Saturday, 13 May 2017

|| डाग ||

|| डाग ||
=======
धुणे
अगदी सुलभ झाल्याने
लोकांना हल्ली,
डागाचं
सोयरं सुतक वाटत नाही..
अन डाग धुता धुता
आता
कपडा मुळीच फाटत नाही..!!

मला
नवल वाटते त्यांचे
ते सहज म्हणतात
डाग चांगले असतात..
पण
कळत नाही का..?
माझ्या मनाला ते पटत नाही..
काळे,मालिन असणारे हे डाग
खरंच का हो
इतके चांगले असतात..??
****सुनिल पवार...✍🏽

|| चंद्र ||

|| चंद्र ||
=====
जेव्हा
अंतराळातील आगडोंब
शिथिल करण्या
तिने
कोंड्या मांड्याचा
चंद्र
थापायला घेतला
तेव्हा
मलूल पडल्या चांदण्यांचा
चेहरा
आशेच्या प्रकाशात
लख्ख
उजळून निघाला..!!

तिने
लीलया थापला
सुंदर चंद्र
स्वः सामर्थ्याने
अवघा आसमंत पेलत..
चटक्यांचे
खाच खळगे
हसत
हातावर झेलत..
तिला काळजी
अवघ्या नभोमंडळाची
हे डोळ्यात तिच्या
होते दिसत..!!
तिने
रंगविला
खेळ कलेकलेचा
अर्ध चंद्र
चतकोर
प्रत्येक हातावर टेकवला..
नाही
स्वतःसाठी
किंचितसा राखला..
शांत झाला
आगडोंब सारा
प्रत्येक तारा
दिलखुलास टिमटीमला..
अन
तिच्या रित्या
रित्या ताटातील
प्रतिबिंबित चंद्र
समाधानाने हसला..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| हायकू सकाळ ||

|| हायकू सकाळ ||
============
पळस लाल
पेटलेला अंगार
छाया आधार..!!

वाटेत उभा
फुलवीत रंगारा..
दग्ध पांगेरा..!!
गुलमोहर तो
प्रतिसुर्य भासतो
सावली देतो..!!
उन्ह कोवळी
तया सोनझळाळी
अंगास जाळी..!!
मंद वारा
मिश्किल निलाजरा
अंगात धारा..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| त्याच्यासारखा तो ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| त्याच्यासारखा तो ||
=============
त्याच्या
स्वछंद वागण्यावर
तिचा नेहमीच
आक्षेप असतो
खरं सांगायचं तर
माझाही
त्यास नकार नसतो
ती म्हणते
नाही लगाम कुठलाच
त्याच्या
वेळे अवेळी
बरसण्यावर..
अन तू ही
तसाच
त्याच्याच वळणावर..!!

त्याला
कळत नाही काळ वेळ
आणि
नसते कशाचेच भान..
त्याने जाणलंय कधी
कुणाचे मन..
अन तू ही तसाच
अनभिज्ञ
बेचैन करतो मज
क्षणो क्षण..!!
कधी कधी
असंही म्हणते ती
कैक हिरवी स्वप्न
तो क्षणात धाराशाही करतो..
हासरं फुल
मातीमोल करतो..
अगदी तू ही
तसाच वागतो
स्वप्न रुजवत येतो
आणि
काळीज उसवत जातो..!!
मी मान्य करतो
सारं
नाकारण्याचा प्रश्नच नसतो..
केवळ इतकंच तिला
म्हणतो,
तुला वेग दिसतो
पण
त्यामागे खरा
प्रेमावेग दडलेला असतो.?
बघ ना तो दगड
अन त्यावरचं ते हिरवं तृण
हे त्याचंच तर प्रेम आहे
आता मला सांग
ही अशक्यप्राय गोष्ट
त्याच्याशिवाय
कोण करू शकतो..??
***सुनिल पवार...✍🏽😊

Thursday, 4 May 2017

|| साफल्य ||

|| साफल्य ||
=========
मंद गंधळणाऱ्या
गंधप्रिया
सुमनांच्या जीवनाचे
हेच का
साफल्य म्हणायचे..?

कधी कुणी
डोक्यावर मिरवायचे..
तर कधी
कुणा मूर्तीच्या
चरणी बसायचे..
कुणाच्या पायाची
पायघडी व्हायचे..
तर कधी कुण्या
मढयावर सजायचे..
अंततः
निर्माल्य लेवून
कुजून जायचे..!!
सुमनांच्या जीवनाचे
हेच का
साफल्य म्हणायचे..??
***सुनिल पवार....✍🏽🌷

|| कानाडोळा ||

कानाडोळा..

शेवटी न राहवून
मी
गेलो डॉक्टरकडे
विचारले,
डॉक्टर
एक सांगाल काय..?
आत्मप्रौढीच्या रोगावर
रामबाण उपाय काय..?
हसला डॉक्टर
म्हणाला
म्हणशील तर आहे
म्हणशील तर नाही
मी पडलो कोड्यात
विचारता झालो
म्हणजे .?
मी समजलो नाही
हसला डॉक्टर पुन्हा
म्हणाला,
अरे
कानाडोळा
दुसरं काय..!!

तरीही मी तसाच
गोंधळलेला
न समजून
दुसरा प्रश्न केला
विचारले,
मग
आत्मक्लेशाचे काय..?
त्याला काही
तरणोपाय..?
तो तसाच हसला पुन्हा
म्हणाला
अरे
कानाडोळा
दुसरं काय..!!
***सुनिल पवार...✍🏽😜

कधी बदलणार..??


कधी बदलणार..??
अजूनही
विषमतेच्या कुंचल्यातून अज्ञान रेखाटतयं
काळ्या रंगातील भयावह वहिवाटी चित्र..
नाकारून वातीचं अस्तित्व
अट्टाहासे पेटवू पाहतेय दीपक
हे दृश्य तितकेच भयंकर आणि विचित्र..!!
जोमात होतोय लिलाव
अंधारावर साकारलेल्या त्या काळ्या कलुषित चित्राचा
अन होड खरीदारांची दिसून येतेय भ्रमिष्ट सर्वत्र..
पण प्रश्न हा आहे
भविष्याच्या कसोटीवर ते किती काळ टिकणार
का काळाच्या ओघात सर्वचं नामशेष होणार
हे चित्र आत्मघाती तितकेच फसवे आणि विचित्र..!!
वलग्नेंच्या उत्साही बाजारात
कुठे दिसतोय खरा स्त्री पुरुष समानतेचा रंग
वरवरचा मुलामा मनावर चढवलेला नाममात्र..
न जाणे कधी बदलणार हे काळे चित्र..
अन कधी थांबणार आहे
स्त्री भ्रूण हत्येचं हे भयानक सत्र..!!
***सुनिल पवार...✍️