बालकाव्य
|| स्वागत तुमचे गणपती देवा ||
===================
स्वागत तुमचे गणपती देवा
घ्या बाप्पा घडीभर पाटावर विसावा।
मखमली कोचवर आरामात बसा
प्रवास करून आला असेल थकवा।
वर्षाने तुम्ही आम्हाकडे आलात
सांगा! स्वर्गाची काय खबरबात?
मोदक तुम्हा बहु आवडतात
मग दुकाने त्याची आहेत का स्वर्गात?
पूजा करिता आशीर्वाद देता
मनोरथ आमचे पूर्ण करता।
सर्वच तुम्ही आम्हा देऊन जाता
मग आईला उत्तर काय हो देता?
तुम्ही येता अन् चैतन्य फुलवता
हर्ष उल्हासात आम्हा रमवता।
दुखः सकलांचे तुम्हीच हरता
जादू ही तुम्ही कशी काय करता?
अखंड आम्हा लळा लावता
अकरा दिवसानी निरोप घेता।
आई म्हणते तुम्ही आकाश मार्गे येता
मग पाण्याच्या मार्गे कसे काय जाता?
--सुनिल पवार..✍️