Saturday, 10 February 2018

|| हे जीवना ||

|| हे जीवना ||
========
हे जीवना,
तू घेऊन बघ अनुभूती
कधीतरी
या विस्कळीत जीवनाची..
कदाचित
तुलाही येईल जाण
नित्य भासणाऱ्या या विवंचनांची..!!
कधीतरी सहज भेटून
घे गळाभेट
आतुरलेल्या त्या प्रत्येक क्षणाची..
मग जाणवेल तुलाही
बांधआड घुसमटलेलं पाणी
कधीपासून वाट पाहतेय
मुक्त वाहण्याची..!!
बघ
तू दिलेल्या प्रत्येक यातनेला
मी जपलंय
तळहाताच्या फोडा प्रमाणे
अन घेतलीय जबाबदारी
त्यांच्या पालन पोषणाची..
भेटून जा रे कधीतरी आगंतुक
उमटू दे त्यांच्याही ओठी
एखादी स्मित लकेर समाधानाची..!!
हे जीवना,
पाठशिवणीच्या या खेळात
तू खुशाल दे हुलकावणी
परी हरणार ना उमेद ही जगण्याची..
तू पाहशील रे
अंती घातलेली आकाश गवसणी
अन
न उरलेली भीती
काहीच कुठे हरण्याची..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment