्हा नव्याने पडतो..!!

शिकलीस तरी कुठे अशी
बगल द्यायची कला..
कशी संभ्रमावर झुलवतेस
माझ्या प्रश्नाचा झूला..!!
बरं जमतं ग तुला
शब्दांशी लीलया खेळायला..
अपेक्षित माझ्या उत्तराला
अनपेक्षितरित्या टाळायला..!!
तुलाही आवडतयं ना
माझं नित्य तुझ्याकडे येणे.
प्रश्न उत्तराच्या बहाण्याने
तासंतास तुझ्याशी बोलणे..!!
कळतयं मला सारं
परी वळत नाही काही..
अन संभ्रमाच्या ह्या कोड्याला
तुझ्याशिवाय उत्तर नाही..!!
आज तरी देशील का ग
माझं अपेक्षित असलेलं उत्तर..
शिंपडशील का माझ्या संभ्रमावर
तुझ्या होकाराचं अत्तर..!!
******सुनिल पवार...

|| फुलपाखरु ||

|| फुलपाखरु ||
🍁🍁🍁🍁
रंगबिरंगी फुलाफुलांतुन
उड़ते फिरते, फुलपाखरु..
नजरेत भरते, भान हरपते..!!
रंग बिखरते, फुलपाखरु..!!

सुंदर अंग लाघवी रंग
मोह होतसे पाहण्या धरु..
रूप साजिरे, दिसे गोजिरे
पंख पसरते, फुलपाखरु..!!
स्वच्छंद निरागस, निर्मळ पारस
वाऱ्यावर लहरते, भुरभुरु
धरु पाहता, हलकेच निसटते,
बोटांस रंगते, फुलपाखरु..!!
कोमल मन, चंचल चितवन
चित्त वेधते, तल्लीन लतिका तरु..
इवलेसे मन आनंदी क्षण
कवेत भरते, फुलपाखरु..!!
बहर बहरे, बहर ओसरे
स्मृतित उरते, फुलपाखरु..
येता जाता भास तयाचे
स्वप्नात वसते, फुलपाखरु..!!
🍁🐾🍁🐾🍁🐾🍁
*******सुनिल पवार.......

Thursday, 18 February 2016

|| भडिमार ||

|| भडिमार ||
=◆=◆=◆=
आज तिचा रंग ज़रा
मज वेगळा वाटला..
चुलीतला आशंकीत धुर
माझ्या मनात दाटला..!!

मी सहज म्हणालो
आज गप्प गप्प का..
चुलीतला विस्तव आज
मलुल कसा झाला..?
बघ ना घरभर
धुर भरून राहिला..!!
धीरगंभीर ती वदली
मला जे जाणवतयं
ते जाणवतयं का तुला..
करशील का सांग ना
सकारात्मक तुला..!!
मी ही आता गंभीर
काय जाणवतयं
अन कसली ग तुला..?
अस कोड्यात नको बोलू
धुरात होतय गुदमरायला..!!
दुरावा जाणवतोय रे मला
एकांत येतो मज खायला..
स्वतःशीच बोलते हल्ली
तू ही नसतोस बोलायला..!!
मी हळूच म्हणालो
चल वेडाबाई
मुलं आहेत ना बोलायला..
मग कसला एकांत
दिवस पुरत नसेल तुला..!!
दिवासाचं ठीक आहे रे
पण रात्रीच काय..?
ती ही लागलीय छळायला..
अन तू ही तसाच
कुरवाळतोस कवितेला
वेळ कुठे आहे तुला बोलायला..!!
विचार केला क्षणभर
म्हटलं केलं दूर कवितेला.
चल पेटव आता तो चुला
बोलाच्या कढीचाच
मस्त झुलवुया झूला..!!
हसली छान म्हणाली
पुरे झाली थट्टा
जेवण घेते वाढायला..
वेळ नाही मला
उगाच शब्दात खेळायला..!!
थट्टा नाही ही मित्रांनो
झुलवू नका सत्याला..
आज भडिमार माझ्यावर झाला
उद्या जाव लागेल कदाचित
सामोरं तुम्हाला..!!
😀😀😀
***सुनिल पवार.....

|| अशी आडवळणाने ||

|| अशी आडवळणाने ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
अशी आड़वळणाने ये सखे
तू ओळख जगाची खोडून ये
लावतील लोक कयास काही
तो घुंगट ज़रा ओढुन ये..!!

