Friday, 23 February 2018

|| किनारे ||

|| किनारे ||
=◆=◆=◆=
स्पर्श होता अलवार
शहारतात किनारे..
उचंबळतात लाटा
नादावतात किनारे..!!
आवेगात जीवघेण्या
भांबावतात किनारे..
ओहटीस जाते लाट
ओलावतात किनारे..!!
पाऊलखुणा प्रीतीच्या
सांभाळतात किनारे..
वाळू फितूर सागरा
धुंडाळतात किनारे..!!
जातो सरून आवेग
ध्वस्त होतात किनारे..
भेगाळतात जखमा
आक्रंदतात किनारे..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| प्रेम ||

|| प्रेम ||
तसं पाहायला गेलं तर
त्याने
निरपेक्षतेचा हात पकडून
येणे अपेक्षित असते..
पण ते येते
अमर्याद अपेक्षांचं ओझे घेऊन
अन् कळतही नाही
केव्हा आपल्याच अवास्तव ओझ्याखाली
ते दबून जाते..!!
आकाशाला गवसणी घालण्याच्या
त्याच्या क्षमतेचे समीकरण
कधी चंद्र,तारे तोडण्यापालिकडे गेले नाही..
अन् तुटलेल्या चंद्रतारकांच्या रुदनाने
काळवंडललेल्या आकाशी,
पोकळ वलग्नेचे क्षितिज,
कुठेही रंगलेले दिसले नाही..!!
छाताडावरील माती उकरण्या पलीकडे
त्याने आजवर काही केलेले दिसतही नाही..
आरोप प्रत्यारोपाच्या निरर्थक फैरीत
छिन्न विच्छिन्न देहाची लक्तरे
आक्रोश करत राहतात पहुडलेल्या थडग्यात
अन् मग मेणबत्त्या जाळून
निव्वळ थडगे सुशोभित करण्यास
काही अर्थही उरत नाही..!!
मी म्हणतो
गुण गायला हरकत नाही
नव्हे तर,
ते प्रत्येकाने गायला हवेत
मात्र
दृष्टिकोणाच्या समृद्ध बाहूंनी पेलवेल इतकेच,
आकाश कवेत घ्यायला हवे
कारण
दृष्टिकोनाशिवाय निरर्थक ठरते
प्रत्येक पैलूंची उठाठेवी करणी..
एका दिवसाच्या जुजबी रंगरांगोटीने
कितीसे तगणार घर?
त्यासाठी हवी
एक मजबूत सामंज्यस पायाभरणी..!!
--सुनिल पवार...✍

Saturday, 10 February 2018

|| हे जीवना ||

|| हे जीवना ||
========
हे जीवना,
तू घेऊन बघ अनुभूती
कधीतरी
या विस्कळीत जीवनाची..
कदाचित
तुलाही येईल जाण
नित्य भासणाऱ्या या विवंचनांची..!!
कधीतरी सहज भेटून
घे गळाभेट
आतुरलेल्या त्या प्रत्येक क्षणाची..
मग जाणवेल तुलाही
बांधआड घुसमटलेलं पाणी
कधीपासून वाट पाहतेय
मुक्त वाहण्याची..!!
बघ
तू दिलेल्या प्रत्येक यातनेला
मी जपलंय
तळहाताच्या फोडा प्रमाणे
अन घेतलीय जबाबदारी
त्यांच्या पालन पोषणाची..
भेटून जा रे कधीतरी आगंतुक
उमटू दे त्यांच्याही ओठी
एखादी स्मित लकेर समाधानाची..!!
हे जीवना,
पाठशिवणीच्या या खेळात
तू खुशाल दे हुलकावणी
परी हरणार ना उमेद ही जगण्याची..
तू पाहशील रे
अंती घातलेली आकाश गवसणी
अन
न उरलेली भीती
काहीच कुठे हरण्याची..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| ग्रहण ||

|| ग्रहण ||
=======
दे दान सुटे गिराण..ss
तिला
बेंबीच्या देठापासून हाळी देताना पाहून
क्षणभर वाटले की,
तिला आता
तिचे मनोइच्छित दान निश्चित मिळणार
अन् आकाशातल्या त्या चंद्रासवे
या चंद्राचेही ग्रहण नक्की सुटणार..!!
पण तो केवळ माझा भ्रम होता
फुटकळशा दानाने
आकाशातील चंद्र लीलया सुटला
पण तरीही
तिच्या हाळीने कळस गाठला
अन्
तिच्या ग्रहणाचा चंद्र
अधिक काळा ठिक्कर पडला..!!
खरं तर
तिला सांगायला हवे कुणीतरी
की असे फुटकळसे दान मागून
पिढ्यानपिढ्या लागलेले हे ग्रहणसुटण्याची,
तुसराम शक्यता नाही
आणि
ओरबाडणाऱ्या या दुनियेत
दान देण्याची वृत्तीच
आता शिल्लक राहिली नाही..!!
पुराणातली का असेनात
पण
जुनी उदाहरणं
अजूनही जिवंत आहेत
कवच कुंडलाचे दान
कर्णास मृत्यूकडे घेऊन गेले
अहो इतकंच काय
बळी राजास तर चक्क पाताळात गाडले
म्हणूनच
दान द्यायला कोणी धजावत नाही
आणि तसंही
पाषाणावर बीज कोणी रुजवत नाही..!!
तिला सोडवायचेच असेल आपले ग्रहण
तर
तिने हात पसरणे सोडून,
मुठी आवळायला शिकले पाहिजे
दान मागणे सोडून
हक्क मागायला शिकले पाहिजे
तेव्हाच सुटेल टप्प्याटप्प्याने
तिचे खंडग्रास आणि खग्रास ग्रहण
अन् मग मोकळं होईल
तिच्या आभाळाचं मन
आणि मगच
विस्तीर्ण होईल
प्रकाशित आकाशाचं अंगण..!!
***सुनिल पवार...

|| प्राक्तनाचे लेणे ||

|| प्राक्तनाचे लेणे ||
तू भुलवू नको मजला
गाऊन आभाळाचे गाणे..
मी ओंजळीत सांभाळले
तुटलेल्या स्वप्नांचे चांदणे..!!
माझ्या सुखाच्या परिभाषेचे
सारे रिकामीच रकाने..
तुझ्या चौकटीला बांधलेले
वेड्या कल्पनांचे उखाणे..!!
किती विरोधाभासी दिसते
मुक्त मेहंदीचे रंगणे..
खपल्या खपल्या गाळत
सुप्त शोभेचे जगणे..!!
सहज उमजते रे तुझे
हे शब्दार्जवी कुरवाळणे..
गर्द निशेच्या कुशीतले
धगधगते कायेचे जळणे..!!
आता तू थांब पलीकडे जगा
मज नाही तुझे देणेघेणे..
भाळीच्या कोंदणास मी केले
माझ्या प्राक्तनाचे बंदिस्त लेणे..!!
***सुनिल पवार...