Thursday, 26 January 2017

|| सॉफ्ट कॉर्नर ||

💝तिच्यातील ती💝
|| सॉफ्ट कॉर्नर ||
===========
आज
सहज म्हणाली ती मला
तुझ्या मनात "ती"च्याबद्दल
अजूनही
सॉफ्ट कॉर्नर आहे ना..?
बघ ना
तुझ्या प्रत्येक शब्दातून
तेच जाणवतेय मला..?

मी हसलो म्हणालो
हो आहे ना
आतून सॉफ्ट
पण बाहेरून हार्ड
म्हणूनच
टोचतोय ना तुला..?
बघ ना
तुझ्या कृतीतून
तेच व्यक्त होतंय
क्षणा क्षणाला..!!
ती ही हसली
म्हणाली
खरं सांगू
टोचत नाही रे
गुदगुल्या होतात..
कारण
माझ्यापेक्षा
तो अधिक छळतोय तुला
म्हणूनच
दिसून येतोय अट्टाहास
उजेडात आणण्याचा
"तिच्यातील ती" ला..!!
मी हसलो पुन्हा
उत्तरलो
तसं सांगता येणार नाही
कदाचित
असेल ही नसेल ही
पण तू ओळखतेस चांगलीच
"ती"ला
हे माहीत आहे मला..
तरी ही
उलघडू पाहतो मी
तुझ्याच समोर
नित्य नव्याने
"तिच्यातील ती" ला..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| भाषणबाजी ||

|| भाषणबाजी ||
==========
ते म्हणाले
विकासाला मत द्या
मी म्हणालो
आधी उभा तरी करा..!!

ते म्हणाले
चला भ्रष्टाचार मिटवूया
मी म्हणालो
शिष्टाचार घोषित करा..?
ते म्हणाले
आमचा नारा गरिबी हटाव
मी म्हणालो
झोपडी पेटवून सुरवात करा..!!
ते म्हणाले
शिकेल त्याला शिक्षण देऊ
मी म्हणालो
आधी लेक्चर बंद करा..!!
ते म्हणाले
चला आत्महत्या रोकू या
मी म्हणालो
फांद्या छाटून सावली धरा..!!
ते म्हणाले
आमच्या पार्टीस विजयी करा
मी म्हणालो
मतदारास तुम्ही गृहीत धरा..!!
****सुनिल पवार....✍🏽

|| उंबर ||

|
उंबर..
तो आंबेमोहर हसतो उंबराला
ना बहर, ना दरवळ
नुसती फुकटची वळवळ
काय अर्थ उरतो
तुझ्या बारमाही फळाला
खोऱ्याने घातलेल्या रतीबाला
ना विचारत कोणी त्याला
नुसती निरर्थक भर कचऱ्याला..!!
हसला उंबर उत्तराला
जरी रसाळ तू
तरी बहर तुझा औटघटकेचा
ओसरता बहर कोण पुसतो तुला
मी फुलतो झुलतो
काट्याकुट्यात पाषाणात
अन् तुझं अस्तित्व केवळ कुंपणात
तुझी हयात जाते
एका केवळ विशिष्ट वर्गास खुश करण्यात
अन् मी रमतो खुशाल
पाखरांच्या गाण्यात अंतरातल्या वंचितांत
इतकेच नव्हे तर
दुर्लक्षित निशाचर
त्या वटवाघूळाचेही उदर भरण्यात..!!
--सुनिल पवार...✍️

Thursday, 19 January 2017

|| अकल्पित ||

|| अकल्पित ||
=========
अचेत कलेवर ते
दगडास फोडते पाझर..
अनुभूती ही क्षणाची
कोरून घेतो मनावर..?

गुंतलेल्या पाशात किती
माणुसकी घुसमटलेली..
सोपस्काराच्या सोहळ्यात
तितकीच सैल सुटलेली..!!
बेदखल क्षणचित्रे सारी
काळोखात जतन केलेली..
भारावलो मी पाहून
नव्या प्रदर्शनात रंगलेली..!!
हरलेल्या जीवनाचे कसे
हार सत्कार,उपहार झाले..
मिटलेल्या डोळ्यांनी असे
मानवी चमत्कार पाहिले..!!
लपेटून घेताच ज्वाळा
तेजपुंज देह झाला..
जोडून हात भावे
जगण्याचा उहापोह केला..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| घडी ||

🌺तिच्यातली ती🌺
=============
|| घडी ||
=●=●=
घडी करत होतो
चादरींची
तशी नेहमीच करतो..
उशिरा उठणारा मी
न करून कुणास सांगतो..!!

इतके दिवस नव्हतं
पण
आज तिचं लक्ष गेलं
म्हणाली,
छान मारतो तू घडी..
अशी
मलाही जमणार नाही
अगदी तंतोतंत
नाही कुठेच वेडीवाकडी..!!
मी हसलो म्हणालो,
अगं
यत्किंचीतशी ही चादर आहे
त्यास
विशेष मी म्हणणार नाही..
खरी कलाकार तूच आहेस
कारण
तू बसवलेल्या घडीचे अनुकरण
प्रत्यक्ष
ब्रह्मदेवालाही जमणार नाही..!!
*****सुनिल पवार....✍🏽

|| किनारा ||

|| किनारा ||
========
दूरवर कुठेतरी
दिसतो
आशेचा किनारा
अधिक जवळ आलेला
काठा काठावरून चालताना..!!

वाटते
भेट नक्की घडेल तिथे
अन
समज गैरसमाजाची
भिंत गळून पडेल
काठा काठावरून चालताना..!!
भ्रमच असतो परी
सांगायचं कुणाला.?
मी पणाच्या धुक्यात
नकळत
हरवतो किनारा
काठा काठावरून चालताना..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| निमित्त ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| निमित्त ||
=======
ठाऊक असते
तिलाही
न जमणार त्याला कधी
साधा
गजरा आणायला..
पण
निमित्त हवे असते काही
लटका अबोला धरायला..
अन
त्याला बोलते करायला..!!

हे कळते त्यालाही
म्हणूनच,
तो गोंजारतो हळुवार तिला
अन
तिच्या लटक्या रागाला..
कदाचित
दाखवायचं असतं त्यालाही
बघ.
काळीज आहे ग,
ह्या कागदी वाघाला..!!
तिने
बांधून घेतलंय त्याच्या
चौकटीला..
अन त्याने नोकरीच्या
दावणीला..
मग दोष तरी द्यावा कोणाला..
आणि कशाला..?
तरीही ती
आवर्जून वाढते त्याला
अशाच
गोड शब्दांचे पक्वान्न
प्रत्येक सणाला..
त्याला बोलते करायला..??
****सुनिल पवार....