Tuesday, 4 June 2019

पैलू...

पैलू...
मी पाहिले की 
एका हसऱ्या फुलाभोवती
रंगीत फुलपाखरू घिरट्या मारत होते
रंगबिरंगी हे नाते त्यांचे
डोळ्यास सुखावत होते..!!
मी हे सुद्धा पाहिले की 
एका हसऱ्या फुलाभोवती
काळ्या भुंग्याचे गुंजराव सुरू होते
मात्र हे विरोधाभासी नाते
न जाणे काय म्हणत होते
तरीही ते डोळ्यात सलत होते..!!
मी पाहिले की 
त्या फुलावरचे मधूकण वेचून
फुलपाखरू सहज उडून गेले
बोटावर रंग सोडून जाणाऱ्या त्या फुलपाखराने
असे कोणतेच रंग तिथे सोडले नव्हते..!!
मी हे सुद्धा पाहिले की 
मधूकण टिपण्याचा नादात
भुंग्याने स्वतःस हरवले होते
मिटलेल्या त्या फुलांच्या पाकळीत
त्याचे प्राण घुसमटून गेले होते..!!
अंततः मी पाहिले अन् जाणलेही की 
नात्याचे पैलू त्यांनी कृतीतून दाखवलेले
चमकणाऱ्या तारे गळून अश्म झाले होते
अन् वाटेवरच्या त्याच अश्माचे
नकळत देवात रूपांतर झाले होते..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment