Tuesday, 29 January 2019

सुख...

सुख...
ऐकण्यात आलंय
ते एका फांदीवर टिकत नाही..
लोक म्हणतात
ते सहजा सहजी दिसत नाही..
म्हणूनच निघालो सुख शोधायला
कसे दिसत असेल हे पाहायला..!!
सुरू करताच प्रवास
मला दिसला
भेकेने व्याकुळ झालेला
एक उघडा बोडखा छोटा मुलगा
रडता रडता
पाहू लागला निरखून आकाश
अन् पिंजलेल्या ढगांतून
चित्र विचित्र विविध आकार
हसवू लागले त्यास..!!
काही क्षणात
ढग विरून गेले
भुकेने लेकरू रडू लागले
तिथून उठले, झाडाखाली बसले
इतक्यात एक फळ वरून पडले
आता भूक मिटली लेकराची
अन् ते खुदूखुदू हसले..!!
इथेच संपला माझा प्रवास
मी फिरलो पुन्हा माघारी
दाखवून दिले मज त्या लेकराने
मी उगाच भटकतोय दारोदारी
खरे तर
सुख असते आपल्याच शेजारी..!!
***सुनिल पवार...✍️

सुख...
लोकं बोलतात
ते एका फांदीवर टिकत नाही..
ऐकण्यात आलंय
ते सहजा सहजी दिसत नाही..
म्हणूनच निघालो "सुख" शोधायला
ते कसे दिसत असेल हे पाहायला..!!
सुरू केला प्रवास अन् मी पाहिले
भेकेने व्याकुळ झालेला
एक उघडा बोडका छोटा मुलगा
रडता रडता
निरखून पाहू लागला आकाश
अन् पिंजलेल्या ढगांतून
चित्र विचित्र विविध आकार
हसवू लागले त्यास
तो विसरला भूक आणि रमला त्यात..!!
काही क्षणात ढग विरून गेले
लेकरू भुकेने पुन्हा रडू लागले
तिथून उठले, झाडाखाली बसले
इतक्यात एक फळ वरून पडले
अन् लेकरू खुदूखुदू हसले..!!
आता भूक मिटली त्याची
आणि माझा प्रवासही संपला
मी फिरलो पुन्हा माघारी
मज दाखवून दिले त्या लेकराने
की मी उगाच भटकतोय दारोदारी
खरे तर
सुख असते आपल्याच शेजारी..!!
--सुनिल पवार..✍️

ही अक्षरे..

ही अक्षरे..
कधी तरल मोरपीस फिरवतात
कधी शस्त्र सज्ज होतात..
लोक म्हणतात
की अक्षरे साक्षर करतात
पण अक्षरे अहंकारही पेरतात..!!
ही अक्षरे
विस्तव असतात जणू
कोलीत केले की
सहज आग लावत सुटतात..
अक्षरे
करावी परिवर्तीत पाण्यात
मग अक्षरे ही जीवन देतात..!!
ही अक्षरे
ताईत बनावी गळ्यातला
सूर जसा की गाण्यातला..
अक्षरांनी अमृत व्हावे
लेखणीतून अमर राहावे..!!
***सुनिल पवार...✍️

तुला रोज जरी पाहिले...

तुला रोज जरी पाहिले...

तुला रोज जरी पाहिले
तरी हे मन भरत नाही..
तू निघून जाता अवचित
अवस सरता सरत नाही..!!
तुझ्या लपंडावाच्या खेळात
राज्य नेहमी माझ्यावर येते..
तुला शोधता शोधता चंद्रा
रात्रभर मनाचे जागर होते..!!
तू होता लुप्त कलेकलेने
माझे मुश्किल जगणे होते..
वारा बोचत राहतो मनास
अन् दवबिंदूंचे ओघळणे येते..!!
पुरे झाला हा लपंडाव
किती देशील तू असा त्रास..
माझ्या मनाची पौर्णिमा
आता तरी येऊ दे उदयास..!!
***सुनिल पवार...✍️

ह्या क्षणी...

ह्या क्षणी....
ह्या क्षणी
मी निशब्द केवळ..
अंतरी दबलेले
भावनांचे वादळ..!!
मी दूर भला
तू येऊ नको जवळ..
खपली अजून ओली
होईल गं चिघळ..!!
बोलू नकोस काही
उगाच अघळपघळ..
तथ्य नाही त्यात
थांबावं तुझा छळ..!!
ह्या क्षणी आहे
रीती माझी ओंजळ..
उगा नको ढाळू
त्यात नक्राश्रूंचे जळ..!!
***सुनिल पवार....✍️

ए..ऐक ना...

ए..ऐक ना...😀
ए, ऐक ना,
मी जेव्हा जेव्हा तुला फोन करतो
तेव्हा तेव्हा तो व्यस्त असतो
कधी कधी रिंग वाजते
पण उचलण्याआधीच कट होतो
चुकून उचलला गेला कधी
की लगेच कामाचा दुसरा कॉल येतो
मग कधीतरी एखादा
सारवासारव करायला
वाहून गेलं पाणी भरायला
तुझा आगंतुक कॉल येतो
मला वाटते आतातरी असशील निवांत
पण त्यातही पुन्हा काम निघते
आणि फोन कट होतो
ए..ऐक ना
इतका तर मी वेडा नाही
मला कळतो तुझा बहाणा
त्यातील फोलपणा
आणि रोजचाच तोच तोचपणा..!!
***सुनिल पवार...✍️

आज सकाळी....

आज सकाळी (बाल कविता)
==================
आज सकाळी
गारठला वारा..
धावे सैरावैरा
मिळे ना थारा..!!
आज सकाळी
सूर्य उगवला..
आईने धरला
कपाळी लावला..!!
आज सकाळी
ऊन पडले..
माणसांचे त्यावर
जीव जडले..!!
आज सकाळी
झाडेफुलें भिजली..
दवाने त्यांना
अंघोळ घातली..!!
आज सकाळी
मन प्रसन्न झाले..
दप्तर घेऊन
शाळेकडे निघाले..!!
**सुनिल पवार...✍️

वेदना...

वेदना...
तुझं आपलं बरं आहे
तू सहज बोलून मोकळी होते..
पण तुला कळत नाही
शब्दातूनही मन छळत असते..!!
तुला वाटत असेल असंही
की माझ्या मुखी शंका बरळते..
पण तुला दिसत नाही
डोळ्यात कसे पाणी तरळते..!!
तुला नसते भान कशाचे
तू तुझ्या विश्वात रमलेली दिसते..
पण तुला उमगत नाही
माझ्या विश्वात तूच वसलेली असते..!!
रोज माझे आभाळ फाटते
चिंब झाले मन लेखणीतून उतरते..
पण तू समजून घेणार नाहीस
कारण, माझी वेदना तुला कविता वाटते..!!
***सुनिल पवार...✍️