Sunday, 30 July 2017

|| रंग तरंग ||

|रंग तरंग...
भूतकालीन बोचणारे
ते ओबडधोबड खडे
तू भिरकावून दे 
वर्तमानाच्या पाण्यावर
अन् घे आस्वाद बालकापरी
उठणाऱ्या त्या
भविष्य नामे मोहक तरंगाचा..!!
तसे सर्वच रंग
असतात पूरक या जगण्याला
काळा म्हणून धिक्कारू नको
अन् पांढरा म्हणून चुचकारूही नको
बघ मिसळून एकमेकात
मग कळेल तुला
हा मेघांचा धुंद बेधुंद वर्षाव
अन् अर्थ ही लाभेल नवा
तुझ्या थिजलेल्या भिजण्याला..!!
--सुनिल पवार...✍️

|| पसारा ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| पसारा ||
=======
आज
सहज मांडला
मी,
आठवणींचा पसारा..
तर
म्हणाली ती,
डस्टबिनमधे टाक
आधी,
उचल तो कचरा..!!

मी
हसून उत्तरलो
म्हणू नको ग कचरा
हा तर,
एकांताचा उतारा..
बघ ना,
त्यातूनच उचंबळतोय
मोहक शब्दांचा नजारा..!!
ती लटकेच रागावली
म्हणाली,
बांधू नको उगाच,
पोकळ शब्दांचा बंधारा..
अशाने होणार नाही रे
तुझ्या,
आठवणींचा निचरा..!!
मी हसलो
म्हणालो,
मान्य,पटतंय मला
म्हणूनच तर तुला,
बोलतं करतोय जरा..
आणि आठवणींचं काय..?
हा तर,
क्षणिक खेळ सारा..!!
ती रुसली
म्हणाली,
तुझ्या या खेळात,
मीच बनते मोहरा..
आठवणींच्या या डावात
तुझा,
रंग दिसतोय खरा..!!
मी मिश्किल हसलो
म्हंटले तिला,
चित भी 'तेरी पट भी तेरा
राणीच्याच मागे असतो
गोतावळा सारा..
नाही म्हणू नको
चल आवर आता
बघ ना,
झालाय किती.?
आठवणींचा पसारा..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| दिवाना ||

|| दिवाना ||
=======
पावसात
तिला भिजताना पाहून
मी
देह भान हरपून जातो..
थेंब पाण्याचा
तिच्या अधरावर रेंगाळतो
अन
मी पाऊस होऊन जातो..!!

ती
चिंब भिजते नखशिखांत
तिला
नसते जणू कसलीच भ्रांत..
असूया माझ्या मनाची
पुसतसे
काय असावं
तिचं अन पावसाचं नातं..!!
मी कोरडाच राहतो
माझ्या प्रश्नात
ती
सहज पकडते वाऱ्याचा हात..
गंध पसरतो आसमंतात
मी उत्तेजित
त्यास भरून श्वासात..!!
जाता जाता
तो देऊन जाईल
तिला
मोहक इंद्रधनुचा नजराणा..
ती
सावरेल आपला पदर पसारा
अन मी
असेन लुब्ध तिच्यावर तसाच
तिचा जणू प्रेम दिवाना..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| माणूस/चेहरे ||

|| माणूस/चेहरे ||
==========
माणूस एक
माणसाचे चेहरे अनेक..
प्रत्येक चेहऱ्याचे
दिसतात पैलू अनेक..
काही नेक
काही असतात तसेच फेक..
सृष्टित जसे
भरलेले रंग अनेक..
रंग अनेक
तसेच
ढंग ही अनेक..
कधी नभी
काळे कुट्ट मेघ..
तर कधी
सप्तरंगी इंद्रधनुची रेघ..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| एकरूप ||

|| एकरूप ||
=======
धुंद
बरसायचं होतं मला
म्हणून
मी मेघाशी संग केला..
पण
कुठूनसा आला वारा
त्याने
दूर लोटले मला..!!

मंद
वाहायचे होते मला
म्हणून
वाऱ्याशी संग केला..
पण
आडवा आला मलय
अन
मार्ग माझा खुंटला..!!
शिखरावर
पोहचायचे होते मला
म्हणून
मलयाशी संग केला..
पण
धुंद बरसला जलद
त्याने
वाहून नेले मला..!!
आता
न मेघ,न वारा,न मलय
नको
कोणाचा संग मला..
जीवनाचा
हर एक रंग निराळा
त्या जीवनाशी,
एकरूप व्हायचे मला..!!
***सुनिल पवार...✍🏼

:::|| दुःख ||:::

:::|| दुःख ||:::
========
या,
जगाच्या
मायाबाजारी
कोणाच्या दुःखास
कोण विचारी..?
वाटते इथे
ज्याला,त्याला
प्रत्येकाला,
आपलेच असे
दुःख भारी..!!
***सुनिल पवार....

|| पाऊस आठवणीतला ||

|| पाऊस आठवणीतला ||
================
नेमेची येतो
पावसाळा..
बनून
पहिला वहिला..
घेऊन येतो
सोबतीस
असंख्य आठवणीला..
अन
शब्दांच्या पलीकडील
त्या
अनामिक अनुभूतीला..!!

विसरावं म्हटलं
तरी
विसरता येत नाही..
पहिल्या पावसाला
अन
त्याच्याशी जुडलेल्या
कटू ,गोड
अगणित आठवणीला..!!
असाच असतो
पाऊस
आठवणीतला..
तुमचा,माझा,सर्वांचा
हळुवार
हृदयात जपलेला..
अन
नकळत
डोळ्यांतून बरसलेला..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| अंतिम प्रहार ||

|| अंतिम प्रहार ||
===========
किती फोडला टाहो
अन किती ठोठावले दार...
कुंभकर्णी झोप त्यांची
नाही उडण्यास तयार..!!

बुडीत सारा व्यापार
अन परागंदा हमीदार..
उभा डोंगर कर्जाचा वाटेत
आधारावीन कसा लांघणार..??
राजा राजा म्हणून त्यांनी
रिते केले घरदार,शिवार..
जगाचे पोट भरता भरता
झाली अटळ उपासमार..!!
वितळवून फाळ अखेरीस
मी पाजळलंय हत्यार..
गेंड्याच्या त्यांच्या कातडीवर
आता अंतिम प्रलय प्रहार..!!
****सुनिल पवार....✍🏽