Monday, 3 June 2019

उष्टी फळे..

उष्टी फळे..

आसवांनी सिंचलेलं,
विवंचनाच्या फवारणीने
तरारून आलेला
माझ्या हास्याचा वेलू
बघता बघता गगनावर चढला
अन् पाहून त्याला
जो तो भुलू लागला..!!

गर्द हिरव्या पानांचा
रंगबिरंगी मोहक असा
दिखाव्याच्या फुलांनी
सजलेला तो वेलू
बघता बघता फळांनी डवरला
अन् पाणी सुटले
ज्याच्या त्याच्या तोंडाला..!!

दिसायला गोंडस
परंतु कारल्याला लाजवणारी
त्याची फळं
काजऱ्याचेही बाप असावे की काय
अशी शंका शिवतेय माझ्या मनाला..!!

पाहणाऱ्याच्या मनात
असूया उत्पन्न करतेय हे फळ
पण मी चाखलेली
ही दुःखाची उष्टी फळे
देऊ तरी कशी आणि कोणत्या रामाला
हा प्रश्न भेडसावतोय आता
माझ्या भाबड्या मनाला..!!
--सुनिल पवार...✍️
Image may contain: text


No comments:

Post a Comment