Saturday, 10 February 2018

|| ग्रहण ||

|| ग्रहण ||
=======
दे दान सुटे गिराण..ss
तिला
बेंबीच्या देठापासून हाळी देताना पाहून
क्षणभर वाटले की,
तिला आता
तिचे मनोइच्छित दान निश्चित मिळणार
अन् आकाशातल्या त्या चंद्रासवे
या चंद्राचेही ग्रहण नक्की सुटणार..!!
पण तो केवळ माझा भ्रम होता
फुटकळशा दानाने
आकाशातील चंद्र लीलया सुटला
पण तरीही
तिच्या हाळीने कळस गाठला
अन्
तिच्या ग्रहणाचा चंद्र
अधिक काळा ठिक्कर पडला..!!
खरं तर
तिला सांगायला हवे कुणीतरी
की असे फुटकळसे दान मागून
पिढ्यानपिढ्या लागलेले हे ग्रहणसुटण्याची,
तुसराम शक्यता नाही
आणि
ओरबाडणाऱ्या या दुनियेत
दान देण्याची वृत्तीच
आता शिल्लक राहिली नाही..!!
पुराणातली का असेनात
पण
जुनी उदाहरणं
अजूनही जिवंत आहेत
कवच कुंडलाचे दान
कर्णास मृत्यूकडे घेऊन गेले
अहो इतकंच काय
बळी राजास तर चक्क पाताळात गाडले
म्हणूनच
दान द्यायला कोणी धजावत नाही
आणि तसंही
पाषाणावर बीज कोणी रुजवत नाही..!!
तिला सोडवायचेच असेल आपले ग्रहण
तर
तिने हात पसरणे सोडून,
मुठी आवळायला शिकले पाहिजे
दान मागणे सोडून
हक्क मागायला शिकले पाहिजे
तेव्हाच सुटेल टप्प्याटप्प्याने
तिचे खंडग्रास आणि खग्रास ग्रहण
अन् मग मोकळं होईल
तिच्या आभाळाचं मन
आणि मगच
विस्तीर्ण होईल
प्रकाशित आकाशाचं अंगण..!!
***सुनिल पवार...

No comments:

Post a Comment