Showing posts with label अष्टाक्षरी. Show all posts
Showing posts with label अष्टाक्षरी. Show all posts

Saturday, 10 August 2019

आला पाऊस...

आला पाऊस...
आला पाऊस पाऊस
झाले रान ओलेचिंब..
दिसे पाण्यात पाण्यात
माणसाचे प्रतिबिंब..!!
झाला गढुळ गढुळ
गेला नदीच्या वाटेनं..
सागराच्या सरितेला
केले मलिन मलिन..!!
जिरे भूमीत भूमीत
तृप्त केले तिचे मन..
कोंब हिरवा फुटला
झाला आनंदाचा क्षण..!!
पडे मलयी मलयी
किती मनोहर लय..
खळखळती ओहोळ
होती क्षणात प्रलय..!!
असा पाऊस पाऊस
संगे वाऱ्याची लहर..
वाहे डोळ्यातून पाणी
सुख दुःखाची ती सर..!!
--सुनिल पवार...✍️

पाऊस सरून जातो..

पाऊस..

हिरवळ ही झाडांची
भूल पाडते डोळ्यांना..
पावसाचे भिजवणे
खुलवते गं कळ्यांना..!!

सळसळ ही पानांची
नाचवते मयूराला..
स्वप्न हिरवं पडतं
फुलवीत पिसाऱ्याला..!!

वेड्या चातकाची तृष्णा
थेंबभर पाण्यासाठी..
मेघ मल्हार गातसे
वर्षा राणी येण्यासाठी..!!

गंध श्वासात भरून
वारा वेडापिसा होतो..
वेल बिलगे झाडाला
देह एकरूप होतो..!!

ऋतू पावसाचा वेडा
मनी तळे साठवतो..
पाऊस सरून जाता
हृदयात झिरपतो..!!
--सुनिल पवार..✍️

Monday, 31 August 2015

|| माझ्या कोकणाची भूमी ||

अष्टाक्षरी
|| माझ्या कोकणाची भूमी ||
===============
माझ्या कोकणाची भूमी
दिसे सुंदर देखणी..
शालू हिरवा लेवुनी
नटे उल्हासे श्रावणी..!!


ओली वाट वळणाची
शुभ्र झऱ्यांचीच गाणी
धाव घेती नदीकडे
जसे भेटण्या साजणी..!!

भातरोपे चहुकडे
गालिच्याची अंथरणी..
वेेेल झूले बांधावर 
साजे काशिद्याची लेणी..!!

रानफुले बहरली
फेड़ी डोळ्यांची पारणी..
वारा घोंगावे कानात
सांगे पाखरांची वाणी..!!

किती वर्णावी महती
एक अनोखी पर्वणी
दिसे लाखात उठून
माझी कोकणाची राणी..!!
******सुनिल पवार.....

Tuesday, 18 August 2015

||| ध्यास घरट्याचा ||

||| ध्यास घरट्याचा ||
============
काडी काडी केली गोळा

तरी लागे नेत्री झळा..
एक ध्यास घरट्याचा
झाला पाला रे पाचोळा..!!

 

होता झूलत नभात
उंच स्वप्नांचा झोपाळा..
आला कुठूनसा वारा
मना उडवून गेला..!!

 

भेटण्यास सागराला
आले उधाण मनाला..
मार्ग खाच खळग्यांचा
नाही तमा सरितेला..!!

 

ओढ होती का रामाला
धाडे वनात सीतेला..
जग अग्निकुंड सारे
अंत नसे त्या शिक्षेला..!!

 

काय म्हणू नियतीला
कसा घातला रे घाला..
स्वप्न ईमला गोजीरा
तिने मातीमोल केला..!!

क्रमशः 

--सुनिल पवार..✍️