ढवळून जाईल आसमंत
असे रंगास रंग जोडून ये..
तू चाल ज़रा जपून सखे
ती वहिवाट ज़रा सोडून ये..!!
तू अशी का तू तशी
तर्कास उधाण घेऊन ये..
भग्न होतील किनारे अचंबित
तू लाटेवर स्वार होऊन ये..!!
ढगाळु दे वातावरण सारे
तू नवतीचा बहर होऊन ये..
उडून जाईल पाला पाचोळा
तू वादळ मनाचे लेवुन ये..!!
****सुनिल पवार......

Tuesday, 16 February 2016

|| अवकळा ||

|| अवकळा ||
=========
असा पावसाळा
जसा अवकळा
निज नाही डोळा
पाणांवल्या..!!


काय बैल पोळा
मनाचा सोहळा
दिस रोज काळा
जीवनात..!!
नेहमीच झळा
हृदयात कळा
वेदना उमाळा
काळजात..!!

नाही तुज शाळा
हतबल बाळा
ना एक निवाळा
देता आला..!!

हाकतो आंधळा
शकट पांगळा..
भूतांचाच मेळा
सरकारी..!!

मुक्तीचा हा मळा
जीवन पाचोळा
फास दिसे गळा
सावकारी..!!
****सुनिल पवार...

|| असा मी तसा मी ||

|| असा मी तसा मी ||
=◆=◆=◆=◆=◆=
असा मी तसा मी
सांग रे कसा मी..
औदर्याची खाण
पसरला पसा मी..!!


असा मी तसा मी
सांग रे कसा मी..
फुलांच्या रंगांचा
काटेरी ठसा मी..!!

असा मी तसा मी
सांग रे कसा मी..
जाणकार विश्वाचा
अनभिज्ञ जसा मी..!!

असा मी तसा मी
सांग रे कसा मी..
सवयीचा परिपाक
घेतलेला वसा मी..!!
****सुनिल पवार..

Sunday, 14 February 2016

|| व्हॅलेंटाईन डे ||

|| व्हॅलेंटाईन डे ||
=◆=◆=◆=◆=◆=
ते म्हणलं
आज व्हॅलेंटाईन हाय..
म्या म्हणलं
आता हे अन काय..??

ते म्हणलं
आर येडा का खुळा हाय..
आज प्रेमाचा दिस हाय..
म्या म्हणलं
पण उपयोग काय..
सखु घास घालत नाय..!!
ते म्हणले
आज लास्ट चांस हाय..
नायतर टाटा बाय बाय हाय..
म्या म्हणलं
करतो एक वार प्रयत्न
आता तुम्ही इतका जोर देताय..!!
तड़क गेलो सखुकडं
म्हणलं सखु
सखु आज तरी मान की
मुहरत चांगला हाय..
माझ तुझ्यावर लई प्रेम हाय
अन आज व्हॅलेंटाईन भी हाय..!!
गुलाब, टेडी, चॉकलेट
म्या काय काय दिल हाय
पण तू हायस की मानत नाय..
अगदी खर खर सांग
म्या तुला आवडतो का नाय..!!
ती म्हणली
येडा का खुळा तू
दिवस बघुन कधी
प्रेम होतय व्हय..
ते मनात रुजावं लागतय..
डोळ्यामधे सजावं लागतय
खर प्रेम अस असतयं..!!
अन..
तुझ्या प्रेमात फकस्त
माझ आकर्षण दिसतयं
त्या पाईच मला
तू लालुच दावतोय..
पण प्रेम कुणाकड़ कधी
भेटवस्तु मागत नाय
खर प्रेम बिकाऊ गड्या नाय
अन माझं तर मुळीच नाय..!!
म्या म्हणलं
सखु पटलं मला
तुझं म्हणण खरच हाय
पिरमाची भाषा
म्या कधी समजलोच नाय..!!
पुण्यांदा कधी ईचारणार नाय
फंदात डे च्या पडणार नाय..!!
पण एक बाकी सत्य हाय
माझं तुझ्यावर लई पिरेम हाय..!!
लाजली सखु म्हणली
माझं भी सेम हाय..
घरका बुद्धू अब
घरको लौट आये
क्यु की....
आज व्हॅलेंटाईन डे हायं..!!
🌹🌹🌹🌹
*****सुनिल पवार...

Friday, 12 February 2016

|| किस डे ||

II KISS डे II
========
ते म्हणले
आज कीस डे हाय..
म्या म्हणलं
पण कशाचा हाय..!!

ते म्हणले
तुला टकूरचं नाय ..
कीस म्हणजे चुंबन हाय..
म्या म्हणलं
आरं वा..
मंग तर चांदीच हाय..!!

पळत गेलो सखुकड
म्हणलं..
सखू एक कीस दे  की..
आज कीस डे हाय..
ती दात विचकून किंचाळली
म्हणली..
नाव काढायचं नाय
कीस बीस काय बी गावायाच नाय..!!

म्या म्हणलं
पण का..?
तुला आवडत नाय काय..??
ती म्हणली..
तसं काय सुदिक न्हाय..!!

पण ..
बटाटा संपला हाय
गाजर तर बाजारातच हाय
खोबऱ्याच काय सांगायच नाय..
अन काजू बदाम परवडत नाय
किसमिसच नाव सुदिक काढायच नाय..!!

एव्हढा मोठा किस पाडल्यावर
म्यां पामरानं बोलाव तरी काय..??
चढलेला तिचा पारा बघून 
गुमान घेतला काढता पाय..!!
******सुनिल पवार....

Thursday, 11 February 2016

Hug डे


II HUG डे II
��====��
ते म्हणले
आज HUG डे हाय..
म्या म्हणलं
असं बी कुठ असतं व्हय..!!

ते म्हणले
तुला काय बी कळत न्हाय..
HUG म्हणजे आलिंगन हाय..
म्या म्हणलं
असं व्हय
मंग तर लॉटरीच हाय..!!

पळत गेलो सखुकड
म्हणलं..
सखू आज HUG डे हाय..
सणसणीत हाणली म्हणली
दात पाडून हातात देन
पुन्यांदा असं बोलशील काय..!!

गाल चोळत निघालो
विचार करतोय..
असं झाल तरी काय..?
नुसतं HUG डे म्हणलं
तर ही भडकली कशा पाय..!!

तुमास्नी काय कळलं
तर सांगा की राव..
च्या मारी
पुन्यांदा न्हाही घेणार
ह्या HUG डे  नाव..!!
������������
******सुनिल पवार....

Wednesday, 10 February 2016

|| प्रॉमिस डे ||

प्रॉमिस डे
=◆=◆=◆=◆=◆=
ते म्हणले
आज प्रॉमिस डे हाय..
म्या म्हणलं
बेस हाय
पण करायचं काय..?

ते म्हणले
आज वचन द्यायच हाय
म्या म्हणलं
म्या तर कवाच दिलय
पण सखुचं काय..!!

मंग ईचार केला
ईचारायला जातय काय
गेलो सखुकडं म्हणलं
सखु एक प्रॉमिस हवयं..!!

ती म्हणली
प्रॉमिस बिमिस् मिळणार नाय
दांत घासाया राखाड़ी हाय
देवु काय..?

बोंबललं च्या मारी
फिरलो म्या माघारी..
ह्या प्रॉमिसच काय खरं नाय
अन सखुचं तर अज्याबात नाय..!!
��������������
******सुनिल पवार....

Tuesday, 9 February 2016

|| टेडी डे ||

|| टेडी डे ||
=◆=◆=◆=
ते म्हणले
आज टेडी डे हाय..
म्या म्हणलं
मंग करायचं काय..!!
ते म्हणले
आरं इचारतोस काय
तिला टेडी द्यायचा हाय..
म्या म्हणलं
आस होय पण हयो टेडी
हाय काय..?
ते म्हणले
येडा का खुळा
टेडी एक बाहुला हाय..
म्या म्हणलं
हे लई झ्याकं हाय
सखुला मस्का मारायचा हाय..!!
काढला बक्कळ पैका
अन घेतला टेडी..
सखुला दिला
लावली लाडी गोडी..!!
खुश झाली सखु
म्हणली लई बेस्ट
वाटलं पटली एकदाची
आता टाईम नको वेस्ट.!!
पण कसलं काय
अन फाटकात पाय..
साला नशीबात आपल्या
प्रेमच नाय..
पैक्यापरिस पैका गेला
सखुनं पुरता मामा केला.!!
इतकं दिस मागं लागलो..
पण समदच गेलं वाया..!!
म्या राहिलो बाजुला..अन
ती लागली टेड़ीला
मीठी माराया..!!
😀🐻😜🐻😜🐻😀
******सुनिल पवार.....

Monday, 8 February 2016

|| चॉकलेट डे ||

��सुप्रभात��
************
|| चॉकलेट डे ||
=●=●=●=●=
ते म्हणले
आज चॉकलेट डे हाय..
म्या म्हणलं
मंग करायचं काय..!!

