Friday, 23 February 2018

|| प्रेम ||

|| प्रेम ||
तसं पाहायला गेलं तर
त्याने
निरपेक्षतेचा हात पकडून
येणे अपेक्षित असते..
पण ते येते
अमर्याद अपेक्षांचं ओझे घेऊन
अन् कळतही नाही
केव्हा आपल्याच अवास्तव ओझ्याखाली
ते दबून जाते..!!
आकाशाला गवसणी घालण्याच्या
त्याच्या क्षमतेचे समीकरण
कधी चंद्र,तारे तोडण्यापालिकडे गेले नाही..
अन् तुटलेल्या चंद्रतारकांच्या रुदनाने
काळवंडललेल्या आकाशी,
पोकळ वलग्नेचे क्षितिज,
कुठेही रंगलेले दिसले नाही..!!
छाताडावरील माती उकरण्या पलीकडे
त्याने आजवर काही केलेले दिसतही नाही..
आरोप प्रत्यारोपाच्या निरर्थक फैरीत
छिन्न विच्छिन्न देहाची लक्तरे
आक्रोश करत राहतात पहुडलेल्या थडग्यात
अन् मग मेणबत्त्या जाळून
निव्वळ थडगे सुशोभित करण्यास
काही अर्थही उरत नाही..!!
मी म्हणतो
गुण गायला हरकत नाही
नव्हे तर,
ते प्रत्येकाने गायला हवेत
मात्र
दृष्टिकोणाच्या समृद्ध बाहूंनी पेलवेल इतकेच,
आकाश कवेत घ्यायला हवे
कारण
दृष्टिकोनाशिवाय निरर्थक ठरते
प्रत्येक पैलूंची उठाठेवी करणी..
एका दिवसाच्या जुजबी रंगरांगोटीने
कितीसे तगणार घर?
त्यासाठी हवी
एक मजबूत सामंज्यस पायाभरणी..!!
--सुनिल पवार...✍

No comments:

Post a Comment