ते म्हणले
आरss त्वांड गोड करायचं
तिला चॉकलेट द्यायचं..
म्या म्हणलं
हे भी बेस हाय
आज नक्की सखुस पटवायचं..!!

काढला पैका घेतलं चॉकलेट
सखुला म्हणलं
खा माझी बाय घासलेट..
तापली बया म्हणली
मुर्दा बसिवला तुझा
तूच खा की घासलेट..!!

जीभ फिसलली सखु घसरली
चॉकलेट समदी
खिशात वितळली..
ह्या डे च्या नादानं
चांगलीच की हो
फजीती झाली..!!
����������
***सुनिल पवार....

Sunday, 7 February 2016

|| प्रपोज डे ||

|| प्रपोज डे ||
★❤/ 💔★
ते म्हणले
आज प्रपोज़ डे हाय..
म्या म्हणलं
मंग कराच काय..!!
ते म्हणले
आरं आज तिला पटवायचं हाय..
म्या म्हणलं
आरं वा हे बेस हाय..!!
तड़क गेलो सखुकड़
अन म्हणलं
तुझ्यावर माझं लई पिरेम हाय
तुला परपोज करू काय..??
ती म्हणली
आता हे आणि काय..?
कशाचा पायपोस कशास नाय
म्हणे परपोज करू काय..
खिशात पैका हाय काय..??
हाकललं को हो तीनं
मेंदूस आल झिणझिणं..
काढता घेतला पाय तिथून
अन बंद केलं तूणतूणं..!!
😀🌹😜🌹😀🌹😜
*****सुनिल पवार...

|| हॅप्पी रोझ डे ||

Happy रोझ डे
ते म्हणले
आज रोज डे हाय
म्या म्हणलं
मग करायचं काय..!!
ते म्हणले
तिला रोज द्यायचा..
म्या म्हणलं
रोजगारातला रोज दिला
मांग म्या गार व्हायच काय..!!
ते म्हणले
आरं येड़ा का खुळा
रोज म्हंजी गुलाब द्यायचा
अन प्रेम करायचं हाय..
म्या म्हणलं
असं होय देतो की त्यात काय
मले भी सखुला पटवाचे हाय..!!
काढला पैका घेतला गुलाब
सखुला म्हणलं
तुझ्या साठी आणला हाय..
सखु म्हणली
थोबाड़ बघ आईन्यात
एका गुलाबात म्या गावणार नाय..!!
काळीज की हो फाटलं
काटंच बोटात रुतलं
मलम पट्टीस येगळ पैकं गेलं
समदं मुसळ क़ेरात गेलं..!!
******सुनिल पवार....

Thursday, 4 February 2016

|| मन माझे सांगत असते ||

|| मन माझे सांगत असते ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
हल्ली वर्षाचे 12 महीने
मला भुई भेगाळलेली दिसते..
मनाच्या पावसाने कळेना
कुठे दड़ी मारलेली असते..!!


गुलाब कोणा दिसत नाही
काट्यांचे तेच टोचणे असते..
कुंपणावरच्या निवडूंगाचे
कुंपणावरती सजणे असते..!!

संवेदनशीलता लुप्त कुठे
वेदनाच साली उठून दिसते..
जखम असते तीच मामूली
पट्टी सुबक चिकटुन बसते..!!

निर्रथक भासतात वाद सारे
चर्चा मात्र रंगत असते..
अढी असावी तीच मनाची
मन माझे सांगत असते..!!
🏼🏼🏼🏼
*****सुनिल पवार...

Wednesday, 3 February 2016

|| भिजल्या मातीचा गोळा ||

|| भिजल्या मातीचा गोळा ||
=●=●=●=●=●=●=●=●=
घाळंगतात कैक दगड गोटे
त्या विशाल नदीच्या प्रवाहात..
नवी लकाकी तयांस मिळता
किनाऱ्यास ते येऊन मिळतात..!!

गारगोटी ती यत्किंचितशी
ठिणगी तिच्याही अंतरात असते..
चेतवु नका हो हिणवून कोणी
जगास तीही जाळु शकते..!!
काळा कोळसा तो खाणीतला
रंग ना कुठे रूप त्याला..
पहाल जर का अंतरी त्याच्या
हीरा तेजस्वी तिथेच जन्माला..!!
असाच असतो माणूस एकला
भिजल्या मातीचा एक गोळा..
द्यावा तयास आकार सुसंगत
उघडून आपल्या मनाचा डोळा..!!
****सुनिल पवार....

Tuesday, 2 February 2016

|| शरवेधी कटाक्षात ||

|| शरवेधी कटाक्षात ||
=◆=◆=◆=◆=◆=
पाहताच तुज सखे
मन क्षणात हरले
नयनांच्या पाकळ्यांनी
चित्त हळूच चोरले..!!


नजरेची जादू अशी
मन गुंतले अक्षात..
मन घायाळ साक्षात
शरवेधी कटाक्षात..!!

कुंतलांच्या वळणात
मन फिरून गुंतते..
घनभोर बटांतुन
कोण अत्तर शिंपते..!!

कामनिय बांध्यावर
मन निश्चल हे उभे
नयन पाटलावर
रेखाटले मनसूबे..!!

तुज सामोरी पाहता
मन पाकळी फुलली
एक झुळुक वाऱ्याची
हिंडोळ्यावर झुलली..!!

तू मोहक हसताच
मन मोती बरसलें
नवस्वप्नांच्या संगमी
मिलन अनोखे झाले..!!
*****सुनिल पवार...

Monday, 1 February 2016

|| मी बळी रोषाला ||

|| मी बळी रोषाला ||
=●=●=●=●=●=●=
पायघड्या येथे वरवेषाला..
मी राहिलो मागे कशाला..!!
दाविती ते छबी दुनयेला..
काय काम उरले आरशाला..!!
निजलीय सचोटी बिनघोर..
कशास बाळगु स्वप्न उशाला..!!
अंधार भरून बंद गाभारा..
झापडे रोकती कवडशाला..!!
नग्न फेसाळते मधुशाला..
मोताज तो गरीब विषाला..!!
ठेवला तसाच अंधविश्वास..
लागला सुरुंग अंदेशाला..!!
ते बोलघेवड़े ठेकेदार..
मी मूक जरी बळी रोषाला..!!
*****सुनिल पवार.....

|| ती ||

|| ती ||
=●=●=
किती काळ फिरणार ती अशी
मृत थडगी छाताडावर घेऊन..
लुचू लागलेली हव्यासी बांडगुळे
तिच्या अस्तित्वावर घाला घालत
निघालीत तीज बुडवायला..!!


नष्ट करू लागलेत ते निर्दयी
तिच्या पोटच्या गोळ्याला
त्या गोंडस हरित वस्तीला..
अन घालू लागले जन्मास
अनामिक अनौरस अपत्ये
रंग रांगोटीचा चढवून मुलामा
लागलेत नव्याने सजवायला..!!

संहारु लागलेत समस्त कुळास
तिच्या नाद मधुर झंकारास
स्वःअस्तित्व जपण्याच्या
त्या भ्रामक कल्पनात
कळणार तरी कधी त्यांस
न उरणार काहीच
त्या भग्न अवशेषात
अन नसणार तो ही
स्वतःच नवथडगं घडवायला..!!
****सुनिल पवार....

|| किनारे ||

|| किनारे ||
=◆=◆=◆=
स्पर्शिता ती लाट हळुवार
सखे तुझीच आठवण येते..
तुझे येणेअगदी तसेच होते
अन हेलावले किनारे होते..!!

तो आवेग तुझा जीवघेणा
घुसमटले जणू श्वास होते..
ओहटीस निघाली तू अन
पाणावले किनारे होते..!!
फितूर झाली वाऱ्यास अशी
बदलले क्षणात प्रवाह होते..
खचलेल्या मनाच्या वाळुत
उध्वस्त तेच किनारे होते..!!
★★🙏शुभरात्री🙏★★
*****सुनिल पवार.....

|| नेते आले ||

|| नेते आले ||
=●=●=●=●=
विकासाचे सुटले वारे
कोरडेच परी ते पावसाळे..
वल्गनेचे पिक घेऊन
नेते आले नेते आले..!!

जातीयतेचं रुजलं बियाणं
ख़तपाणी ते घालतं गेले..
आरक्षणाचं गाजर गोजिरे
पुंगी ते वाजवत गेले..!!
एकच नारा गरीबी हटाव
स्वप्ने मनात रुजवत गेले..
श्रीमंतांचेच चोचले सारे
गरीबास ते हटवत गेले..!!
भूमीपुत्र तो गरीब बिचारा
गळा त्याचा घोटत चालले..
भुखंडाचे गोड श्रीखंड
आपआपसात ते वाटत गेले..!!
भ्रष्टाचारी दूकान फायद्याचे
जागोजागी थाटत गेले..
समाज सेवेचे नाम मुख़ात
देशास ते लूटत गेले..!!
●●●●●●●●●●●
****सुनिल पवार.....